Agriculture Success Story: महिला शेतकरी कंपनीपर्यंत रेवतीताईंचा प्रवास...

Rural Women Empowerment: बहाद्दरपुरा (ता.कंधार,जि.नांदेड) येथील रेवती शिवाजी कानगुले याचा प्रवास केवळ एक आईचा संघर्ष नाही, तर एक प्रेरणादायी वाटचाल आहे. आपल्या दुःखातून उभ्या राहून इतरांच्या जीवनाला प्रकाश देणाऱ्या एका स्त्रीचा सामाजिक क्रांतीचा ठसा उमटवणारा प्रवास प्रेरणादायी आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. माधुरी रेवणवार

Organic Farming: जानेवारी २०११ मधील एक थंडीचा दिवस... रेवतीताईंच्या आयुष्यात एक निर्णायक वळण घेऊन आला. लहान मुलाला अचानक ताप आला. सुरुवातीला साधा वाटणारा ताप, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गंभीर स्वरूप धारण करू लागला. झटके येऊ लागले. घाबरलेल्या रेवतीताई तत्काळ सरकारी दवाखान्यात गेल्या. मात्र त्यांच्याकडे अर्ज नोंदणीसाठी लागणारे पाच रुपयेही नव्हते. परिस्थिती इतकी बिकट होती की, गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून दोन हजार रुपयांची व्यवस्था केली.

त्यावेळी कंधार येथील सरकारी रुग्णालयात लहान मुलांवरील उपचाराची सुविधा नसल्याने त्या नांदेड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या. दरम्यान मुलाचा ताप अधिकच वाढला, झटके थांबले नाहीत. त्याच्या मेंदूवर परिणाम होऊन त्याचे बोलणे आणि ऐकणे बंद झाले. एक आई म्हणून हे दु:ख सहन करण्याजोगे नव्हते. केवळ पैशाअभावी आपल्या मुलाचे आयुष्य उध्वस्त झाल्याचे बघून रेवतीताईंच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. मात्र ही वेदना त्यांनी आपली ताकद बनवली. आपल्यासारखी वेळ इतर कुणावरही येऊ नये,

या निर्धाराने रेवतीताईंनी महिलांसाठी बचत गट सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून महिलांच्या प्रगतीचे विश्व उभे केले आहे. रेवतीताईंचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. २००४ साली याचा विवाह शिवाजी कानगुले यांच्याशी झाला. सुरुवातीला त्यांचे पती मजुरीचे काम करत असत. परंतु आता आज ते घरगुती प्रक्रिया उद्योगात रेवतीताईंना चांगली साथ देत आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. अशा परिस्थितीतही रेवतीताईंनी हार न मानता कुटुंब आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला.

Indian Agriculture
Farmer Success Story : फळबाग केंद्रित प्रयोगशीलता हेच गिरमेंच्या शेतीचे वैशिष्ट्य

बचत गटातून प्रशिक्षण

रेवतीताईंनी गावातील महिलांना एकत्र करून आर्थिक बचतीची सवय लावली. हळूहळू बचत गट हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे माध्यम बनले. याच काळात ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ या संस्थेचे काम लोहा तालुक्यात सुरू झाले. रेवतीताईंच्या कार्याची दखल घेत, त्यांना गावातील महिलांची प्रमुख नेमण्यात आले. नोव्हेंबर, २०११ मध्ये त्यांनी ‘स्वयं शिक्षण प्रयोग’मध्ये अधिकृतपणे काम सुरू केले. केवळ बचतच नव्हे, तर महिलांना शेतीपूरक व्यवसायाची माहिती देणे, त्यासाठी प्रशिक्षणांचे आयोजन करणे यासारखे उपक्रम त्यांनी राबवायला सुरुवात केली.

या दरम्यान सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमात रेवतीताई सहभागी झाल्या. यामध्ये त्यांना कृषी आधारित प्रशिक्षण, व्यवसाय संधी आणि शासकीय योजनांची सखोल माहिती मिळाली. महिलांना केवळ बचत गटापुरता मर्यादित न ठेवता प्रक्रिया उद्योगाची दिशा देण्याचे त्यांनी नियोजन केले.

मसाला उद्योगाची उभारणी

कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान विभागातील तज्ज्ञांच्याकडून रेवतीताईंनी हळद प्रक्रिया, मसाला उद्योग आणि विविध प्रकारच्या पीठ उत्पादन उद्योगाबाबत मार्गदर्शन घेतले. मार्च, २०१२ मध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे-जिरे पूड निर्मिती उद्योगाला सुरवात केली. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना, जिल्हा उद्योग केंद्राचा व्यवसाय परवाना मिळवला. मसाले आणि पीठ तयार करण्यासाठी पल्वरायझर यंत्र घेतले. विविध मसाल्यांच्या बरोबरीने गहू, ज्वारी, बाजरी पीठ, विविध प्रकारच्या डाळींच्या पिठाची निर्मिती आणि विक्रीस सुरवात केली. योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि कुटुंबाची साथ या गोष्टींमुळे रेवतीताईंनी बचत गटांना योग्य दिशा दाखवली आहे.

