Monsoon Rainfall Update: जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने दडी मारल्यामुळे रखडलेली खरीप पेरणी १८ जुलैनंतर झालेल्या पावसामुळे पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २९ हजार १४.४६ हेक्टर (७१.३७ टक्के) क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली असून, पेरणी झालेल्या बहुतांश पिकांची उगवण समाधानकारक आहे. लवकर पेरणी झालेल्या क्षेत्रात आंतरमशागतीची कामे सुरू झाली असून, नव्या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे..जिल्ह्यात १० जुलैपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अनेक भागांतील पेरणी खोळंबली होती. मात्र, १८ जुलैपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. जून महिन्यात सरासरी ३६२.०९ मिमी पावसाच्या तुलनेत ११३.६ मिमी (३१.३ टक्के) पावसाची नोंद झाली. जुलैअखेरची सरासरी ६८५.५ मिमी असून, २२ जुलैपर्यंत ४०४.२ मिमी म्हणजेच ५९ टक्के पाऊस झाला आहे..Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर.यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ८० हजार ७४६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये भात, नाचणी, ज्वारी, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर पिकांचा समावेश आहे. सध्या धुळवाफ पेरण्या पूर्ण झाल्या असून, भाताच्या रोपलागणीची कामे सुरू आहेत..भात या प्रमुख पिकाची ६५ हजार ९३९.६४ हेक्टर (७२.७४ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धुळवाफ पेरणीतील भात रोप व फुटवा अवस्थेत असून उगवण समाधानकारक आहे. पुनर्लागणीची कामे सुरू असली तरी पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणखी दमदार पावसाची गरज असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. भुईमुगाची २० हजार १०२ हेक्टर (७०.४६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. रोग व किडीचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. सोयाबीनची ३४ हजार २१३ हेक्टर (८२.५५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली असून, लवकर पेरणी झालेले पीक १० ते १२ पानांच्या शाखीय अवस्थेत पोहोचले आहे. विरळणी व भांगलणीची कामे सुरू असून, उशिरा पेरणी झालेल्या पिकांची उगवणही समाधानकारक असल्याचे अहवालात म्हटले आहे..Kharif Sowing: विदर्भात पावसाअभावी पेरण्या रखडल्या.नाचणीची ६ हजार ९०० हेक्टर (४२.३१ टक्के), खरीप ज्वारीची ४२८.७६ हेक्टर (६३.८० टक्के) आणि मक्याची ३२४.२८ हेक्टर (१५४.४१ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील आठवड्यात पावसाच्या अनियमिततेमुळे थांबलेली नाचणीची पुनर्लागवड आता पुन्हा सुरू झाली आहे. मक्याची उगवणही समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे..उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे अल्प कालावधीची पिके म्हणून मूग व उडीद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मूगाची १०१.१२ हेक्टर (२०.७६ टक्के), तर उडीदाची ११४.४० हेक्टर (१५.२३ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे..दरम्यान, उसाच्या नवीन हंगामातील आडसाली लागवड ३,१२१.८ हेक्टर (१.५७ टक्के) क्षेत्रावर झाली आहे. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे नवीन लागवड तसेच उसाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.