
Nagpur News: संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ यावेत या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योगाला मिहानमध्ये अल्प दरात २३२ एकर जागा उपलब्ध करून दिली. यावर पतंजलीने संत्र्यासह इतर पिकांसाठी प्रक्रिया उद्योग उभारावा, अशी अपेक्षा होती. तब्बल आठ वर्षानंतर पतंजलीला यासाठीचा मुहूर्त मिळाला असून ९ मार्च रोजी या प्रकल्पाचे कार्यान्वयन होणार आहे.
संत्रा पिकाखालील राज्यातील दीड लाख हेक्टरपैकी सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्र एकट्या विदर्भात आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याची एक लाख हेक्टर क्षेत्राच्या माध्यमातून आघाडी असून उर्वरित २५ हजार हेक्टर नागपूर तर शिल्लक २५ हजार हेक्टर राज्यात विस्तारित क्षेत्र आहे. नागपुरी संत्र्याचा बांगलादेश हा एकमेव आयातदार होता. परंतु बांगलादेशने त्यांच्या आयातशुल्कात सातत्याने वाढ केल्याने आता प्रति गाडीसाठी (२७ टन) तब्बल २७ लाख रुपये आयातशुल्क द्यावे लागते.
परिणामी बांगलादेशची निर्यात आता उणीपुरी राहिली आहे. राजकीय उदासीनतेने प्रक्रिया उद्योगाची उभारणी देखील या भागात झाली नाही. परिणामी बाजारात मागणी नसल्यास उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नाही. संत्रा बागायतदारांची ही अस्वस्थता ओळखत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी बाबा रामदेव यांना विदर्भाचे मुख्य फळ असलेल्या संत्र्यावर आधारित उद्योगाच्या उभारणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.
त्याकरिता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्धतेचे आश्वासनही श्री. गडकरी यांनी दिले होते. पतंजलीने याला सहमती दर्शवित एक हजार ते १२०० कोटींची गुंतवणूक व विदर्भात दहा हजार रोजगारनिर्मिती होईल, अशा प्रकल्पाचा आराखडा तयार केला. जागेचा ताबा मिळाल्यानंतर १० सप्टेंबर २०१६ रोजी विदर्भातील संत्र्याची दशा आणि दिशा बदलणाऱ्या या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
त्यानंतर पाच वर्षे हा प्रकल्प तसूभरही पुढे सरकला नाही. परिणामी, पतंजली समूहाच्या भूमिकेवरच साशंकता व्यक्त होत होती. स्वस्तातील जागा बळकावण्यासाठीच पतंजलीने ही खेळी केल्याचाही आरोप झाला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाला गती देत फळांवर प्रक्रियेकामी उपयोगी पडणारी मल्टिलाइन यंत्रणा उभारण्यात आली. हंगामात संत्र्यासह राज्य तसेच देशातील विविध फळांवर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. त्याबरोबरच पतंजली आटा तसेच बिस्कीट उत्पादनही येथे होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यान्वयनावियषयी आशा निर्माण झाली होती.
९ मार्चचा मुहूर्त
पतंजलीच्या प्रकल्पाविषयी साशंकता व्यक्त होत असल्याने याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने बाबा रामदेव यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. त्याच्याच परिणामी अखेरीस पतंजली समूहाने रविवारी (ता. ९) प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित केला आहे. या वेळी मंत्री गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आचार्य बाळकृष्ण उपस्थित राहतील.
संत्रा उत्पादकांना आशा
पतंजली समूहाच्या या प्रकल्पात ८०० ते ९०० टन संत्रा फळांवर प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे विदर्भात लहान आकाराच्या संत्रा फळांना बाजारपेठ उपलब्ध होईल, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.