Banana Industry Success Story : हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा, गिरगाव, डोंगरकडा या महसूल मंडलांत केळी क्षेत्र अधिक आहे. वसमत तालुक्यातील केळी पट्ट्यात खाजमापूरवाडी (ता. वसमत) ही वसमत व कळमनुरी तालुक्यांच्या सीमेलगत छोट्या लोकवस्तीची वाडी आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे लाभक्षेत्र आहे. केळी हेच येथील प्रमुख पीक असून, क्षेत्र सुमारे २०० एकरांपर्यंत असावे.
गावातील उमेश मुके हे सुमारे २८ वर्षे वयाचे तरुण शेतकरी आहेत. घरची आठ एकर शेती आहे. केळी व हळद ही त्यांची प्रमुख पिके आहेत. केळीच्या बाजारभावांतील अस्थिरता तसेच दर कोसळल्यानंतर होणारे आर्थिक नुकसान या बाबी उमेश सहन करीत होते. त्यातून केळीचे मूल्यवर्धन अर्थात प्रक्रिया करण्याचे त्यांनी ठरविले. पूर्वीपासून आपण उद्योजक व्हावे त्यांना वाटायचेही. पूर्वी मोबाइल उद्योग, ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देणे असे व्यवसाय केले होते. पण त्यात यश आले नव्हते.
‘बनाना चिप्स’ निर्मिती
सन २०१८ मध्ये उमेश यांनी आई अन्नपूर्णा यांच्या मदतीने घरच्या केळीपासून घरगुती पद्धतीने चिप्स तयार केले. शेजारील बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या गिरगाव येथील किराणा दुकानाद्वारे त्यांची विक्री केली. चवदार ‘बनाना चिप्सनी’ ग्राहकांची पसंती मिळवली. मागणी वाढली. उमेश यांचा उत्साह दुणावला.
त्यांनी उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला. दररोज ५ ते १० किलो चिप्स ते बनवू लागले. दुचाकीवरून माल घेऊन जाऊन परिसरातील गावांमध्ये स्वतः विक्री करू लागले. घरगुती पद्धतीने व्यवसाय करताना कच्च्या केळीची साल हाताने काढावी लागे. घरच्या उपलब्ध साधनांच्या साह्याने चकत्या बनविल्या जात. पाच लिटर तेल साठवण क्षमतेच्या छोट्या कढईमध्ये चिप्स तळल्या जायच्या. ‘ड्रम’द्वारे ‘चिप्स’ला मसाला लावण्याची प्रक्रिया व्हायची.
व्यवसायात एक पाऊल पुढे
जिद्द, उत्पादनाचा चांगला दर्जा व स्वतः मार्केटिंगसाठी घेतलेले कष्ट यातून बाजारपेठेत चिप्स लोकप्रिय होऊ लागले. काही ठोक व्यापाऱ्यांकडून मग फोनवरून विचारणा सुरू झाली. त्यातून उत्पादनाला अजून उठाव मिळू लागला. आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याची तयारी केली.
सन २०२० मध्ये विक्रीकर विभागाकडे सिद्ध अन्नपूर्णा फूड्स नावाने उद्योगाची नोंदणी केली. सन २०२१ मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेतला. तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्राकडून अन्नप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले.
उद्योगाचे आधुनिकीकरण...
मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढवणे व त्यासाठी उद्योगाचे आधुनिकीकरण आवश्यक होते. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजने अंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी प्रकल्प अहवाल सादर केला. ‘एचडीएफसी’ बँकेचे १५ लाख रुपये व स्वतःकडील १३ लाख रुपयेअशी २८ लाखांची गुंतवणूक झाली.
त्यातून गावखरीच्या स्वतःच्या जागेत ४० बाय ३० फूट आकाराचे शेड उभारले. तेल गरम करण्यासाठी ‘बॉयलर’, ‘स्लायसर’, तेलाचा अंश काढणारे ‘ड्रायर’,मसाला ‘मिक्स’ करणारे तसेच पाऊच पॅकिंग अशी यंत्रे घेतली. त्यातून प्रति दिन एक क्विंटलपर्यंत चिप्सचे उत्पादन घेता येत आहे.
अर्थकारण व उलाढाल
सन २०१८ मध्ये उद्योग सुरू झाला, त्या वेळी वार्षिक दोन ते तीन क्विंटल विक्री होती. सन २०१९ मध्ये त्यात वृद्धी झाली. ‘लॉकडाउन’च्या काळात उद्योगावर गदा आली. सन २०२१ च्या जानेवारीपासून पुन्हा उद्योग सुरू झाला. त्यात अलीकडे केलेल्या यांत्रिकीकरणामुळे आणखी चालना मिळाली.
आजमितीला महिन्याला ८ ते ९ क्विंटल विक्री होत असून, वर्षभरात १२ टन चिप्स विक्री क्षमता तयार केली आहे. सुरुवातीच्या काळात पाच लाखांच्या आसपास असलेली उलाढाल आज २० लाखांपर्यंत पोहोचली असून, २० टक्के नफा मिळत आहे. शिवाय घरच्या केळींचे मूल्य वाढले आहे. घरच्या शेतीत ग्रॅंड नैन जातीच्या केळीची मृग बाग व कांदे बाग लागवड असते.
मार्केट विस्तारले
कच्च्या मालाची खरेदी शेतकऱ्यांकडून होते. प्रति क्विंटल केळीपासून २० किलो चिप्स मिळतात.३० ग्रॅम पाऊच पॅकिंग असून १० रुपये त्याची किंमत आहे. याशिवाय १०० ग्रॅम, २०० ग्रॅम व १ किलो असेही पॅकिंग केले आहे. सुरुवातीला परिसरातील गावांमध्ये असलेले ‘मार्केट’ आता परभणी, नांदेड, छत्रपती संभाजी नगर येथील घाऊक व्यापाऱ्यांपर्यंत विस्तारले आहे. विशिष्ट चव, पॅकिंगमुळे टिकवण क्षमता वाढली आहे.
श्रावण महिना, नवरात्र या कालावधीत या चिप्सना मोठी मागणी असते.गावातील काही महिलांना यापूर्वी शेतीकामांशिवाय रोजगाराची संधी नव्हती. उद्योगामुळे पाच महिलांना रोजगार मिळाला आहे. शिवाय उमेश, आई अन्नपूर्णा, वडील बाबाराव स्वतः त्यात कष्ट करतात. बंधू सोमनाथ शेतीची जबाबदारी सांभाळून विविध कामांमध्ये मदत करतात.
उमेश मुके, ९६२३५४४७४१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.