Agro Tourism Pune : शेती इकली नाय, तर राखली...

Rural Entrepreneurship : कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी गावातच रोजगार निर्मिती केली आहे. वर्षाला कोट्यवधींची उलाढाल करून त्यातून अर्थव्यवस्था सुदृढ केली आहे.
Agro Tourism Pune
Agro Tourism Pune Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याला निसर्ग- वनसंपदेचे कोंदण लाभले आहे. तालुक्यातील विविध गावे सह्याद्री डोंगररांगांमध्ये विसावली आहेत. मावळ आणि मुळशी तालुक्याच्या सीमेवरील तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले काशिग हे त्यापैकीच गाव. सुमारे २५० ते ३०० उंबऱ्यांच्या या टुमदार गावची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास आहे.

गावचे अर्थकारण फक्त पावसाळी व त्यातही भातशेती अवलंबून. त्यामुळे पावसाळा संपला, की घराघरांतील तरुण आणि कर्ती माणसे शहरात स्थलांतरित होतात. यात बाजार समितीमध्ये हमाली, परिसरातील कंपन्यांमध्ये मिळेल ती नोकरी, वाहनचालक आदी स्वरूपातील रोजगार ते शोधतात.

पर्यटन केंद्राने थांबवले स्थलांतर

रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे यासाठी गावातील तरुण प्रयत्नशील होते. मात्र त्यासाठी गावातच उदरनिर्वाहाचे भक्कम, शाश्‍वत साधन निर्माण होणे गरजेचे होते. निसर्गाने भरभरून देणे दिलेल्या या गावात कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मोठा वाव असल्याचा पर्याय येथील भूमिपुत्र सुरेश मराठे या तरुणाने शोधला. पुणे शहर जवळ असल्याने शहरी ग्राहक आकर्षून घेण्याचीही संधी होती. त्यादृष्टीने मराठे यांनी तिकोना फार्म हे गावातील पहिले कृषी पर्यटन सुरू केले.

केंद्राचा विस्तार

दहावीनंतर ‘आयटीआय’ करून एकेकाळी रोजगारासाठी गाव सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यांनी इंजिनिअरिंगमधील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीचा अनुभव घेतला. मात्र कष्टापेक्षा मोबदला कमी होता. शिवाय घरची शेती पडीक राहात होती. सन २००५ मध्ये उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्रातून या समस्यांना पूर्णविराम मिळाला.

तिकोना किल्ल्याला भेट देण्यासाठी येणारे गिर्यारोहक, पर्यटक यांना मराठे यांचे पर्यटन केंद्र खुणावू लागले. मराठे यांच्या आईने घरीच स्वयंपाक करून ग्राहकांच्या जेवणाची सोय केली. केंद्रात एकेक सुविधा उभारण्यास सुरुवात केली. हळूहळू ग्राहकांची संख्या वाढत गेली. चांगले उत्पन्न हाती येऊ लागले. एकेक करीत आज आठ खोल्या व विविध सुविधा उभारण्यापर्यंत तिकोना कृषी पर्यटन केंद्राचा विस्तार झाला आहे.

Agro Tourism Pune
Agro Tourism: कृषी-पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा अध्याय

अन्य युवकांना मिळाली प्रेरणा

मराठे यांची धडपड, उद्योजकीय कौशल्य व मिळत असलेले यश पाहून गावातील अन्य तरुणांनाही कृषी पर्यटन केंद्र उभारणीची प्रेरणा मिळाली. आपल्या शेताच्या जागेतच त्यांनी छोटे बांधकाम करून केंद्रे उभारण्यास सुरुवात केली. आज हीच केंद्रे त्यांच्या शाश्‍वत रोजगाराची साधने झाली आहेत. आपला अनुभव सांगताना स्वप्न सरोवर कृषी पर्यटन केंद्राचे सुनील टेमघरे म्हणाले, की आमची शेती पाण्यात गेली होती.

दोन एकर डोंगराळ शेती होती. त्यात केवळ भात व्हायचा. मराठे यांच्या प्रेरणेतून कृषी पर्यटन सुरू करण्याचा महत्त्वाचा पर्याय हाती लागला. आता एकेक करीत काशिग गाव परिसरात १० ते ११ कृषी पर्यटन केंद्रे सुरू आहेत. त्यांची संख्या वाढतही आहे. एकमेकांच्या अडचणी सोडवत, प्रोत्साहन देत आम्ही मालक- उद्योजक झालो आहोत याचे मोठे समाधान आहे.

