
Integrated Farming: नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी छगनराव जाधव यांनी नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल परिस्थितीतून उत्कृष्ट व्यवस्थापन ठेवून एकरी १२ ते १५ टन उत्पादकता साध्य केली आहे. सेंद्रिय व रासायनिक असा एकात्मिक मेळ साधून रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनातून किलोला शंभर रुपयांच्या पुढेच कायम दर मिळवला आहे. जमीन सुपीकता व काटेकोर खत व्यवस्थापनावर प्रमुख भर दिला आहे. आजमितीला ४२ एकरांवर निर्यातक्षम डाळिंब शेती विस्तारली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील छगनराव जाधव यांनी प्रयोगशील डाळिंब उत्पादक अशी ओळख तयार केली आहे. मात्र ही ओळख तयार करण्यासाठी त्यांना सुरुवातीपासून कष्टही भरपूर घ्यावे लागले आहेत. सन १९९४ मध्ये भांडवलाची जुळवाजुळव करून एक एकरात गणेश वाणापासून डाळिंब लागवडीचा श्रीगणेशा केला. अडचणी सोडविण्यासाठी अभ्यासपूर्वक पर्याय शोधले.
त्यातूनच टप्प्याटप्प्याने व्यवस्था निर्माण केल्या. मागील २० वर्षांत टप्प्याटप्प्याने डाळिंबाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला. उत्तम व्यवस्थापनाची जोड देत निर्यातक्षम उत्पादन घेण्यावर जाधव यांचा भर असतो. या अनुषंगाने आदर्श शेती पद्धतींचा (गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस) ते काटेकोर अवलंब करतात. गुणवत्ता व प्रतवारी राखण्याकडे कल असतो. सध्या छगनराव यांची मुले प्रवीण व सचिन शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळत आहेत.
जमिनीच्या सुपीकतेवर भर
मागील काही वर्षांपासून या डाळिंब पट्ट्यात प्रामुख्याने तेलकट डाग, मर रोग आदी रोगांच्या मुख्य समस्या तयार झाल्या आहेत. अशा वेळी उत्पादन टिकवणे हे आव्हान होते. मात्र जाधव यांनी सेंद्रिय व जैविक घटकांचा अधिकाधिक वापर सुरू केला. त्यातून जमिनीचे आरोग्य, भौतिक, रासायनिक गुणधर्म सुधारणे व झाडांमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण करणे या बाबींवर मुख्य भर दिला. कंपोस्ट खतनिर्मिती करण्यासाठी दरवर्षी ३० ट्रक ट्रॉली शेणखत, २०
ट्रॉली मळी, तीन ट्रक कोंबडीखत यांचा वापर केला जातो. यामध्ये केएसबी, पीएसबी, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, इएम द्रावण आदी घटक मिसळून १० गुंठे जागेवर डेपो तयार केला जातो. यंत्राच्या साह्याने घटक एकसारखे मिसळून डेपो एक ते दीड महिना ठेवला जातो. सेंद्रिय पद्धतीने कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मिश्रणाचा गरजेनुसार वापर होतो.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन
मृगबहार व आंबेबहार अशा दोन्ही पद्धतीने व्यवस्थापन होते. मृग बहर धरण्यापूर्वी रापलेल्या खताचा वापर मार्च महिन्यात करण्यात येतो. प्रति झाड ३० ते ३५ किलो प्रमाणात बोदावर ते देण्यात येतो. त्यानंतर बोनमील १ ते २ किलो प्रति झाड दिले जाते. यासह पुढे १५ दिवसांच्या फरकाने विश्रांती काळात सिंगल सुपर फॉस्फेट, मॅग्नेशिअम, अमोनिअम सल्फेट एकत्र करून दोन ते अडीच किलो प्रमाणात प्रतिझाडाला दिले जाते. सल्फेट ऑफ पोटॅश, १५:१५:१५ किंवा १०:२६:२६ यांचे प्रमाण ५०० ते ७०० ग्रॅम असते.
