Pomegranate Farming: काटेकोर व्यवस्थापनातून साधला आर्थिक उत्कर्ष

Agriculture Success Story: पुणे जिल्ह्यातील संदीप काळाने यांनी पारंपरिक शेतीच्या माध्यमातून काटेकोर व्यवस्थापन, पीक वैविध्य, यांत्रिकीकरण आणि दीर्घमुदतीच्या कर्जाविना शेती करत आर्थिक समृद्धी साधली. आज ते १७ एकर शेती, वर्षाकाठी सुमारे ३० लाखांचे उत्पन्न, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उच्चशिक्षित मुलांचे कुटुंब उभारण्यात यशस्वी झाले आहेत.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune Farming Success: पुणे जिल्ह्यातील धालेवाडी (ता पुरंदर) येथील संदीप काळाने यांनी योग्य आर्थिक नियोजनातून वडिलोपार्जित शेतीमध्ये ९ एकरांची भर घातली. एकाच पिकावर अवलंबून न राहता डाळिंब, सीताफळ, जांभूळ अशा विविध फळबागा, गुलाब शेती आणि ऊस शेतीच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर केली. दीर्घ मुदतीचे कर्ज घ्यायचे नाही, शेती व साधनांमध्येच गुंतवणूक करणे ही त्यांची मुलभूत तत्त्वे आहेत.

पुणे जिल्‍ह्यातील धालेवाडी (ता पुरंदर) येथील संदीप काळाने यांची वडिलोपार्जित ८.२५ एकर शेती होती. त्यांचे वडील महादेव हे शेतात कांदा, टोमॅटो, ऊस, बाजरी इ. पारंपरिक पिके घेत. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळापासूनच शेतात वडिलांना मदत करत. १९९४ पासून ते पूर्णवेळ शेती करू लागले. संपूर्ण शेतातून वार्षिक केवळ तीन लाखांचे उत्पन्न हाती येत असल्याने डाळिंबासारखे नगदी पीक आपल्या शेतात असले पाहिजे, असा त्यांनी ध्यास घेतला. त्यासाठी इंदापूर, दौंड, बारामती येथील डाळिंब उत्पादकांच्या शेतांना भेटी देत माहिती घेतली.

२००४ मध्ये डाळिंबाचे मिळाले पहिले उत्पन्न

२००२ मध्ये २ एकरवर १० बाय १२ फूट अंतरावर ६६४ डाळिंब झाडे लावली. दोन वर्षांनंतर पहिल्या बहराचे (वाणगी) एक लाख रुपये उत्पन्न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. २००६ मध्ये आणखी तीन एकर क्षेत्रामध्ये ९७५ झाडे लावली. डाळिंबाचा दर्जा आणि उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी प्रगतिशील शेतकऱ्यांसोबतच केव्हीके, बारामतीमधील तज्ज्ञांकडून व्यवस्थापनाची माहिती घेतली. २००४ मध्ये लावलेली बाग २०१८ पर्यंत चालवली.

Pomegranate Farming
Agriculture Success Story : व्यावसायिक पीक पद्धतीद्वारे शाश्‍वतीची दिशा

२००४ ते २०१८ पर्यंत डाळिंबाचे उत्तम उत्पन्न मिळत गेले. त्यातून रक्कम शिल्लक टाकत विविध टप्प्यांत ३ ते १२ लाख रुपये प्रति एकर दराने ९ एकर माळरान खरेदी केले. एकूण ८७ लाखात घेतलेल्या या जमिनीच्या विकासासाठी १० लाखांचा खर्च केला. या चोपण जमिनीमधील बाभळी काढल्या, बांधबंदिस्ती केली, माती भरली आणि धरणावरून पाइपलाइन करत जमीन शेतीयोग्य केली. त्यात ऊस, सीताफळ आणि गुलाबाची शेती सुरू केली. आता त्यांची ऊस आणि डाळिंब ही मुख्य पिके बनली असून, गुलाब, सीताफळ आणि जांभूळ ही उपपिके ठरली आहेत.

काटेकोर व्यवस्थापनात, खर्चात काटकसर नाही...

डाळिंब हे त्यांचे प्रमुख पीक असून, त्याच्या दर्जावरच दर अवलंबून असतो. त्यामुळे काटेकोर व्यवस्थापन करताना खर्चात अनावश्यक काटकसर करत नाही. लहरी हवामानापासून संरक्षणासाठी क्रॉप कव्हर केले असून, त्यासाठी एकरी एक लाख रुपये इतका खर्च झाला. त्यामुळे रोग आणि किडींच्या प्रसाराला अटकाव होतो. फवारणीवरील खर्चात मोठी बचत होते. उन्हाळ्यामध्ये फक्त ४५ टक्के इतकेच ऊन झाडांपर्यंत पोहोचते. झाडावरील ताण कमी होतो. फळांवर उन्हामुळे चट्टे (सनबर्निंग) पडत नाहीत.

नियमित माती, पाणी परीक्षण, त्यानुसार रासायनिक खतांची मात्रा दिल्या जातात.

हंगाम संपल्यावर पुढील हंगामाच्या नियोजनासाठी शेणखत, लेंडीखत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्यांची मशागतीच्या वेळी मात्रा दिल्या जातात.

संपूर्ण फळबाग व गुलाब शेतीला ठिबक केले आहे. त्यामुळे पाणी बचत साधते. विद्राव्य खते देता येतात.

