Agro Tourism Business : शेतीपासून पर्यटन व्यवसायापर्यंतचा यशस्वी प्रवास

Rural Entrepreneurship : गुहागर (जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र आरेकर यांची फयान वादळात ११ एकर केळीबाग नामशेष होऊन पंचवीस लाखांचे नुकसान झाले. पण हिंमत एकवटून नव्या उमेदीने त्यांनी भरारी घेतली.
Agriculture Success Story
agriculture Success Story Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हे तालुक्याचे ठिकाण समुद्री पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भोवताली वेळणेश्‍वरच्या समुद्रकिनारी वसलेले श्री शंकर, तर हेदवीच्या समुद्राजवळील श्री गणपती अशी दोन प्रसिद्ध देवस्थाने.

चिपळूणहून गुहागरकडे येताना गुहागरच्या अलीकडे पाच किलोमीटरवर वरवेली गाव लागते. येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला श्री पूजा कृषी पर्यटन केंद्र व परिसर दृष्टीस पडतो. गुहागर येथे वास्तव्यास असलेले राजेंद्र सीताराम आरेकर यांची येथे २४ एकर समृद्ध बाग आहे.

सुपारीची ११००, काजूची ६५०, आंब्याची ३०० झाडे, त्यासह जायफळ, काळी मिरी, पपई, चिकू, फणस, जांब, बोर, आवळा, लिंबू अशी विविधता आहे. शेती सांभाळण्यासह आरेकर एसटी विभागाच्या अकाउंट्‍स शाखेत नोकरीही करायचे.

फयान वादळात बाग उद्‍ध्वस्त

शेतीत प्रयोगशील राहण्याच्या वृत्तीतून २००७-०८ मध्ये आरेकरांनी ११ एकरांत ११ हजार ग्रॅंननैन केळीची लागवड केली. ते सांगतात, की अत्यंत मेहनतीने मी व पत्नी सुनेत्रा पहाटे साडेपाच वाजता गुहागरहून वरवेलीस येऊन कामांना सुरुवात करायचो. फुलत असलेल्या केळीला पाहातच रोजचा दिवस पार पडायचा.

घड यायला सुरुवात झाली होती आणि ११ नोव्हेंबर २००९ हा दिवस फयान वादळाच्या रूपाने येऊन घात करून गेला. संपूर्ण ११ एकर बाग मातीमोल झाली. केंद्र सरकारचे पथक भेट देऊन गेले. त्यांनी २५ लाखांचे नुकसान दाखवले. (प्रत्यक्ष नुकसान त्याहून अधिक होते.

एक पैसाही भरपाई मिळाली नाही.) डोळ्यादेखत नष्ट झालेली बाग पाहून पत्नी एक महिना अंथरुणाला खिळून होती. जबर धक्का घेतलेल्या पत्नीला त्यानंतर जो मधुमेह आणि रक्तदाब जडला तो आजही कायम आहे. त्यानंतर ठाणे येथील सद्‍गुरूंकडे धाव घेतली. त्यांनी नोकरी सोडून अन्य काही करण्याचा सल्ला दिला.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : एकीच्या बळावर पाटील बंधूंची नेत्रदीपक भरारी ; ५ एकरांपासून ८० एकरांपर्यंतचा प्रवास

नवी उमेद, नवी भरारी

सुमारे ३४ वर्षांच्या अनुभवानंतर २०१२ मध्ये आरेकरांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. फयान वादळानंतर विषण्ण झालेलं मन पूर्णवेळ शेती करण्यासाठी अद्याप खंबीर नव्हतं. बांधकाम व्यवसायात उतरून काही घरे, इमारती व देवळांचे बांधकाम केले. पण त्यात मन रमेना. अंगात भिनलेलं शेतकरीपण, ती जिगर, हिंमत यांनी मनाला पुन्हा शेतीतच उतरण्यासाठी नवी उमेद, भरारी दिली.

