Soybean Farming Management : सोयाबीन काढणी, मळणी, साठवणूक नियोजन

Soybean Production : सोयाबीन बियाण्याचा दर्जा उत्तम राखण्यासाठी कापणी, मळणी, हाताळणी व साठवणूक या बाबींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बियाण्यास बाजारात जास्त भाव मिळण्यास मदत होते.
Soybean Farming
Soybean FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. वसुदेव मते, डॉ. गजानन लांडे

Kharif Season Soybean Harvesting : सोयाबीन हे खरीप हंगामातील कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारे महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे राज्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. वाढत्या बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्येच दर्जेदार बियाणे तयार केल्यास पुढील हंगामातील लागवडीसाठी नक्कीच फायदा होईल. शिवाय बियाणे विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होईल.

सोयाबीन बियाणे नाजूक असल्यामुळे कापणी, मळणी, हाताळणी व साठवणूक करताना बियाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कापणीपासून ते साठवणुकीपर्यंत योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे.

कापणीपूर्वी घ्यावयाची काळजी

पीक कापणीपूर्वी घेतलेल्या वाणाच्या गुणधर्माशी न जुळणारी तसेच रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत. त्यामधील तणे व इतर भेसळयुक्त झाडे काढून टाकावीत. जेणेकरून बियाण्याची प्रत खराब होणार नाही. सोयाबीन काढणीची योग्य वेळ ठरविणे अत्यंत आवश्यक आहे. कापणी लवकर केली तर अपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते व त्याचा उगवणशक्तीवर परिणाम होतो. काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटून नुकसान होते.

सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडून गळू लागल्यावर व शेंगांचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट झाल्यानंतर पीक कापणीस आले असे समजावे. पिकाच्या ८० ते ८५ टक्के शेंगा वाळल्यानंतर पिकाची कापणी करावी. काढणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारणतः १४ ते १५ टक्के असावे. झाडे उन्हात वाळविल्यानंतर वाणनिहाय वेगवेगळी कापणी मळणीची कामे करावीत. म्हणजे बियाण्यांस इजा न होता चांगले बियाणे मिळेल.

Soybean Farming
Soybean Farming Issue : सोयाबीन पेरण्यापेक्षा शेती विकून पैसे बँकेत ठेवणे फायदेशीर

बियाणे साठवणुकीदरम्यान घ्यावयाची काळजी

साठवणुकी दरम्यान बियाण्यांची उगवणक्षमता खालावणार नाही याकरिता विशेष लक्ष दिले पाहिजे. बियाण्यातील ओलाव्याचे किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण, साठवणुकीच्या काळातील तापमान, बियाण्याची भौतिक स्थिती, आनुवंशिकता, अतिसूक्ष्म जिवाणू व किडी यांचा परिणाम बियाण्याच्या उगवण क्षमतेवर होतो.

साठवणूक भांडारात किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भांडाराची उभारणी शास्त्रीयदृष्ट्या विचार करून करावी. सुधारित पद्धतीनुसार बांधलेल्या भांडारात साठविलेल्या बियांची अंकुरणक्षमता व जोम अधिक काळापर्यंत टिकून राहू शकतो.

बियाणे साठवणुकीपूर्वी त्यामधील काडी कचरा, फुटलेले बियाणे, किडीचे बियाणे, अपरिपक्व बियाणे इत्यादी चाळणीच्या साह्याने साफ करावे. प्रतवारी मशिनच्या साह्याने ३.६ मि.मी. (स्लॉटेड) आकारमानाची चाळणी वापरून बियाणे प्रतवारी करून नंतर साठवावे.

बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारण १० ते १२ टक्के असावे. बियाण्यामध्ये ओलावा जास्त असेल तर त्यास सावलीमध्ये वाळवून ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी करावे. त्याकरिता बियाणे वाळवून नंतरच नवीन पोत्यात भरावे. त्यामुळे साठवणुकीमध्ये बुरशी किंवा कीड यांची वाढ होत नाही.

बियाणे नाजूक असल्यामुळे हाताळणी करत असताना बियाणे ३ फुटांपेक्षा जास्त उंचीवरून टाकू नये. बियाण्याची थप्पी ५ फुटांपेक्षा उंच लावू नये. बियाणे साठविताना गोदामात बियाण्यांची पोती भिंतीपासून कमीत कमी ३ फूट लांब व लाकडी फळ्या अथवा बांबूच्या चट्ट्यावर ठेवावीत.

बियाणे साठवलेली जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. दर १५ दिवसांनी बियाण्यांची तपासणी करावी.

साठवणुकीच्या जागेत पावसाचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे भांडाराचे वातावरण कोरडे व थंड राहील याची काळजी घ्यावी.

Soybean Farming
Soybean Farming Training : पुसाणे येथे सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण

मळणी करताना घ्यावयाची काळजी

मळणी करण्याची जागा स्वच्छ, किडींपासून मुक्त असावी. ती शक्यतो लोकवस्ती व धान्य साठवणीपासून दूर असावी.

शुद्ध व दर्जेदार बियाणे मिळण्याकरिता मळणी यंत्र मळणी कामास सुरुवात करण्यापूर्वी साफ करून घ्यावे. बऱ्याच वेळा मळणी यंत्र हे वेगवेगळ्या पिकांच्या अथवा वेगवेगळ्या सोयाबीनच्या वाणांच्या मळणीसाठी वापरले जाते. त्यामुळे अगोदरच्या पिकाचे बियाणे थ्रेशिंग ड्रम किंवा जाळीमध्ये अडकलेले असू शकते. अशावेळी मळणी यंत्र साफ न करताच मळणी केल्यास आधी मळणी केलेल्या पिकाचे बियाणे यामध्ये मिसळून बियाण्याची भौतिक शुद्धता कमी होते. त्यामुळे मळणी यंत्र वापरण्यापूर्वी त्याची साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे.

मळणी चालू करण्यापूर्वी मळणी यंत्र समांतर असल्याची खात्री करून घ्यावी.

मळणी यंत्रामध्ये सोयाबीन टाकण्याचा वेग हा एकसारखा असावा. जर वेग कमी-जास्त झाल्यास बियाण्यांना मार बसतो. तसेच मळणी करताना बियाण्यांची फूट होत असेल, तर थ्रेशिंग ड्रममधील काही स्टड कमी करावे. भुशीमध्ये जर चांगले बियाणे जात असल्यास थ्रेशिंग ड्रमचा वेग कमी करावा.

सोयाबीन बियाणे अतिशय नाजूक असल्यामुळे मळणी करताना ड्रमचा वेग ३५० ते ४५० फेरे प्रति मिनिट इतका असावा. मळणी करताना ड्रमचा वेग जास्त असल्यास बियाण्यांना इजा होऊन उगवणशक्ती कमी होते. म्हणून सोयाबीन पिकाची मळणी करताना काटेकोरपणे लक्ष ठेवून दक्षता घेणे जरूरीचे आहे.

थ्रेशरमध्ये सोयाबीन टाकताना आपला हात थ्रेशिंग ड्रममध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांनी केस व साडीचा पदर बांधून ठेवावा. जेणेकरून मळणी वेळी होणारे अपघात टाळता येतील.

डॉ. वसुदेव मते, ९४०४०८२३६७ (बियाणे तंत्रज्ञान संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com