Onion Farmers Loss : केंद्र सरकारच्या वारंवार बदलणाऱ्या निर्यात धोरणांमुळे आणि अचानक घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या धोरणात्मक अपयशाची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे, असा आरोप खासदार राजाभाऊ वाजे यांनी केला. लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी संसदेत नियम ३७७ अंतर्गत उपस्थित करत केंद्र सरकारच्या कांदा धोरणावर जोरदार टीका केली.
खासदार वाजे म्हणाले, की कांदा निर्यातीवर अचानक बंदी घालणे, निर्यात शुल्क लावणे किंवा अल्पावधीत धोरणात बदल करणे यामुळे बाजारपेठेत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दराने कांदा विकण्याची वेळ येत असून, अनेकांच्या आयुष्यभराच्या कष्टांचे नुकसान होत आहे.यावेळी त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला, "शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळत असताना ग्राहक मात्र बाजारात महाग कांदा का खरेदी करतो? या दरातील प्रचंड तफावतीचा फायदा नेमका कोणाला होतो?" ही परिस्थिती सरकारच्या पुरवठा साखळी व्यवस्थेतील गंभीर अपयश दर्शवित असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भविष्यातील लागवड, गुंतवणूक आणि उत्पादन नियोजनावरही विपरीत परिणाम होत असून, कांदा उत्पादक आर्थिक संकटाच्या गर्तेत ढकलले जात असल्याचे वाजे म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे चार मागण्या केल्या.
शेतकऱ्यांना न्याय देणारे, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन कांदा धोरण स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत संसदेत मांडलेल्या या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा धोरणाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे आवाज देत त्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेतल्याचे या चर्चेतून अधोरेखित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख मागण्या
कांदा निर्यातीसाठी वारंवार बदल न करता स्थिर आणि दीर्घकालीन निर्यात धोरण जाहीर करावे.
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक हमीचा व परवडणारा मोबदला मिळेल, अशी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी.
शेतकरी आणि ग्राहकांच्या दरातील तफावतीची सखोल चौकशी करून पुरवठा साखळीतील दोष दूर करावेत.
देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक आणि सर्वाधिक फटका बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज तातडीने जाहीर करावे.
एकीकडे शेतकऱ्यांना कांद्याचा कवडीमोल भाव मिळतो, तर दुसरीकडे ग्राहकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नेमके मध्ये काय घडते आहे? यामागे सरळ सरकारी चुकीचे धोरण कारणीभूत आहे.– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.