बहर धरण्यापूर्वी व पुढे फळांचे १०० ते २०० ग्रॅम वजन झाल्याच्या अवस्थेतही त्यांचा वापर होतो. तिसऱ्या टप्प्यात माल निघण्याच्या एक ते दीड महिना आधी आकार, रंग व टिकवणक्षमता वाढीसाठी एरंडी, शेंगदाणा, सरकी यांचे मिश्रण असलेली ढेप प्रति झाड एक किलोपर्यंत दिली जाते. त्यामुळे झाडे सशक्त होऊन गुणवत्तापूर्ण फळधारणा होते. पावसाळ्यात जमीन ओली असल्याने हानिकारक बुरशी वाढतात. ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास व बॅसिलस या मित्रबुरशींवर आधारित घटकांचा ठिबक सिंचन व फवारणींद्वारे वापर करून बुरशींचे नियंत्रण केले जाते.
अन्नद्रव्यांचा संतुलित वापर
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या शिफारशीनुसार व हवामान अंदाजानुसार बागेचे व्यवस्थापन केले जाते. बागेच्या विश्रांती काळात अन्न साठवणुकीकडे लक्ष दिल्याने झाडे सशक्त होतात, तर छाटणीनंतर बोर्डो फवारण्या अन् तीन टप्प्यांत पानगळ बाग धरल्यानंतर झाडांची काडी सशक्त केली जाते. बागेत सूत्रकृमी नियंत्रणावरही भर असतो. दरवर्षी प्रति झाड सरासरी एक ते दोन किलो निंबोळी पेंडीचा वापर होतो. अन्नद्रव्यांच्या संतुलित वापराने झाडाची प्रतिकारक शक्ती वाढते.
तेलकट डाग व मर रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येतो. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर या अन्नद्रव्यांचा ‘बेसल डोस’ द्वारे वापर होतो. फळे गुंज अवस्थेत असताना कॉपर, झिंक आदींची फवारणी व ठिबकमधूनही मात्रा दिली जाते. म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅशचाही त्यात समावेश असतो. फळांची काढणी झाल्यानंतर बागेला चार महिन्यांचा विश्रांती काळ दिला जातो. यात सूक्ष्म अन्नद्रव्ये व ईएम द्रावणनिर्मिती करून मात्रा दिली जाते.
तंत्रज्ञानाचा वापर
मजूर टंचाईवर मात करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी खते व फवारणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर मागील काही वर्षांत वाढवला आहे. झाडांच्या दोन्ही बाजूंनी ओळीत एकेरी पद्धतीने खत देण्यासाठी स्वयंचलित यंत्र वापरले जाते. तर सरी ओढून घेण्यासाठीही यंत्रे आहेत. यासह तण नियंत्रणासाठी यंत्रे आहेत. यासह सन बर्निंग व बुरशी नियंत्रण, डाळिंब गुणवत्ता वाढीसाठी संरक्षित क्रॉप कव्हर पद्धतीचा वापर होतो.
संपूर्ण क्षेत्रावर केंद्रिकृत (सेंट्रलाइज्ड) पद्धतीने ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. झाडांच्या दोन्ही बाजूंना ठिबक नळ्या, ताशी आठ लिटर डिस्चार्ज क्षमता असून प्रति झाड ३२ लिटर सिंचन केले जाते. पाण्याची शाश्वती मिळवण्यासाठी दोन एकरांत शेततळे तयार केले आहे. गिरणा धरण व नदीवरून पाइपलाइन केली आहे.
शंभर रुपयांच्या पुढेच दर
जाधव कुटुंबाची आज एकूण शेती ५० एकरांवर विस्तारली आहे. पैकी डाळिंब लागवड ४२ एकरांवर आहे. सुपर भगवा हे वाण असून १४ बाय ८ फूट हे लागवड अंतर आहे. प्रवीण सांगतात की पाच वर्षे पुढील वयाच्या झाडांना प्रति एकर १२ ते १५ टनांपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. गुणवत्तापूर्ण माल असल्याने प्रति किलो १०० रुपयांच्या आत शक्यतो दर आलेला नाही. किलोला १२५ ते १५० रुपये किंवा त्यापुढेच दर मिळाला आहे. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के निर्यातक्षम तर २५ टक्के मालाची स्थानिक बाजारात विक्री होते.
प्रवीण जाधव ९८३४२७६५९१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.