Success Story : भाजीपाला,शेळीपालनातून आर्थिक समृद्धी

Cultivation of Fruits and Vegetables : उमेद अभियानातील बचत गटांच्या सूक्ष्म नियोजन आराखडा (एमआयपी) सीआरपी म्हणून काम करत असताना समृद्धी पाटील यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वर्षभर पालेभाजी, फळभाजी लागवडीवर भर दिला आहे.
Patil Family
Patil FamilyAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : तोणदे (ता.जि.रत्नागिरी) येथील पाटील कुटुंबीयांची वीस गुंठे शेती आहे. संदेश दिवाकर पाटील हे होमगार्डमध्ये नोकरी करतात. कामाच्या आवश्यकतेनुसार होमगार्डना नियुक्त केले जाते. त्यामुळे त्यांनी उपलब्ध शेतीमध्ये भाजीपाला लागवडीचा विचार केला. यास त्यांच्या पत्नी समृद्धी यांची चांगली साथ मिळाली. २०१३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा घराजवळच असलेल्या तीन गुंठे क्षेत्रावर गावठी हळदीची लागवड केली.

शेतीजवळच असलेल्या नैसर्गिक पाणी योजनेची टाकी भरून गेल्यानंतर त्याचे पाणी पाटील यांच्या जागेतून वाहून जात होते. ते पाणी अडवून त्यावर हळदीची लागवड केली. त्यामधून सुमारे १० किलो हळदीचे त्यांना उत्पादन मिळाले. व्यावसायिकरित्या शेती उत्पादन घेता येऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर समृध्दीताईंनी घराजवळील २० गुंठे जमिनीमध्ये बाजारपेठेची मागणी आणि हंगाम लक्षात घेऊन भाजीपाला लागवडीस सुरवात केली.

यामध्ये प्रामुख्याने भेंडी,लाल माठ, पालक, मेथी, चवळी, कुळीथ, पडवळ, कारले, दोडके, दुधी, तोंडली, तांबडा भोपळा या वर्षभर मागणी असलेल्या भाजीपाल्यांची लागवड करतात. जून महिन्यात भेंडीची लागवड केली जाते. दर महा सुमारे १०० किलो भेंडीची विक्री केली जाते. पाच भेंड्यांची एक जुडी केली जाते. दोन भेंडी जुड्यांची १५ रुपये दराने विक्री केली जाते.

पावसाळ्यात परजिल्ह्यातून रत्नागिरीमध्ये भाजीपाला कमी येत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्याकडील भाजीला मोठी मागणी असते. त्यानंतर लाल माठ, पालेभाज्या आणि अन्य फळभाज्यांची हंगामानुसार लागवड केली जाते. दर आठवड्याला रत्नागिरी बाजारपेठेत सुमारे १५०० जुड्या भाजीपाला विक्री होते.

Patil Family
Success Story of Farmer : युवा शेतकरी झाला ‘बनाना चिप्स’ उद्योजक

रत्नागिरी शहरात स्वतः पाटील पती-पत्नी भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रीतून आठवड्याला सुमारे चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाई वगळता अन्य दहा महिने भाजीपाला लागवज आणि विक्री व्यवसाय सुरु असतो. यामधून वर्षाला एक लाखांचे उत्पन्न समृद्धीताई मिळवितात.

भाजी लागवडीबाबत समृद्धीताई म्हणाल्या की, पावसाळ्यामध्ये भेंडी लागवडीला प्राधान्य दिले जाते. कारण मुसळधार पावसात पालेभाज्या वाहून जाण्याची भीती असते. श्रावण महिन्यात पडवळासह अन्य फळभाज्यांना मागणी असते. त्यानुसार लागवडीचे नियोजन केले जाते. याचबरोबरीने काही क्षेत्रावर झेंडू लागवड केली जाते.

मळ्यांना पाणी लावण्यापासून ते भाजी विक्री करण्यापर्यंत सर्वंच कामे समृद्धी आणि संदेश हे दोघेही करतात. भाजीपाला पिकास सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा वेळेनुसार दिली जाते. शेळ्यांचे लेंडी खत भाजी रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरले आहे. आम्ही दोघेजण वर्षभर भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करतो, फक्त गरज असेल तर मजूर घेतले जातात.

