
एकनाथ पवार
Konkani Culture: टुमदार घराला देखणी वाडी, मौजेनं राहुया, विहिरीत पोहुया, समुंदराची दौलत न्यारी कोकणची भावानू कराल वारी, गड्या विसरून जाशील दुनियादारी, माझ्या कोकणचो रुबाब भारी!! हे गीत ऐकल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंबे गाव डोळ्यासमोर येते. याच गावातील ओंकार गावडे या तरुणाने नोकरीला प्राधान्य न देता कृषी पर्यटन केंद्र विकसित करून रोजगारनिर्मिती व आर्थिक स्वयंपूर्णता मिळवली आहे. त्यातून अस्सल कोकणी जीवन, संस्कृती व आहारशैलीचा अनुभव देताना देश, परदेशातील पर्यटकांना भुरळ घातली आहे.
कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. पश्चिमेला अथांग समुद्र, पूर्वेला गर्द दाटीने सजलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आंबा, काजू,नारळ, सुपारीच्या हिरव्यागार बागा हे कोकणात ठिकठिकाणी दिसणारे चित्र पर्यटकांना भारून टाकते. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. मात्र या भागात जे काही पर्यटन बहरले ते बहुतांश समुद्रकिनाऱ्यावरील भागातच. उर्वरित भाग नैसर्गिक साधन समृद्धीचे नटलेला असूनही तेथे पर्यटन केंद्राच्या अनुषंगाने फार विकास झाला नाही हे वास्तव आहे.
गावातच करिअर करण्याची मनिषा
कोकणातील अनेक गावे डोंगराच्या कुशीत वसलेली आहेत. दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावालाही निसर्गाचे असेच वरदान लाभले आहे. टुमदार घराला देखणी वाडी, मौजेनं राहुया, विहीरीत पोहुया, समुंदराची दौलत न्यारी कोकणची भावानू कराल वारी, गड्या विसरून जाशील दुनियादारी, माझ्या कोकणचो रूबाब भारी!! हे गीत ऐकल्यावर तर झोळंबे गाव अगदी आवर्जून डोळ्यासमोर येते. बांदा शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवर हे गाव आहे.
नारळ, सुपारी, आंबा, काजू, फणस, जायफळ, मिरी, केळी, अननस, कोकम यासह मसाला पिकांचे उत्पादन येथे घेतले जाते. पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांवर ही शेती केली जाते. याच गावात युवा शेतकरी ओंकार हरीश गावडे राहतो. त्याने ओरोस येथे कृषी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शेतीचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने कोकणातील अन्य तरुण ज्याप्रमाणे मुंबई, पुण्याकडे नोकरीस जातात तसा विचार ओंकार यांच्या मनात आला नाही. उलट गावात राहून वडिलोपार्जित शेतीत नावीन्यपूर्ण काही करावे असा विचार मनात घोळायचा.
पर्यटन केंद्राची उभारणी
गावातील मित्रांसोबत चर्चा करताना पर्यटन केंद्राचाही विषय निघायचा. दरम्यान कोकणातील शाश्वत जीवनशैली हा विषय घेऊन सतत कार्यरत असलेल्या प्रसाद गावडे यांच्याशी संपर्क आला. त्यांनी गावातील निसर्गाला धक्का न लावता कृषी पर्यटन कसे फुलवता येऊ शकते याविषयी दिशा दिली. पर्यावरणाचा ऱ्हास करून उभे राहिलेले उद्योग फार काळ टिकणार नाही. किंबहुना त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असे अमूल्य मार्गदर्शनही केले. त्यानंतर कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय ओंकार यांनी घेतला. पारंपरिक जीवनशैलीचे पर्यटन केंद्र कसे फुलविता येईल यावर भर दिला.
सुरवातीला गावातील १०० वर्षांपेक्षा अधिक जुने असलेले घर मिळविले. त्याच्या भिंती मातीच्या आणि छप्पर कौलारू आहे. कोकणातील परिपूर्ण कौलारू असेच हे घर होते. त्याला नवा मात्र पारंपरिक लुक देण्यासाठी मित्र शिवम गावडे, ओंकार कुंदेकर, ऋषभ कुंदेकर यांची मदत झाली. घरातूनही निसर्गाचे सुंदर रूप न्याहाळता येईल अशा सर्वकष विचार करून घर दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
असे फुलले पर्यटन केंद्र
ओंकार यांची १२ एकर शेती आहे. त्यात सुपारीची दोन हजार, नारळ २००, आंबा १००, काजू ५००, फणस १००, केळी ५०० अशी झाडे व मसाला पिकांचीही लागवड आहे. दहा ते पंधरा गायी, म्हशी आहेत. सन २०२३ मध्ये सुरू केलेले कृषी पर्यटन हे या शेतीसाठी पूरक व्यवसायाचे उत्तम साधन ठरले आहे. पर्यटकांच्या निवासासाठीच्या १०० वर्षे जुन्या मातीच्या घरात तीन खोल्या, सभागृह, बाल्कनी आहे. एका वेळी २० पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. वर्षभरात सुमारे २५०० च्या आसपास पर्यटक येथे भेट देतात. घरची फळबाग शेती व पर्यटन केंद्र यांची एकत्रित अशी काही लाखांची उलाढाल करणे ओंकार यांना शक्य झाले आहे.
अस्सल कोकणी जेवणाचा आनंद
पर्यटकांना अस्सल कोकणी पध्दतीचे व केळीच्या पानावर शाकाहारी भोजन देण्यात येते. यात हंगामनिहाय फळे, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्यांचा समावेश असतो. चिवारी कोंब, टाकळा, अळूचे फतफते, घावणे-चटणी, रस शिरवाळ्या, उकडीचे मोदक, पातोळ्या, उकडा भात,फणसाची भाजी, केळफुलाची भाजी, कुळिथाचे पिठी, चवळी, मूग अशी विविधता भोजनात पाहण्यास मिळते. तीन- चार महिला सदस्य पारंपरिक भांड्याचा वापर करून जेवण तयार करतात. त्यातून स्थानिक रोजगार मिळाला आहे. दूध, दही, ताक, तूप उपलब्ध करून दिले जातेच. शिवाय गोठ्यात नेऊन पशुपालनाचीही माहिती दिली जाते.
पर्यटन केंद्रातील काही वैशिष्ट्ये
स्नानासाठी तांब्याच्या भांड्यात गरम केलेले व पिण्यासाठी नैसर्गिक स्त्रोंताचे पाणी वापरले जाते. पर्यटकांना फळबागांमध्ये फिरण्याचा व रायवळ आंबा, फणस, रातांबे आदी ताजी फळे खाण्याचा मनमुराद आनंद घेता येतो. पर्यटकांनी गावातील जंगलामधूनही सैर घडवली जाते. त्यातून वन्यफळांची ओळख करून दिली जाते. गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत पर्यटकांना दाखविले जातात. याच पाण्याचे लहान डोह देखील आहेत. तेथे पोहण्याची मौज पर्यटक घेतात.गावातील देवराया, पक्षी निरीक्षण, मातीची कौलारू घरे, पुरातन मंदिरे यांचाही पर्यटक अनुभव घेतात.
गावठी काजूची बी कशा पद्धतीने चुलीमध्ये भाजली जाते, त्यातून गर कसा काढला जातो, पांरपरिक पद्धतीने नारळ, सुपारीसह अन्य फळबागांना पाणी कसे दिले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटक घेतात. मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांबरोबरच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, रशिया, अमेरिका या देशातील पर्यटकांनाही येथे भेट दिली आहे. एकदा भेट दिलेले पर्यटकही पुन्हा येण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.