
Agriculture Success Story : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-सांगोला मार्गावर सद्गुरू सीताराम महाराज देवस्थानामुळे प्रसिद्ध असलेले खर्डी हे १० ते १५ हजार लोकसंख्येचे गाव. ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि बोर आदी पिकांसाठी देखील गावाची ओळख आहे. याच गावात अंबादास हावळे यांची वडिलोपार्जित सात एकर शेती होती. त्यात वडील विठ्ठल पारंपरिक पिके घेत. शेती आणि शेतमजुरी करून घर चालवत.
त्याकाळी आर्थिक परिस्थिती जेमतेम म्हणजे काम करू तेव्हाच खाऊ अशी होती. त्यामुळेच अंबादास यांना पदवीच्या पहिल्याच वर्षातून शिक्षण अर्धवट सोडून शेतीची जबाबदारी स्वीकारावी लागली. मधले बंधू सत्यवान व सर्वात धाकटे बंधू सुनील यांनाही शालेय शिक्षण अर्धवट सोडून शेतमजुरी सुरु करावी लागली.
प्रगतीकडे वाटचाल
मजुरी सुरू असताना स्वतःच्या शेतात प्रयोग करून प्रगती करण्याचे अंबादास यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु भांडवलाचा प्रश्न होता, सन २००३ ते २००७ पर्यंतचा हा काळ होता. तिघाही भावंडांनी मजुरी करतच शेतात विहीर खोदली. पहिल्यांदाच स्वतःच्या शेतात ढोबळी मिरची, काकडी घेतली. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले. उत्साह वाढला. मग अन्य शेतकऱ्यांकडील शेती भाडेकराराने घेत त्यात डाळिंबाचा प्रयोग केला. एकीच्या बळातून हा प्रयोग देखील आर्थिकदृष्ट्या यशस्वी केला. मग पुढील वर्षी सुमारे अडीच एकर शेती खरेदी केली.
डाळिंब बागेचे नियोजन
पूर्वी साडेपाच एकरांत डाळिंब बाग होती. मात्र खोडकीड व अन्य तांत्रिक कारणामुळे बागेत नुकसान सोसावे लागले. त्यानंतर हे पीक घेणे बंद केले. त्यानंतर हावळे यांनी भाजीपाला पिकांकडे मोर्चा वळवला. व त्यानंतर पुन्हा डाळिंबाची २० एकरांत लागवड केली. त्याची दोन उत्पादने आत्तापर्यंत घेतली आहेत.
पैकी पहिल्या वर्षी एकरी पाच टनांपर्यंत तर यंदा दुसऱ्या वर्षी एकरी सात ते आठ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. वीस एकरांपैकी पाच एकर नवी बाग आहे. बागेत भगवा वाण असून १२ बाय सात फूट अंतरावर लागवड आहे. पूर्वी बागेला विश्रांती दिली जात नव्हती. एक बहारानंतर लगेच पुढील बहार गेतला जायचा.
परंतु आता वर्षातून एकच हस्त बहर धरण्यात येतो. पूर्वी बागेला डबल लॅटरल ठिबक सिंचन होते. आता ड्रीपची एकच लाइन वापरली असून दोन झाडांमध्ये एक ड्रीपर राहील अशी काळजी घेतली आहे. मर, तेलकट डाग आदी रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर पंधरवड्यातून एकदा झाडाची बुडे कीडनाशक द्रावणाने धुऊन घेतली जातात.
झालेली प्रगती
पूर्वीचे यश, अपयश, त्यातील अनुभव, अलीकडील वर्षांतील चुका दुरुस्त करत, नवे धडे घेत, अडचणींवर मात करत व वेळोवेळी सुधारणा करीत हावळे आता डाळिंबाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊ लागले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांच्या डाळिंबाला प्रति किलो १४२ ते १६२ रुपयांपर्यंत जागेवर दर मिळाला. संपूर्ण १५ एकरांत घसघशीत उत्पन्न झाले. मागील १० वर्षांत द्राक्ष, पेरूचेही चांगले उत्पादन व उत्पन्न घेतले.
आज हावळे यांची शेती एकूण ३५ एकरांपर्यंत पोहोचली आहे. पैकी २० एकर डाळिंब, पाच एकर द्राक्ष आणि साडेपाच एकरांत तैवान पिंक पेरू आहे. आई-वडील, दोन्ही भाऊ, भावजय यांच्यासह १८ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. शेतीत संपूर्ण कुटुंबाचे श्रम एकवटले असल्याने आज शेतीत ते यशस्वी झाले आहेत. आजही शेतीकामांना बाहेरील मजुरांची मदत घेण्याची गरज भासत नाही.
घरच्यांच्या कष्टाच्या बळावरच काही वर्षांत टप्प्प्याटप्प्याने २७ एकर शेती खरेदी करणे शक्य झाले. अंबादास यांना विकास गाढवे, अजित रोंगे, शंकर मुळे, सुधाकर कसगावडे, नाना शिंदे यांनी मोठी मदत केली. तर दोन-तीन वर्षात गौडवाडीचे (ता.सांगोला) डाळिंब उत्पादक नाना माळी, प्रगतिशील शेतकरी कल्लाप्पा गडदे, शिवाजी हिप्परकर यांचेही मार्गदर्शन मिळाले. एकेकाळचे शेतमजूर कुटुंब आज प्रगतिशील शेतकरी कुटुंब म्हणून या भागात लौकिकप्राप्त झाले आहे.
संकटाच्या छाताडावर पाय
कोरोनाच्या काळात २०२० मध्ये हावळे कुटुंबाकडे पाच एकर द्राक्षबाग होती. द्राक्षे काढणीला आली आणि नेमके त्या वेळी कोरोनामुळे लॅाकडाऊन सुरू झाला. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांसोबत सुपर सोनाका द्राक्षाच्या चार किलोच्या प्रति पेटीस २२५ रुपयांप्रमाणे व्यवहारही ठरला होता. मात्र लॅाकडाऊनमुळे व्यापाऱ्याने त्याकडे पाठ फिरवली आणि त्यावेळी प्रति चार किलोची द्राक्षे पेटी ८० रुपये दराने विकावी लागली.
त्यातून खर्च तर निघाला नाहीच, परंतु खर्चही निघणे मुश्कील झाले. त्यानंतर १८ एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची घेतली. काही लाख रुपयांचा खर्च त्यावर केला. पण या वेळेसही दर पडले आणि तो खर्चही वाया गेला. त्यानंतर याच क्षेत्रावर ढोबळी मिरची काढून दोडका घेतला. दरांअभावी पुन्हा पाच-सहा लाखांचा खर्च वाया गेला.
लाखो रुपयांचा फटका बसला. संकटांमागून अशी संकटे उभी ठाकली. पण या सर्व संकटांच्या छाताडावरुन पाय रोवून हावळे कुटुंब उभे राहिले. प्रसंगी हातउसने, पतसंस्था यांच्याकडून कर्जे घेऊन सर्वांची देणी दिली. स्वतःवरचा विश्वास कायम ठेऊन आपला संघर्ष सुरू ठेवला. आज सर्व संकटांना हे कुटुंब पुरून उरले आहे.
- अंबादास हावळे ९०९६५१८१३६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.