
Integrated Farming System : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर- मंगळवेढा या संतभूमी ते देवभूमीच्या रस्त्यावर अनवली (ता. पंढरपूर) हे सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेले गाव वसले आहे. ग्रामदैवत सिद्धनाथ यांची सुवर्णनगरी म्हणून त्याची जुनी ओळख आहे.
या गावच्या शेतीसाठी भाटघर व उजनी या दोन्ही धरणांच्या पाण्याचा लाभ मिळतो. द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांनी येथील शेतकऱ्यांनी प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. याच अनवली गावचे स्वप्नील आसबे हे २९ वर्षे वयाचे तरुण व अभ्यासू शेतकरी आहेत.
सन २०१६ च्या सुमारास ‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग’मध्ये त्यांनी पदवी घेतली. त्या वेळी नोकरीची संधी असताना आपल्या शेतीकडेच वाट वळवली. अभ्यासपूर्वक शेती करून त्यातच करिअर करण्याचा त्यांचा मानस होता.
शेतीची धुरा सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर व्यावसायिक पद्धतीने पिकांची आखणी केली. अभ्यास केला. शेतीत भांडवल गुंतवताना ते कशासाठी व कधी वापरावे यासंबंधीचे नफा- तोट्याचे गणित मांडले.
शेतीत नफा मिळवायचा तर उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला. शेती वीस एकर आहे यात द्राक्षे पाच एकर, ऊस साडेतीन एकर, अडीच एकर दोडका किंवा अन्य भाजीपाला, मका दोन एकर व उर्वरित क्षेत्रात भुईमूग, बेदाणा शेड अशी पद्धती आहे.
सेंद्रिय शेतीवर भर
शेतीच्या सुरुवातीच्या काळात आसबे यांनी मजूरटंचाई लक्षात घेऊन व श्रम करण्याच्या हेतूने ट्रॅक्टर,फवारणीसाठी ब्लोअर खरेदी केला. सर्व शेती ठिबक सिंचनावर आणली. त्यासाठी स्वयंचलित यंत्रणेचा वापर केला. आपत्तीच्या काळात पिकांचे पाण्यावाचून नुकसान होऊ नये म्हणन एक एकर क्षेत्रावर शेततळे घेतले आहे.
कोरोना संकटाच्या काळात द्राक्ष व बेदाण्याचे दर पडले. वातावरणाचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागा फेल गेल्या. सुमारे २८ लाख रुपयांचे कर्ज झाले. आर्थिक गरज भागवण्यासाठी वेळोवेळी सावकारी कर्ज काढावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावरील खर्च व पर्यायाने त्यांचा वापर कमी करण्यास सुरवात केली. आज ६० टक्के रासायनिक व ४० टक्के सेंद्रिय. अशा एकात्मिक पध्दतीचा वापर ते करतात.
दोडका पिकाने दिले स्थैर्य
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आदी समस्यांनी आसबे यांच्या द्राक्षशेतीचे वेळोवेळी काही लाखांचे अतोनात नुकसान झाले आहे. अडीच एकर माणिकचमन द्राक्षाला मालच न मिळण्याचा अनुभव घेतला. मागील वर्षी आठ एकर द्राक्ष बाग ‘फेल’ गेली. मात्र हार न मानता हिंमत, धैर्य, अभ्यास व ज्ञान घेण्याच्या वृत्तीतून आसबे यांना वाटचाल सुरू ठेवली.
दोन-तीन वर्षांपासून दोडका व काकडी ही पीकपद्धती त्यांनी स्वीकारली. ती आर्थिक स्थैर्य देऊ लागली आहे. द्राक्ष बागेचा मांडव तयार होता. त्यावरच अडीच एकरांत दोडक्याची बाग फुलवली आहे. आतापर्यंत दोन हंगामांनी त्यांना चांगलं उत्पादन व उत्पन्न मिळवून दिलं आहे.
यंदाचा तिसरा हंगाम आहे. जून-जुलैमध्ये दोडक्याची लागवड होते. साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास प्लॉट संपतो. प्रति एकरी २० टन ते त्याहून अधिक उत्पादन साध्य केले आहे. त्यानंतर रब्बीत म्हणजे हिवाळ्यात काकडी घेतली जाते. साधारण तीन ते साडेतीन महिन्यात हे पीक चांगले उत्पन्न देऊन जाते.
बाजारपेठ व अर्थकारण
आसबे सांगतात, की प्रति किलो १० ते २० रुपये दर मिळतो. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. काही वेळा ४८ रुपयांपर्यंत देखील दर घेतला आहे. काकडीचे एकरी १५ ते २० टन उत्पादन घेतले आहे. त्यालाही पाचपासून दहा रुपये प्रति किलो दर मिळतो. खरीप व रब्बीतील या दुहेरी पीक पद्धतीने काही लाखांचे उत्पन्न मिळवून देऊन आसबे यांचे शेतीचे अर्थकारण उंचावण्यास सुरवात झाली आहे.
यंदाच्या फेब्रुवारीमध्ये कारल्याची लागवड केली होती. मात्र तीव्र उन्हाळ्यात हे पीक वाया गेले. परंतु पुन्हा जूनमध्ये दोडक्याची लागवड करून आपल्या आशा आसबे यांनी पल्लवित केल्या आहेत. यंदाही एकूण लागवड क्षेत्रातून ३० टनांच्या पुढे उत्पादन अपेक्षित आहे.
उत्पन्नाच्या जोरावर कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. एका कर्जातून सुमारे १० लाख रुपयाची परतफेड झाली आहे. शिवाय आता कर्ज घेणेही बंद केले आहे. आसबे श्री. सिद्धनाथ शेतकरी गटाचे सचिव आहेत. त्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानातील विविध चर्चा घडून समस्यांची उकल होण्यास मदत होते.
सेंद्रिय शेतीतील व्यवस्थापन
आसबे यांच्याकडे दोन गीर गाई व एक खिलार गाय असे पशुधन असून त्यातून सेंद्रिय शेतीसाठी शेणखत व गोमूत्र मिळते. जिवामृत वा सेंद्रिय स्लरी तयार करण्यासाठी २५ हजार रुपये किमतीची २८ बाय पाच फूट आकाराची, १२०० मायक्रॉन जाडीची पॉलिथिन बॅग घेतली आहे. प्रत्येकी १०० किलो शेण व गूळ, १०० लिटर गोमूत्र, १०० लिटर गोमूत्र, भाताची पेज व अन्य घटकांच्या आधारे ही सेंद्रिय स्लरी १५ दिवसांच्या कालावधीत तयार होते.
ठिबकद्वारे फिल्टर केलेले हे द्रावण पिकांना देण्यात येते. याशिवाय वेस्ट डी कंपोजरचाही वापर होतो. दहा ड्रम थेअरी तंत्राचाही वापर होतो. यात प्रत्येकी ७० लिटरचे ड्रम आहेत. यामध्ये ट्रायकोडर्मा, विविध जिवाणू खते, मित्रबुरशी यांचे कल्चर वापरून जैविक घटकांची निर्मिती केली जाते. पिकांत गरजेनुसार त्यांचा वापर होतो. रोगांचे जैविक पद्धतीने नियंत्रण त्यातून होते. उसाचे एकरी ८० टनांपर्यंत तर बेदाण्याचे एकरी तीन टनांपर्यंत उत्पादन मिळते.
स्वप्नील आसबे ९७६६७९९०६४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.