
Modern Farming Tools: पारंपरिक मळणीमध्ये प्रामुख्याने मानवी किंवा पाळीव जनावरांच्या शक्तीचा वापर केला जातो. आधुनिक मळणी यंत्रामध्ये विद्युत किंवा इंधनाद्वारे शक्ती मिळवली जाते. या मळणी यंत्राचे साधारणपणे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.
अ) मळणी केल्या जाणाऱ्या पिकांनुसार,
एकल पीक मळणी यंत्र
बहूपीक मळणी यंत्र
ब) कार्यात्मक घटकांनुसार,
ड्रमी
नियमित (थ्रू-पुट)
अक्षीय प्रवाह
क) मळणी सिलिंडरच्या प्रकारांनुसार,
सिंडिकेट
हॅमर मिल किंवा बीटर प्रकार
स्पाइक टूथ प्रकार
रास्प बार प्रकार
मळणी यंत्राचे कार्य तत्त्व
मळणी यंत्रणेत प्रामुख्याने फिरणारी वृत्तचिती (सिलिंडर) आणि खालील (अवतल) जाळी धान्य कणसांपासून वेगळे करण्याचे काम करते. मळणी यंत्रणेला धान्य पुरवण्यासाठी शक्यतो सिलिंडरच्या समोर आणि पुरवठा यंत्रणेच्या वरच्या टोकाला पुरवठा दाते असतात. बहुतेक आधुनिक मळणी यंत्रामध्ये घर्षण पट्ट्या (रास्प-बार) प्रकारचे सिलिंडर आणि अवतल असतात. या यंत्रणेत पेंढ्याचे तुकडे न करता कणसे घासून फक्त धान्य वेगळे केले जाते. काही कंबाइनवर दातेरी प्रकारचे सिलिंडर आणि अवतल उपलब्ध असतात. पिकाच्या प्रकारानुसार सिलिंडरची गती बदलण्यासाठी समायोजने दिली जातात. बहुतेक कंबाइनवर गती बदलता येणारे (व्हेरिएबल स्पीड) व्ही बेल्ट ड्राइव्ह वापरले जातात. पेंढा झाडून अडकलेले धान्य वेगळे करण्याच्या यंत्रणेवर फेकला जातो, तर मळणी झालेले धान्य अवतलातील चाळणीवर/धान्य वाहकावर पडते. पुढे साफसफाई यंत्रणेत पोहोचवले जाते.
अक्षीय प्रवाह मळणी यंत्र
या मळणी यंत्रामधील पीक थ्रेशिंग ड्रमच्या एका टोकाला असलेल्या पुरवठा खोबणीद्वारे सिलिंडरमध्ये दिले जाते. बहूपीक मळणी यंत्रामध्ये, अवतलामधून
जाणारे मळणी केलेले गहू पीक चाळणीच्या संचाने आणि पंखा किंवा एस्पिरेटरद्वारे स्वच्छ केले जाते. वरील
पृष्ठभागावर असलेल्या सर्पिलाकार धक्क्यांच्या वापरामुळे भात पिकाचा अक्षीय प्रवाह सुलभ होतो. पाट्याद्वारे पेंढा मळणी यंत्रणेमधून बाहेर फेकला जातो. धान्याची
साफसफाई आणि भुस्सा व खडे वेगळे करण्याचे काम, चाळणी आणि ब्लोअर किंवा ॲस्पिरेटरच्या संचाद्वारे पूर्ण केले जाते.
शक्तिचलित मळणी यंत्राचे मुख्य कार्यात्मक घटक
१) चालक कप्पी, २) पंखा, ३) घास भरण्यासाठी तोंड (चूट/हॉपर), ४) खिळे (स्पाइक्स), ५) वृत्तचिती (सिलिंडर), ६) अवतल (कॉनकेव्ह), ७) जडत्व चाक (फ्लायव्हील), ८) सांगाडा (फ्रेम), ९) ओढ आकडा (टोइंग हूक), १०) वरची चाळणी, ११) खालची चाळणी, १२) वाहतूक चाक (ट्रान्स्पोर्ट व्हील), १३) सस्पेंशन लिव्हर, १४) कॅन पुली, १५) शटर प्लेट.