बंदीस्त शेळीपालन प्रकल्प :

शेळीपालनाच्या छोट्या प्रकल्पातून वर्षभरात चांगला नफा मिळवू शकतो, हे लक्षात आल्यानंतर तीन वर्षांपूर्वी समृद्धीताईंनी बंदीस्त शेळीपालन प्रकल्पास सुरवात केली. दोन लाख रुपये खर्च करून शेळ्यांसाठी शेड उभारली. सुरवातीला त्यांनी सात गावठी शेळ्या विकत घेतल्या. परंतु गावठी शेळ्यांपेक्षा परराज्यातून आणलेल्या शेळ्या चांगल्या प्रकारे वाढू शकतात तसेच बाजारात ग्राहकांकडून मागणी असल्याने दरही चांगला मिळतो,

हे लक्षात घेऊन त्यांनी हैद्राबादी, सिरोही, मालवा या जातीचे तीन महिने वयाचे ७ नर आणि ४ माद्या आणल्या. देवरुख येथील मंगेश राणे यांच्याकडून त्यांनी ही पिल्ले विकत घेतली. पुढील टप्यात त्यांनी शेळ्यांचे चांगले संगोपन केल्याने वाढही चांगली झाली. बकरी ईद, शिमगोत्सव हे सण लक्षात घेऊन शेळ्यांचे संगोपन केले जाते. रत्नागिरीमध्ये हैद्राबादी पतीरा जातीच्या बोकडांना मागणी आहे. त्याचे कान लांब, पाय आणि खूर गुलाबी रंगाचे असते. आत्तापर्यंत समृध्दीताईंनी सात बोकड विकले आहेत. यातून साठ हजारांची मिळकत झाली आहे.

Patil Family
Success Story : स्वनिर्मित पदार्थांचा तयार केला ब्रॅण्ड

शेळ्यांचे संगोपन :

सध्या पाटील यांच्याकडे चार शेळ्या आणि सात बोकड आहेत. शेळ्यांचे खाद्य, औषधे यासाठी महिन्याला सहा हजार रुपये खर्च येतो. खुराक म्हणून मका, शेंगदाणा पेंड, तूर भुसा, नेपिअर गवत, फणसाचा पाला दिला जातो. फणसाचा पाला शेळ्यांना चांगला आवडतो. शेळी, बोकडांची वाढ आणि पचनासाठी योग्य औषधे तज्ज्ञांच्या सल्याने दिली जातात. शिफारशीनुसार लसीकरण देखील केले जाते.

नेपिअर लागवड :

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई होऊ नये यासाठी पाटील यांनी तीन गुंठे क्षेत्रावर नेपिअर गवताची लागवड केली आहे. हे गवत पौष्टिक असून शेळ्यांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरले आहे. लागवडीनंतर दोन महिन्यांनी या चाऱ्याची कापणी सुरू झाली. सुमारे पाच वर्षे या चाऱ्याचे उत्पादन मिळत असल्याने चाऱ्यावरील खर्चात बचत झाली आहे.

लेंडी खताची विक्री :

शेळ्यांच्या लेंडीला परिसरातील शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. वर्षाला सुमारे पंचवीसहून अधिक बॅग खत विक्री होते. एक बॅग साधारणपणे पन्नास किलोहून अधिक असते. सध्या जागेवर एका बॅग खताची किंमत २०० रुपये आहे. काही प्रमाणात भाजीपाला पिकांसाठी लेंडी खताचा वापर केला जातो. खत विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे शेळी संगोपनासाठी वापरले जाते. येत्या काळात शेळीपालन प्रकल्प वाढविण्याचे पाटील यांनी नियोजन केले आहे.

एमआयपी सीआरपीचे प्रशिक्षण :

बचत गटाचा लेखाजोखा सांभाळण्यासाठी उमेद अंतर्गत एमआयपी सीआरपीची नेमणूक केली जाते. याचे १५ दिवसांचे प्रशिक्षण समृद्धीताईंनी घेतले. गोळप परिसरात सुमारे सव्वा दोनशे बचत गट असून त्यांचे सूक्ष्म आराखडे तयार करण्याची जबाबदारी समृध्दीताईंनी पेलली आहे. यामध्ये लेखाजोखा तपासून प्रत्येक कुटुंबाला जमेचा आराखडा बनवून देण्याची कामगिरी त्या करतात. त्यांना उमेदच्या धनश्री आंब्रे यांचे मोलाचे सहकार्य मिळते. बचत गट करत असलेल्या शेती लागवडीच्या संकल्पना समृध्दीताईंसाठी दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरत आहेत.

उपक्रमशील बचत गट :

समृद्धी पाटील या श्री गणेश कृपा महिला स्वयंसहायता समुहाच्या सचिव आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा गट चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. गटामध्ये १२ सदस्या आहेत. गटाला समुदाय संसाधन निधी उपलब्ध होतो. या गटातील महिलांनी शिवणकाम, काजू,कोकम,हळद, फणस आणि आंबा प्रक्रियेवर भर दिला आहे. काही सदस्यांनी आंबा, काजू कलमांची लागवड केलेली आहे.

समृद्धी पाटील, ७७४१९२११३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com