विनोद इंगोले
Own Industry Success Story : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील विवेक कोकणे यांची बोर्डा (ता. वणी) शिवारात बारा एकर शेती आहे. यात हंगामी पिके घेतली जातात. त्यांचे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. वडील अशोक महसूल खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. सिंचन सुविधा मर्यादित असल्याने शेतीतील उत्पादकता जेमतेम होती.
त्यामुळे कुटुंबाचा व्यवस्थित चरितार्थ चालविण्यासाठी अजून खटपट करणे गरजेचे होते. त्यातून सन २००२ मध्ये विवेक यांनी ‘होलसेल किराणा’ व्यवसाय सुरू केला. किरकोळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मालाचा पुरवठा करण्याचा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होता.
परंतु ते अन्य कंपन्यांच्या मालाचे केवळ ‘ट्रेडिंग’ होते. यात आपले स्वतःचे उत्पादन काहीच नाही ही खंत विवेक यांना सतत बोचत होती. त्यात समाधान नव्हते. अखेर २०१८ मध्ये त्यांनी स्वतः निर्मिती केवळ आपल्याच उत्पादनांची विक्री करण्याचे निश्चित केले.
स्वतःचा थाटला प्रक्रिया उद्योग
विवेक यांनी पत्नी अमृता यांना सोबत घेऊन स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू केला. मुद्रा योजनेअंतर्गत ३२ हजार रुपयांचे कर्ज घेत पीठगिरणी खरेदी केली. हा उद्योग सुरू होताच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.
मात्र परिसरातील गिरण्या बंद असल्याने संधी साधत कोकणे यांनी परिसरातील ग्राहकांना गहू, ज्वारी, हळद, मिरची आदी माल दळून देण्यास सुरुवात केली. त्यातून चांगले अर्थार्जन झाले. हुरूप वाढीस लागला. त्यातूनच एक पाऊल पुढे टाकत रेणुका गृह उद्योग आकारास आला.
त्यातून आज बेसन पीठ, फरसाण, पापडी, शेव, गाठी, मिक्स चिवडा, भाजी शेव, खारी बुंदी, बेसन लाडू, फराळी चिवडा, चकली असे पदार्थ तयार केले जात आहेत. ज्वारी, मका, बाजरी, तांदूळ यांचा आटा, कळण्याच्या भाकरीसाठी मिक्स आटा, गव्हाची सोजी, सतु पीठ, (विविध धान्यांचे) आदी चौदाहून अधिक उत्पादने तयार केली जातात.
मिळवले मार्केट, वाढली उलाढाल
किराणा मालाची दुकाने, हॉटेल्स, सुपर मार्केट्स यांना उत्पादनांचा पुरवठा होतो. पूर्वी या व्यवसायातील अनुभव गाठीशी असल्याने त्यातील मार्केटिंग कौशल्य स्व-उत्पादनांच्या विक्रीसाठी कामी आले. दर्जेदार कच्च्या मालाची खरेदी व तयार मालाची क्वालिटी जपल्याने कितीही स्पर्धा असली, तरी बाजारपेठेतून आपल्या उत्पादनांना मागणी असल्याचे विवेक सांगतात.
महिन्याला साडेतीन ते चार लाख रुपयांची उलाढाल होते. ‘फूड सेफ्टी’ विभागाचा परवाना आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध वजनांतील पॅकिंगचे प्रकार केले आहेत. प्रति क्विंटल ८२०० ते ८५०० रुपये बेसन पीठ विक्रीचा घाऊक दर आहे.
कच्च्या मालाच्या दरांतील चढ-उतारानुसार प्रक्रियायुक्त मालाचे दर ठरतात. दिवाळी काळात हरभराडाळीचे दर वाढल्याने बेसन पिठाची विक्री कोकणे यांनी ९५ रुपये प्रति किलो दराने केली. उद्योगात सर्वाधिक खर्च कच्च्या मालावर होतो. मालाच्या ‘डिलिव्हरी’साठी विवेक स्वतः दुचाकीवरून जातात. प्रसंगी ऑटो रिक्षाचा वापर होतो.
प्रक्रिया उद्योगातील बाबी
-संपर्कातील शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची खरेदी. परंतु उत्पादनांची विविधता व निर्मिती पाहता
गरजेनुसार बाजारातूनही खरेदी. महिन्याला एकूण खरेदी १२५ क्विंटलपर्यंत.
-प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व यांत्रिकीकरण. यात छोटे आटा यंत्र, शिवाय मोठे आटा यंत्र घेतले आहे. दहा एचपी क्षमतेच्या या यंत्राची किंमत एक लाख दहा हजार रुपये आहे.
-स्वयंचलित पॅकिंग यंत्र आहे.
-फरसाण निर्मितीचा पूर्ण ‘सेटअप. यात तळणे (फ्राइंग) व वाळवणे (ड्राइंग) देखील होते. यासाठी
सहा लाख ७६ हजार रुपयांचे बॅंकेचे कर्ज घेतले.
-कृषी विभागाकडून पंतप्रधान सूक्ष्मअन्न योजनेअंतर्गत यंत्रे खरेदीसाठी ३५ टक्के अनुदान मिळाले आहे.
-उद्योगात दोन कामगार कार्यरत.
-यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी उद्योगाला भेट देत विवेक या युवा शेतकऱ्याच्या उद्यमशीलतेचे कौतुक केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.