
Beed News : आधुनिक शेतीतील यांत्रिकीकरणात कौशल्याला विशेष महत्त्व असून, या प्रशिक्षणामुळे रोजगार उपलब्ध होऊन शेतीसाठी कौशल्यपूर्ण यांत्रिकीकरण फायद्याचे ठरणार असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. प्रा. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.
दीनदयाळ शोध संस्था कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सीएनएच इंडस्ट्रिअल (न्यू हॉलंड) इंडिया, नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून ग्रामीण युवक व शेतकरी यांच्यासाठी ट्रॅक्टर व अवजारे वापर कौशल्य विषयक तीनदिवसीय प्रशिक्षण १२ ते १४ डिसेंबर दरम्यान कृषी विज्ञान केंद्र डीघोळअंबा येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. प्रा. इंद्र मणी ह ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करीत होते. प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता, डॉ. भगवान आसेवार आणि नोडल अधिकारी, सीएनएच प्रकल्प डॉ. उदय खोडके तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख, कृषी अभियंता प्रमोद रेणापुरकर हे उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. वसंत देशमुख यांनी केले. डॉ. उदय खोडके यांनी वनामकृवि-सीएनएचआय प्रकल्पाची माहिती दिली. डॉ. भगवान आसेवार यांनी प्रशिक्षण वर्गाचे महत्त्व सांगितले. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की कृषी यांत्रिकीकरणात अग्रगण्य असलेली नोएडा येथील सीएनएच इंडस्ट्रिअल इंडिया (न्यू हॉलंड) यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘कौशल्य विकास -कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण’ प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील १५०० शेतकरी, तंत्रज्ञ आणि ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
प्रशिक्षणार्थींना आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत त्यांचे स्वत:चे उद्योग/सेवा केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. तांत्रिक सत्रात कृषी यंत्र व शक्ती विभागाच्या डॉ. स्मिता सोळंके यांनी विद्यापीठ विकसित विविध बैलचलित तसेच ट्रॅक्टरचलित अवजारांची माहिती दिली. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी ट्रॅक्टरमध्ये प्रति सेकंद एक थेंब गळती प्रति वर्ष २००० लिटर्सपर्यंत डिझेल वाया घालवते.
निष्क्रियपणे चालू असलेला ट्रॅक्टर प्रति तास १ लिटर हून अधिक डिझेल वाया घालवितो असे सांगितले. डिझेल वाचविण्याच्या उपयुक्त सूचना जसे चांगले टायर वापरणे, नोजल, इंधन इन्जेक्शन पंप समायोजन करणे, इंजिनच्या हॉर्सपॉवर आधारित अवजारे आकार निवडावा आदी बाबी त्यांनी या प्रसंगी सांगितल्या. प्रात्यक्षिकासह विविध कंपन्यांच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण पूर्ण होणार असून, प्रशिक्षण यशस्वितेसाठी महेश पिसाळ, शेख अक्रम आणि केंद्रातील सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.