Vegetable Farming: हवेली भागातील गावे झाली कोथिंबिरीचे क्लस्टर

Coriander Cluster Story: पूर्व हवेली परिसरातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर व पालक या कमी कालावधीच्या पिकांची क्लस्टर पद्धतीने यशस्वी लागवड सुरू केली आहे. यामुळे उत्पन्न वाढीबरोबरच रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत.
Coriander Farming
Coriander FarmingAgrowon
Published on
Updated on

Farmer Success Story: पुणे जिल्ह्यात पूर्व हवेली परिसरातील काही गावांचे कोथिंबीर तसेच पालकासारख्या पिकात क्लस्टर तयार झाले आहे. कमी कालावधीच्या या पिकांमधून वर्षाला एकाहून अधिकवेळा लागवड करणे शक्य झाले आहे या पिकामुळे रोजगार निर्मिती होण्यासह शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील उंचावण्यास मदत मिळाली आहे.

पुणे शहरापासून सुमारे २५ ते ३० किलोमीटरवर कोलवडी, सोरतापवाडी, थेऊर, कुंजीरवाडी, तरडे, अष्टापूर, आळंदी मातोबाची, दौंडमधील राहू आदी गावे आहेत. या गावांजवळून मुळा- मुठा नदी आणि कालवा जात असल्याने परिसर बागायती आणि बऱ्यापैकी सधन झाला आहे. या सर्व गावांचे मिळून क्लस्टर संबोधल्यास प्रत्येक गावची कुटुंबसंख्या सुमारे ३०० ते ५०० च्या दरम्यान आहे. बहुतांश ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.

बारा ते १५ वर्षांपूर्वी या गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जायची. सुमारे ८० टक्के शेतकरी हेच पीक घेत होते. परंतु या भागातील साखर कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या उभी राहिली. शेतकऱ्यांनी पर्यायी मार्ग अवलंबविण्यास सुरुवात केली. काही शेतकरी फुलशेतीकडे वळले.

Coriander Farming
Agriculture Success Story: पालकरांकडील आंब्याला मिळालेय जागेवरच मार्केट

त्यांनी गुलछडी, गुलाब आदींची शेता सुरू केली. परंतु बदलत्या हवामानाच्या काळात रोग- किडींचा प्रादुर्भाव, पाणी, वाढता उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. मात्र सक्षम पर्याय मिळत नसल्याने फुलशेतीपासून दूर जाणे शक्य नव्हते. मात्र अलीकडील काळात शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या कोंथिंबीर, पालक, मेथी अशा पिकांकडे वळले आहेत.

प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्यासह विक्रीसाठीही पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला त्यांना विक्रीमध्ये अनेक अडचणी आल्या. परंतु हार न मानता जिद्द कायम ठेवून मुंबईची बाजारपेठ विकसित करण्यात त्यांनी जम बसवला. आजमितीस क्लस्टरमधील प्रत्येक कुटुंबाकडे दहा गुंठे क्षेत्रापासून ते पाच-दहा एकर ते त्याहून अधिक एकरांवर हे पीक दिसते आहेत.

कमी कालावधीचा फायदा

पूर्व हवेली भागातील या गावांमधील हवामान पालेभाज्यांसाठी पोषक आहे. येथील जमीन मध्यम ते भारी आहे. पुणे, मुंबई या बाजारपेठा जवळ असल्याचा फायदाही शेतकऱ्यांना मिळतो आहे. एका पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी नांगरट करून वाफे किवा पट्टा पद्धतीने दुसऱ्या पिकाच्या लागवडीकडे लक्ष देतात. कोथिंबीर किंवा पालकासारखे पीक एक ते सव्वा महिन्याच्या कालावधीत काढणीस येते. त्यामुळे वर्षभरात सुमारे सात वेळा एखादे पीक घेणे किंवा पीक फेरपालट करणे शक्य झाले आहे.