खतमात्रा दिल्यानंतर दीड महिना ठिबकद्वारे पाणी दिले जाते. त्यानंतर बाग ताणावर सोडली जाते.

हा विश्रांती काळ पिकासाठी महत्त्वाचा असून, त्या काळातच काड्यांमध्ये अन्नद्रव्यांची साठवण होते. काड्या सुदृढ झाल्या की कळी मोठी निघते. फुले चांगली वाढून फळांची संख्या चांगली राहते.

संपूर्ण काड्यांना आणि फळांना सूर्यप्रकाश मिळेल अशा पद्धतीने कांड्याची छाटणी केली जाते. त्यामुळे फळांचा आकार मोठा होतो.

बागेमध्ये कधीही रासायनिक तणनाशकांचा वापर केला जात नाही.

झाडांना नैसर्गिक मल्चिंग म्हणून गवतांचा वापर केला जातो. गवतामुळे बागेतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

वार्षिक साधारण ३० लाखांचे उत्पन्न

Pomegranate Farming
Pomegranate Farming: कृत्रिम बुद्धिमत्तेचा डाळिंब शेतीतही वापर

टीप

यंदा डाळिंबाचा दुसरा बहर असून, या वर्षी साधारण १३ ते १४ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

२०१७ मध्ये पेरू फळबाग लागवड केली होती. पहिली तीन वर्षे फळांचा आकार व दर्जा चांगला मिळाला. मात्र त्यानंतर अपेक्षेप्रमाणे फळांचा आकार मिळेनासा झाला. परिणामी, दर कमी मिळू लागले. त्यामुळे २०२४ मध्ये ही फळबाग कमी केली. त्याऐवजी गुलाबाची व डाळिंब लागवड वाढवली.

शेती सुविधांमध्ये केली वाढ

दरवर्षीच्या उत्पन्नातून हळूहळू सर्व शेतीला पुरतील इतकी सिंचनाची साधने निर्माण केली. सध्या त्यांच्याकडे ३ विहिरी, ४ बोअरवेल आणि एक पाणी उपसा योजना आहे. संरक्षित सिंचनासाठी ५४ गुंठे क्षेत्रावर एक कोटी ६५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे केलेले आहे.

शेती वाढली, तसा त्यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला. मशागतीच्या ओढकामांसाठी ५० एचपीचा, तर फवारणी आणि बागांमधील आंतरमशागतीच्या कामांसाठी २७ एचपीचा छोटा ट्रॅक्टर घेतला. सोबतच ब्लोअर, फवारणी यंत्र, पॉवर टिलर, ब्रश कटर, फळ क्रेट बागेतून बाहेर काढण्यासाठी टू व्हीलर आणि ट्रॅक्टरला जोडण्यायोग्य छोटा गाडा (१२ ते १८ क्रेट क्षमता) अशी यंत्रे व अवजारे विकत घेतली आहेत.

शेतीच्या व्यवस्थापनामध्ये घरातील सर्व व्यक्ती हिरिरीने भाग घेतात. मदतीला एक मजूर कुटुंब आहे. मात्र संपूर्ण १७ एकर शेतीकामे केवळ चार जणांच्या साह्याने पार पाडली जातात. फक्त फळ काढणीच्या हंगामात हंगामी मजूर घ्यावे लागतात.

Chart
ChartAgrowon

पीक कर्जाशिवाय कोणतेही कर्ज नाही

अधिक व दर्जेदार उत्पादनातून उत्पन्नाची हमी मिळते. कोणत्याही कौटुंबिक किंवा शेतीच्या मोठ्या कामांसाठी पीक कर्जाव्यतिरिक्त कधी दीर्घमुदतीचे कर्ज काढायचे नाही, हे त्यांनी ठरवले आहे. विकास सोसायटीचे फक्त पाच लाखांचे पीककर्ज असून, तेही आम्ही नियमित भरतो. पीककर्ज माफ होईल या आमिषावर कधी विसंबत नाही, हे संदीप काळाने अभिमानाने सांगतात.

मुलांच्या उच्चशिक्षणावर भर

संदीप यांनी दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी उत्कर्षा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता म्हणून नोकरी करत आहे. दुसरी मुलगी सिद्धी बी.कॉम. करत असून, ती पॉवर लिफ्टिंग या क्रीडा क्षेत्रात नशीब आजमावत आहे. ती राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. तर मुलगा विठ्ठल हा कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहे. शेतीमधील उत्पन्नावरच मुलांना उच्चशिक्षित करू शकल्याचे ते अभिमानाने सांगतात. विठ्ठलही शेतीतील ट्रॅक्टरद्वारे मशागत, विविध फवारण्या इ. कामे करण्यात तरबेज झाला आहे.

रोखीने बंगला बांधला

आलेल्या उत्पन्नातून शेतीतील छोटीमोठी कामे करण्यावर प्रथम भर दिला. ती पूर्ण होऊन शेती स्थिरस्थावर झाल्यावर येणाऱ्या उत्पन्नाची घर बांधण्यासाठी बचत केली. या ५० लाखांच्या बचतीतूनच एक पैही कर्जाऊ न घेता दोन वर्षांपूर्वी सुसज्ज बंगला बांधला आहे. बंगला बांधण्यासाठी कोणालाही कंत्राट दिले नाही. स्वतः बांधकाम साहित्य आणून घर बांधून घेतल्यामुळे सुमारे ५ लाखांची बचत झाल्याचे ते सांगतात.

- संदीप महादेव काळाने, ९८८१३०९०४३

(धालेवाडी, ता.पुरंदर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com