आरेकर सांगतात, की अलीकडे हवामान बदलाच्या काळात शेतीतील जोखमीचं स्वरूप भयावह झालं आहे. अशावेळी कृषी पर्यटन संकल्पना केंद्रस्थानी ठेवून त्यास पूरक व्यवसायांचा आधार देण्याचं ठरवलं. गुहागर हे समुद्री पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने या संधीचं सोनं करता येणार होतं.

या संकल्पनेचा भाग म्हणून छोटेखानी रिसॉर्ट सुरू केलं. त्याला अनुकूल परिसर व सुविधा विकसित करण्यास सुरुवात केली. ग्राहकांना सेवा आवडू लागली तशी व्यवसायवृद्धी होत गेली. आज व्यवसायाला दहा वर्षे झाली असून, झाडावृक्षांच्या सान्निध्यातील रम्य, शांत वातावरणातील रिसॉर्टचे विस्तारीकरण केले आहे.

हॉटेल व बाजूलाच श्री पूजा सेवा नावाने प्रशस्त मंगल कार्यालय सुरू केले आहे. आरेकर पती- पत्नी व पाच कर्मचारी असे सात जण मिळून २४ एकर बाग, रिसॉर्ट आणि मंगल कार्यालय असा सर्व कारभार सांभाळतात. मुलगा श्रीस्वरूप केमिकल इंजिनिअर असून, पनवेल येथे नोकरी करतो. मुलगी शिवाली आर्किटेक्ट असून ती मुंबईला असते.

पैशांपेक्षा सेवेला महत्त्व

आरेकर सांगतात, की नोव्हेंबर ते मे हा रिसॉर्टचा मुख्य हंगाम असतो. राज्यातून येथे पर्यटक येतात. एसी, नॉन एसी, स्वच्छ, नीटनेटक्या खोल्या, गिझर, टीव्ही, स्वीमिंग टॅंक, गवताचा हिरवा गालिचा आदी सुविधा येथे आहेत. ग्राहकांना चुलीवरचे घरगुती ताजे, गरम जेवण- नाश्‍ता, अन्य ठिकाणी अभावानेच मिळणाऱ्या कोकणी भाज्या, ताजे मासे, तांदळाचे घावन आदीची मेजवानी असते. एकदा मध्यरात्री सहलीतील पन्नास शाळकरी मुलांना गरम आमटीभात आनंदाने खाऊ घातला. पैशांपेक्षा ग्राहकसेवा आणि माणुसकीस आम्ही अधिक महत्त्व देतो.

आई-वडिलांचे संस्कार जपले

‘माउथ पब्लिसिटी’मुळेच आमची लोकप्रियता झाली आहे. रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी आम्ही कुटुंबालाचा प्राधान्य देतो. कारण गट आल्यास दंगा-मस्ती, आक्षेपार्ह नृत्ये, विविध पेये या गोष्टींना आमंत्रण मिळून वातावरण गढूळ होण्याचा धोका असतो. ऑनलाइन बुकिंग’ ही शक्यतो घेत नाही. कारण ते कुटुंबासाठी की गटासाठी केले हे समजत नाही.

कुटुंब असल्याची खात्री करूनच फोन बुकिंग घेतो. आयुष्यात जेवढे चांगले बोलता येईल, करता येईल तेवढा प्रयत्न करतो. माणसे जोडण्याची आवड आहे. आई-वडिलांचे जे संस्कार झालेले असतात त्यावरच आपण पुढे जात असतो असे आरेकर म्हणतात.

आमच्या मंगल कार्यालयात केवळ पंचवीस हजारांत लग्नकार्य करता येते. त्याची आसनक्षमता ८०० पर्यंत असून, वर्षभरात वीसपर्यंत विवाह सोहळे व छोटे-मोठे कार्यक्रम होतात. एखाद्याला भाडेशुल्क परवडत नसल्यास त्याच्या आवाक्यातील रक्कम स्वीकारूनही कार्य पार पाडण्यात धन्यता मानतो असे आरेकर सांगतात.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : बारमाही उत्पन्न देणाऱ्या शेतीत मिळविली हातोटी