Coriander Farming
Vegetable Farming : विदर्भातील माळकिन्हीची भाजीपाला पिकात ओळख

काही शेतकरी टप्प्याटप्प्याने पेरणी करत असल्याने काढणीचे नियोजनही सुकर झाले असून, चांगले बाजारभाव मिळवणे शक्य झाले आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या असल्याने पालेभाज्यांचे उत्पादन आणँ पर्यायाने आवक देखील कमी असते. त्या काळात बाजारपेठेत दगर मात्र चांगले असतात. पावसाळा, हिवाळ्यात पोषक वातावरण असल्याने उत्पादन चांगले मिळते. मात्र दरात चांगलीच घट होत असल्यामुळे काही वेळा परवडत नसल्याची स्थिती निर्माण होते. एखादा प्रातिनिधक अनुभव सांगायचा तर तरडे गावचे कुंडलिक गुंजाळ यांची दोन एकर शेती आहे. मेथी, कोथिंबीर, पालक अशी पिके ते सातत्याने घेतात.

काढणीचे नियोजन

कुंजीरवाडी येथील भाऊसाहेब धुमाळ म्हणतात, की सुरुवातीला आमच्यापैकी काही मोजके शेतकरी कोथिबीर, पालक आदींचे उत्पादन घ्यायचे. हळूहळू ही संख्या वाढू लागली. सध्या आमच्याजवळ कोंथिंबीर काढणीसाठी ३० ते ४० मजुरांची टीम आहे. ते सकाळपासून काढणी करून त्याच्या जुड्या बांधण्याचे काम करतात. वाहतूक दूरची असल्याने खराब होऊ नये म्हणून क्रेटमध्ये व्यवस्था केली जाते. किमान चार ते पाच तासांत हे सर्व काम करावे लागते. बाजारपेठेत वेळेत माल न पोहोचल्यास त्याचे मोठे नुकसान होण्याची भीती असते.

गावांतून दररोज सुमारे दोन हजारांच्या संख्येने क्रेट बाजारपेठेत रवाना केले जातात. यात मुंबईला सुमारे पंधराशे, तर पुण्याला सातशेपर्यंत क्रेट जातात. प्रति शेतकऱ्याकडे त्याच्या क्षेत्रानुसार पाच, दहा ते त्याहून अधिक मजूर काम करतात. प्रति मजुराला प्रति दिन ४०० ते ५०० रुपये मेहनताना मिळत असल्याने त्यांचा उदारनिर्वाह या व्यवसायावर चालतो आहे.

उलाढाल व झालेला बदल

पुणे व मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, नाशिक तर पावसाळ्यात अमरावती भागातूनही मागणी असते. उन्हाळ्यात कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. विविध ठिकाणी व्यापारी जोडले गेले आहेत. सामूहिकरीत्या माल रवाना होत असल्याने वाहतुकीवरील मोठा खर्च कमी होण्यास मदत झाली आहे.

एरवी कोथिंबीरीला पाच ते दहा रुपये प्रति गड्डी असा दर असतो. उन्हाळ्यात हाच दर प्रति गड्डी १० ते २० रुपये असतो. वर्षातील अन्य कालावधीपेक्षा उन्हाळ्यात निव्वळ नफा अधिक होतो. गावात या माध्यमातून वार्षिक पाच ते दहा कोटींच्या आसपास उलाढाल होत असावी. कोथिंबिरीच्या माध्यमातून गावातील व गावाबाहेरील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

पूर्वी गावातील शेतकरी साध्या घरांमध्ये राहायचे. आता त्यांचे राहणीमान काही प्रमाणात उंचावले आहे. काही शेतकऱ्यांनी बंगले बांधले असून घरासमोर दोन चाकी, चारचाकी वाहने दिसून येतात. शेतकऱ्यांना आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणे शक्य झाले आहे. रस्त्यांमध्ये सुधारणा झाल्याने दळणवळणाची सुविधा व शेतीमाल वाहतुकीची चांगली सुविधा निर्माण झाली आहे.

भाऊसाहेब धुमाळ ९८८१९२४७५१

(शेतकरी, कुंजीरवाडी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com