फिडिंग यंत्रणा
कापलेले पीक मळणी यंत्रामध्ये नेण्याच्या कामामध्ये पुरवठा किंवा घास भरणी यंत्रणा (फीडिंग युनिट) जोडलेली असते. सामान्यतः शक्तिचलित मळणी यंत्रामध्ये ‘पीक सामग्री टाकणे’ (थ्रो-इन-टाइप) किंवा ‘पीक धरून ठेवणे’ (होल्ड-ऑन-टाइप) या प्रकारापैकी एका यंत्रणेचा वापर केला जातो. थ्रो-इन-टाइप फीडिंग युनिटमध्ये, कापलेले पीक मळणी सिलिंडरमध्ये ढकलले जाते. होल्ड-ऑन-टाइप यंत्रणेमध्ये कणसे किंवा ओंब्या फक्त सिलिंडरमध्ये ढकलल्या जातात आणि पेंढा हाताने किंवा यांत्रिकरीत्या धरला जातो. यामध्ये थ्रो-इन-प्रकारचे पुरवठा उपकरणामध्ये फीडिंग हॉपर किंवा च्यूट असू शकते. या घास भरणी यंत्रणेची (फीडिंग च्यूट) लांबी आपल्या हाताच्या लांबीपेक्षा जास्त (५००-६०० मि.मी.) असणे आवश्यक आहे. म्हणजे काम करतेवेळी मळणी यंत्रणेमध्ये हात जाऊन अपघात होण्याची शक्यता राहत नाही. या यंत्रणेत पुरवठा पट्टा असेल तर अधिक सुरक्षित असू शकते.
फीडिंग हॉपर
या प्रकारच्या पुरवठा उपकरणात मळणी सिलिंडरच्या वरच्या बाजूला एक हॉपर असतो. सामान्यतः हॉपर
प्रकारच्या घास भरणी युनिटमध्ये ड्रमला एकसमान पिकाचे घास देणे सुलभ करण्यासाठी हॉपर आणि मळणी ड्रम दरम्यान फिरणारे दातेरी चक्री (स्टार व्हील) यंत्रणा असते. या प्रणालीची सुरुवातीची किंमत जास्त असते, म्हणून ती
बहुतेक मोठ्या क्षमतेच्या अक्षीय प्रवाह मळणी यंत्रावर वापरली जाते.
मळणी युनिट
मळणी सिलिंडरवर बसवलेल्या फिरत्या खुंट्यांच्या आघाताने धान्य त्यावरील आवरणापासून वेगळे होऊन
मळणी पूर्ण होते. गहू पिकाच्या मळणीमध्ये, पेंढ्याचेही आघाताने तुकडे होऊन त्याचे भुशामध्ये रूपांतर होते. मळणी युनिटमध्ये प्रामुख्याने सिलिंडर आणि अवतल हे भाग असतात.
मळणी यंत्रामध्ये विविध प्रकारचे अवतल वापरले जातात. त्यांची माहिती आपण पुढच्या लेखात घेऊया.
मळणी सिलिंडरचे विविध प्रकार
खुंट (स्पाइक/पेग टूथ) प्रकारचे सिलिंडर
घर्षण पट्टी (रास्प बार) प्रकारचे सिलिंडर
काटकोन पट्टी (अँगल्ड बार) प्रकारचे सिलिंडर
तारेच्या आकडा (वायर लूप) प्रकारचे सिलिंडर
कापणी पाते (कटर ब्लेड किंवा सिंडिकेटर) प्रकारचे सिलिंडर
हातोडी चक्की (हॅमर मिल) प्रकारचे सिलिंडर
खुंट (स्पाइक/ पेग टूथ) प्रकारचे सिलिंडर
या प्रकारचा ड्रम एक पोकळ सिलिंडर असून, तो चपट्या लोखंडी पट्ट्या (एमएस फ्लॅट) पासून बनलेला असतो. त्याच्या संपूर्ण परिघावर, चौकोनी / गोल बार किंवा सपाट लोखंडी तुकड्यांचे अनेक स्पाइक /पेग वेल्डेड किंवा बोल्ट केले जातात. आजकाल बहुतेक थ्रेशर्समध्ये समायोज्य लांबीसह गोल खुंट वापरले जातात. एकसमान मळणीसाठी हे खुंट ड्रमच्या परिघावर स्थिर असतात. फिरणाऱ्या ड्रमच्या फिरण्याच्या/हालचालीच्या दिशेने पीक भरवले जाते. स्पाइक टूथ सिलिंडर विविध आकारात उपलब्ध आहेत. समोरील बाजूस सपाट आणि मागील बाजूच्या सुव्यवस्थित स्पाइक टूथ सिलिंडरमध्ये कमी ऊर्जा लागते.