शेतीतील उत्पन्न

कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून आरेकरांकडे पिकांचे प्रयोग सुरू असतात. शेतातच शेणखत, गांडूळ खत आदींची निर्मिती होते. शेतकरी गटाचेही आरेकर सदस्य आहेत. सुपारीच्या बागेतून सव्वादोन टनांपर्यंत उत्पादन, प्रति किलो ४०० रुपयांच्या आसपास दर तर आठ- १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

काजू बागेतून दोन ते अडीच टन बी उत्पादन मिळते. व्यापारी जागेवर येतात. जास्त दर देणाऱ्याला माल देण्यात येतो. नारळाचा स्वतःच्या हॉटेलमध्ये वापर होतो. काळ्या मिरीचे ३५ ते ४० किलो उत्पादन मिळून किलोला ३५० रुपयांपर्यंत दर मिळतो. हापूस आंबा मेच्या उशिरा येतो. तो कॅनिंगला देण्यात येतो.

समाजसेवेचे प्रत

समाजसेवा हा आरेकरांचा मोठा ठेवा आहे. पूर्वी गुहागरमध्ये छोटे सार्वजनिक वाचनालय होते. ती जागा पडायला आली होती. त्या जागी आरेकरांनी दुमजली बांधकाम करून सार्वजनिक वाचनालय उभारले. तेथे तब्बल ३५ हजार पुस्तके आहेत. स्पर्धा परीक्षांची ३५० पुस्तके व मुलांना अभ्यास करण्याची सोय आहे.

आरेकरांनी राजकीय पक्षातही पाच वर्षे कार्य केले. पण साध्या, सरळ मनाला तिथे आनंद न मिळाल्याने ते राजकारणातून पूर्ण बाहेर पडले. त्याचे खूप समाधान वाटते अशी प्रतिक्रिया ते देतात. लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली असून, या प्रवासात पत्नीची साथ अत्यंत मोलाची ठरल्याचेही ते सांगतात.

मुलांच्या शिक्षणाची सोय

सुमारे वीसेक होतकरू मुलांनी आरेकरांच्या घरी राहून शिक्षण पूर्ण केले आहे. वर्षाला एक- दोन मुले तरी शिकवायची हाच शिरस्ता आरेकरांनी जपला. गरजू विद्यार्थ्यांसाठी दवाखाना, औषधे अशी मदतही केली. त्यांचा मुलगा श्रीस्वरूप इंजिनिअरिंगला असताना त्याच्या मित्राकडे फीसाठी पैसे नव्हते.

वर्ष फुकट जाण्याची भीती होती. अशावेळी इंजिनिअर होईपर्यंत त्या मित्राच्या शिक्षणाचे सर्व पैसे आरेकरांनी भरले. पुढे स्कॉलरशिप मिळून तो अमेरिकेला गेला. आता मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरी करतो. ज्या वेळी तो मुलगा पैसे परत करण्याची इच्छा व्यक्त करू लागला त्या वेळी गरजू विद्यार्थ्यांनाच ती मदत कर असा सल्ला देत आरेकरांनी ते पैसे नाकारले.

स्वतःमध्ये जपलेला साहित्यिक

वयाच्या ६६ व्या वर्षी शेती व सर्व व्यवसायांच्या कसरती सांभाळणाऱ्या आरेकरांमध्ये हळवा साहित्यिकही दडला आहे. साद आईस व आई हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. शब्दांना चाली लावून काव्ये सादर करण्याची कला त्यांच्यात आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुहागर तालुक्याचे ते अध्यक्ष आहेत.

‘ॲग्रोवन’चे ते नियमित वाचकही आहेत. ध्येयाच्या वाटेवर चारही बाजूंनी लोक मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. पण सद्‍गुरूंच्या शिकवणीप्रमाणे आजूबाजूला कोण काय म्हणते याचा विचार न करता चालत राहा. एक दिवस तुम्ही माझ्यासारखे ध्येयापर्यंत निश्‍चित पोचाल असा विश्‍वासही आरेकर आवर्जून देतात.

राजेंद्र आरेकर ९७६४४२६३९५, ९४२२६२७२७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com