तिडके पितापुत्र निघाले शहरातून गावाकडे

अमित तिडके हा पंचविशीतील अभियंता तरुण. एकेकाळी चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहतींमध्ये नोकरीसाठी मुलाखत देत तो वणवण फिरायचा. अपेक्षित पगाराची नोकरी काही मिळत नव्हती. आपल्या गावात उभारलेली पर्यटन केंद्रे त्यालाही हा उद्योग करण्यासाठी खुणावू लागली.

वडील नामदेव यांच्यासोबत चर्चा करून स्वतःचे पर्यटन केंद्र सुरू करण्याचा त्याने निश्‍चय केला. त्याचे वडील पुण्यात नोकरी करायचे. त्यांनाही पाठीचा विकार होता. अखेर मुलाप्रमाणे त्यांनीही गावी परतण्याचा निर्णय घेत आपल्या उद्योगात रमायचा निर्णय घेतला. लवकरच आपले स्वप्न साकार होणार असल्याचे समाधान अमित व्यक्त करतात.

Agro Tourism Pune
Konkan Agro Tourism: माझ्या कोकणचो रुबाब भारी!

उद्योगातून फुलतेय गावचे अर्थकारण

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयांतर्गत मुख्यमंत्री शाश्‍वत रोजगार निर्मिती योजनेतून २० लाखांचे कर्ज, महिलांना ३५ टक्के, तर पुरुषांना ३० टक्के अनुदान अशी मदत केली जाते. पर्यटन विभागाच्या कृषी पर्यटन विकास योजनेअंतर्गत आई योजनेतही कर्ज व्याजमाफीची योजना आहे. या योजनांचा लाभ काशिग गावातील युवकांनी घेतला आहे.

सर्व केंद्रांचा विचार करायचा झाल्यास गावात दर आठवड्याला एकूण सुमारे एक हजार पर्यटकांचा गावात राबता असतो. प्रति पर्यटक कुटुंबाकडून किमान हजारांहून अधिक खर्च होतो.

या माध्यमातून महिन्याला ४० ते ५० लाखांची तर वर्षाला काही कोटींची उलाढाल गावात होत असावी. प्रत्येक कुटुंबाचे शेती व घरचे अर्थकारण आता सक्षम झाले आहे. प्रति पर्यटन केंद्रात १० जणांना प्रत्यक्ष, तर २५ जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. अप्रत्यक्ष रोजगारामध्ये दूध, भाजीपाला, वाहनचालक आदींचा समावेश आहे.

लवकरच कृषी पर्यटन सहकारी सोसायटी

कृषी पर्यटन उद्योगाद्वारे सहकारातून समृद्धी साधण्यासाठी गावातील सर्व कृषी पर्यटन केंद्रचालकांनी एकत्र येण्याचा विचार सुरेश मराठे यांनी मांडला आहे. त्यादृष्टीने काशिग सहकारी कृषी पर्यटन सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. नाबार्डसह राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थपुरवठा योजनांमधून ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे.

काशिग गावातील कृषी पर्यटन केंद्रे

   तिकोना फार्म्स कृषी पर्यटन संदीप मराठे ९८२३४०७७००

   स्वप्न सरोवर कृषी पर्यटन सुनील टेमघरे ९६३७१०५४८८

   रेड सॉईल ॲग्रो फार्म रोहिदास टेमघरे ९९६०२२११८८

   जलदूर्ग ॲग्रो फार्म संदीप पायगुडे ८०८७६२३८९२

   फुलराई फार्म स्वप्नील टेमघरे ९०११९५९३१०

   युनिक पाथ दत्ता शेळके ७३७८५११०००

   शिंदे तिकोना व्हॅली फार्म मारुती शिंदे ९८५०६३८४१४

   मूळवण व्हिलेज संदीप टेमघरे ९४२०१५८०७१

   तुकाई कृषी पर्यटन तानाजी बोंद्रे ९०४९३७२१४०

   अमित तिडके (केंद्र उभारणीच्या अवस्थेत) ७७७६९०२१५४

   नंदू डफळ (केंद्र उभारणीच्या अवस्थेत) ९८२३२२३४२३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com