घर्षण पट्टी (रास्प बार) प्रकारचे सिलिंडर
या प्रकारच्या सिलिंडरमध्ये स्लॉटेड प्लेट्स असतात. त्या सिलिंडरच्या रिंग्जवर एका प्लेटच्या स्लॉटची दिशा दुसऱ्या प्लेटच्या विरुद्ध अशा रचनेमध्ये बसवल्या जातात. या प्रकारच्या सिलिंडरचा वापर गहू, भात, मका, सोयाबीन इ. धान्यांच्या मळणी यंत्रामध्ये सामान्यतः केला जातो. त्यातून मिळणाऱ्या भुशाचा दर्जाही चांगला राहतो.
काटकोन पट्टी (अँगल्ड बार) प्रकारचे सिलिंडर
या सर्व रचना ही रास्पबारप्रमाणेच असून, स्लॉटेड प्लेट्सऐवजी एल ॲंगल वापरलेले असतात.
तारेचे आकडे (वायर लूप) प्रकारचे सिलिंडर
यामध्ये पोकळ सिलिंडर असून, त्यावर लाकडी किंवा एमएस प्लेट्स बसवल्या जातात. या प्लेट्सवर थ्रेशिंगसाठी वायर लूपची संख्या निश्चित केली जाते. या प्रकारचा सिलिंडर हाताने चालवल्या जाणाऱ्या भात मळणी यंत्रामध्ये हे सामान्य आहे. फिरत्या सिलिंडरच्या लूपवर बंडल धरल्याने भात पिकाची मळणी होते.
कापणी पाते (कटर ब्लेड किंवा सिंडिकेटर)
प्रकारचे सिलिंडर
यात चारा कुट्टी (चाफ कटर) यंत्रणेप्रमाणे (आकृती ४) पीकपुरवठा यंत्रणेत भरवले जाते. रोलर्सच्या संचातून गेल्यानंतर, पिकाचे तुकडे केले जातात. गिअर्सच्या संचात बदल केल्याने तुकड्यांचा आकार बदलू शकतो. फ्लाय व्हीलच्या आऱ्यांवर तीन ते चार दातेदार पाती (ब्लेड्स) बसवलेले असतात. मळणी मुख्यतः कापणीसोबत घासणे आणि आघाताच्या मदतीने केली जाते. या सिंडिकेटर मळणी यंत्रामध्ये जास्त आर्द्रतेसह ओलसर पीकही हाताळता येते, हा त्याचा मुख्य फायदा आहे. मात्र दर ३ ते ५ तासांनी कापणीच्या पात्यांना धार लावण्याची आवश्यकता भासते. घास भरणी रुळांमुळे (पॉझिटिव्ह फीड रोलर्स) या यंत्रात अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
हातोडी चक्की (हॅमर मिल) प्रकारचे सिलिंडर
मळणीचे आवश्यक काम करण्यासाठी हातोड्यांचा (बीटर्सचा) वापर केला जातो. या प्रकारच्या सिलिंडरचा आकार वरील अन्य सिलिंडरपेक्षा वेगळा असतो. सपाट लोखंडी पट्ट्यांनी किंवा तुकड्यांनी बनलेले बीटर्स रोटर शाफ्टवर पूर्णपणे जोडले जातात. सामान्यतः हॅमर मिल प्रकारच्या थ्रेशिंग सिलिंडरसह फीडिंग च्युट्स वापरल्या जातात. कापलेले पीक फिरत्या बीटर्सच्या हालचालीच्या लंबातर दिशेने भरवले जाते. या प्रकारच्या मळणी यंत्राला स्पाइक टूथ प्रकारच्या मळणी यंत्राच्या तुलनेत जास्त शक्तीची आवश्यकता असते.
- डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९, (प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.