Indian Agriculture
Spice Industry Success Story: पारंपरिक मसाल्यांचा तयार झाला ब्रॅण्ड

महिला सक्षमीकरणावर भर

स्वतःच्या प्रक्रिया उद्योगात यशस्वी झाल्यानंतर रेवतीताईंनी गावशिवारातील महिलांना व्यावसायिक दिशा दाखविली आहे. ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ संस्थेच्या माध्यमातून लोहा आणि कंधार तालुक्यातील १३० गावांमध्ये संपर्क साधत महिलांसाठी आर्थिक साक्षरता, उद्योग प्रशिक्षणातून सुमारे १५,००० महिलांचे मजबूत नेटवर्क उभे राहिले आहे. या माध्यमातून महिलांना गरजेनुसार योग्य मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत ७५० महिलांनी यशस्वी लघुउद्योग सुरू केले आहेत. यामध्ये शेळीपालन, कोंबडी पालन, भाजीपाला शेती, रोपवाटिका, डाळ मिल, चक्की,शिवणकाम, कापड व्यवसाय, जनरल स्टोअर्स,बांगडी व्यवसाय आणि हळद,मिरची, मसाला प्रक्रिया उद्योगाचा समावेश आहे.

महिला शेतकरी कंपनी

२०२२ साली ‘प्रेमा सखी शेतकरी महिला उत्पादक कंपनी’च्या उभारणीतून रेवतीताईंच्या नेतृत्वाखाली महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. गावशिवारातील ५५० महिला सदस्यांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली, जी आज ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक प्रगतीची दिशा बनली आहे. कंपनीच्या माध्यमातून सध्या गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क निर्मिती केली जाते. येत्या काळात हळद प्रक्रिया, शेतीमाल प्रक्रिया उद्योगाची सुरवात करण्यात येणार आहे.

एक एकर सेंद्रिय शेती मॉडेल

स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या कामामधून रेवतीताईंनी ‘एक एकर सेंद्रिय शेती मॉडेल’ उपक्रमास सुरवात केली. गटातील प्रत्येक महिलेने त्यांच्या कुटुंबाच्या एकूण शेतजमिनीपैकी किमान एक एकरावर सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास रेवतीताईंनी प्रोत्साहित केले. पीक व्यवस्थापनात सेंद्रिय खत, कंपोस्ट खताचा वापर केला जातो. जैविक कीडनाशकांच्या वापरावर भर आहे.

रेवतीताईंच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम लोहा, कंधार तालुक्यातील १३० गावातील १५,००० महिलांपर्यंत पोहोचला असून सुमारे १५,००० एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापन केले जाते. या उपक्रमातून पीक उत्पादनाबरोबरीने बदलत्या सामाजिक गरजांना दिशा मिळाली. या सेंद्रिय अन्नधान्य उपक्रमामुळे रसायन अवशेषमुक्त भाजीपाला, धान्य उपलब्ध होऊ लागले.

कुटुंबांचे आरोग्य सुधारले, औषधांवरील खर्च कमी झाला. शेतीमध्ये महिलांचा तांत्रिक सहभाग वाढला. स्थानिक बाजारपेठेत महिलांना थेट शेतीमाल विक्रीची संधी मिळाली. यातून सेंद्रिय शेती आणि अन्न सुरक्षा या विषयांची ग्रामपातळीवर जनजागृती झाली आहे. रेवतीताईंनी महिला आणि मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी परसबाग उपक्रम राबवला आहे. रक्ताची कमतरता आणि कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी ३० गावांमध्ये सुमारे १२०० परसबागांची उभारणी करण्यात आली आहे.

गृह उद्योगाला गती

रेवतीताईंनी छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या मसाला निर्मिती उद्योगाने गावशिवारात स्वतःची ओळख तयार केली. यातून व्यवसाय वृद्धी होत त्यांनी २०१५ मध्ये 'जय दुर्गा महिला गृह उद्योग' या नावाने ब्रँड तयार केला. त्याची प्रमाणपत्रे देखील घेतली. सध्या प्रक्रिया उद्योगामध्ये दर महिन्याला १०० किलो हळद पावडर, २५ किलो मिरची पावडर, दहा किलो मिश्र मसाला (गरम मसाला, धणे-जिरे),१०० किलो गहू पीठ,२०० किलो गहू दळण तसेच २५० किलो विविध प्रकारच्या डाळींचे उत्पादन होते.

सेंद्रिय हळद आणि दर्जेदार मसाल्यांपासून विविध प्रक्रिया उत्पादने तयार केली जातात. गुणवत्तेमुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांकडून थेट सेंद्रिय हळदीची खरेदी करून त्यावर प्रक्रिया, पॅकिंग आणि विक्रीची जबाबदारी स्वतः रेवतीताई आणि पती सांभाळतात. या उद्योगात पाच महिलांना रोजगार मिळाला आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध प्रदर्शने, मेळाव्यामध्ये सहभाग तसेच गावशिवारातील बाजारपेठेतील दुकानदारांशी सातत्याने संपर्कात राहतात. प्रक्रिया उद्योगामधून प्रति महिना २५,००० रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

पुरस्कारांनी सन्मान

लोकमत सखी मंच पुरस्कार.

कृषिथॉन युवा उद्योजक पुरस्कार.

अ‍ॅग्रोवन युवा उद्योजक पुरस्कार.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते सीआयआय फाउंडेशनचा नॅशनल वुमन एक्सएम्पलर ॲवॉर्ड -२०२५.

सौ. रेवती कानगुले ८६६८७९१७६१, डॉ. माधुरी रेवणवार ९४०३९६२०१४

(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख म्हणून कार्यरत आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com