
डॉ. चेतनकुमार सावंत, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. अजित मगर, डॉ. अभिजित खडतकर
Plastic Mulch Planter: शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि प्लॅस्टिक आच्छादन यांच्या एकत्रित वापरातून अनेक फायदे होताना दिसतात. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. तणाचा प्रादुर्भाव कमी राहतो. मुळांच्या परिसरातील मातीचे तापमान नियंत्रित राहते. मातीची धूप रोखली जाते. यामुळे आपल्याकडे उपलब्ध पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांचा कार्यक्षम वापर होतो. पोषक तत्त्वांच्या वापराची कार्यक्षमता वाढते.
काही अभ्यासातून मिळालेले निष्कर्षही आशादायक आहेत. उदा. प्लॅस्टिक आच्छादनामुळे पिकांचे उत्पादन ६०-६५ टक्के वाढते, पाण्याची ४०-६० टक्के बचत होते, पाण्याच्या वापराची कार्यक्षमता १५ - २० टक्के वाढते आणि खतांच्या वापराची कार्यक्षमता २०-२५ टक्के वाढते. जेव्हा ठिबक सिंचनाचा वापर प्लॅस्टिकच्या आच्छादनासह केला जातो तेव्हा पाण्याच्या वापराची कार्यक्षमता ९० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी प्लॅस्टिक आच्छादनाकडे वळत आहेत.
मात्र पारंपरिक पद्धतीत प्लॅस्टिक मल्च करताना उंच गादीवाफे तयार करणे, ठिबकची लॅटरल अंथरणे, नंतर प्लॅस्टिक पेपर अंथरणे, त्यावर बाजूने माती टाकणे, योग्य अंतरावर छिद्रे करणे, त्यात रोपे अथवा बियाणे लावणे ही सर्व कामे वेगवेगळी करावी लागतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. परिणामी खर्चात मोठी वाढ होते. अलीकडे यातील काही कामांसाठी वेगवेगळी यंत्र उपलब्ध होऊ लागली आहेत. मात्र ते त्यांचा वापर मर्यादित आहे. त्यामागे काळ्या मातीमध्ये बेड नीट तयार होत नाही, मल्चिंग पेपर नीट अंथरला जात नाही, पेपरखाली पोकळी राहते, अशी अनेक कारणे दिसतात.
प्लॅस्टिक मल्चिंग संदर्भातील सर्व कामे एकाच वेळी करणे हे आव्हान डोळ्यासमोर ठेवत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने ट्रॅक्टरचलित मल्च लेयर कम प्लांटर यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे उंच गादीवाफा तयार करणे, ठिबक लॅटरल्स आणि प्लॅस्टिक मल्चिंग पेपर एकाच वेळी अंथरणे, त्यावर योग्य अंतरावर छिद्रे करून त्यात बियाणे पेरणे ही सर्व कामे एकाच वेळी केली जातात. अंतरावर एकाच वेळी पेरते.
या यंत्रामध्ये ०.६ ते ०.९ मीटर रुंदीचे गादीवाफे तयार करणारे बेड फॉर्मर, दोन ठिबक लॅटरल अंथरणे आणि ०.९ ते १.५ मीटर रुंदीची प्लॅस्टिक मल्च अंथरण्याची सोय, न्यूमॅटिक बियाणे मापन, एक्सन्ट्रिक स्लाइडर क्रँक यंत्रणा, तसेच पेपरमध्ये छिद्रे करून बियाणे लावणारे पंचिंग युनिट यांचा समावेश आहे. हे यंत्र उच्च-मूल्ययुक्त पिकांची प्लॅस्टिक आच्छादनावर लागवडीसाठी उपयुक्त आहे. उदा. खरबूज, काकडी, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, हिरवे वाटाणे, भेंडी आणि बीन्स इ.
अशा प्रकारे काम करते यंत्रणा
ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिक प्रणालीच्या वापरातून हायड्रॉलिक मोटर चालते.
चेन-अँड-स्प्रॉकेट ट्रान्समिशनद्वारे एक्सेन्ट्रिक स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझम चालवले जाते.
ट्रॅक्टरच्या पीटीओद्वारे चालवल्या जाणाऱ्या ॲस्पिरेटर ब्लोअरचा वापर करून बियाणे मिटरिंग मेकॅनिझमसाठी हवारहित पोकळी (व्हॅक्यूम) तयार केली जाते.
एक्सेन्ट्रिक स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझम कनेक्टिंग रॉड वापरून ड्राइव्ह डिस्कच्या गोलाकार गतीचे रूपांतर उभ्या हालचालीत केले जाते.
पंच लावणी यंत्रणेच्या शेवटी ‘डी’ प्रोफाइल नियंत्रित केले जाते. त्यामुळे ते मातीत उघडले जाऊन बियाणे पेरले जाते.
न्यूमॅटिक बियाणे मापन प्लेट आणि स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझममधील मीटरिंग प्लेटद्वारे उचललेले बियाणे पंचच्या जबड्यात पोहोचवले जाते. बियाणे धरून ठेवताना पंच बंद राहतो आणि आच्छादनात छिद्र केल्यानंतर मातीमध्ये तोंड असताना तो उघडतो. त्यामुळे बियाणे पंचच्या टोकावर ठेवले जाते. या यंत्रामध्ये रांगेतील अंतर ०.५ ते ०.९ मीटर आणि बियाणांमधील अंतर ०.२ ते ०.६ मीटरपर्यंत गरजेनुसार कमी अधिक करता येते.
कार्यक्षमता व आर्थिक बाबी
हे यंत्र प्रति तास ०.२ हेक्टर इतके क्षेत्र पूर्ण करते. या यंत्राची १.७ किमी प्रति तास वेगाने क्षेत्र कार्यक्षमता ७४ टक्के आहे.
यंत्राची एकूण किंमत ३ लाख रुपये आहे. तर प्रत्यक्ष कामकाजाचा खर्च अंदाजे १,५०० रुपये प्रति तास आहे. यंत्राचा परतफेड कालावधी १.९ वर्षे (४४४ तासांच्या वापरावर आधारित) आहे. त्याचा नफा - तोटा संतुलन बिंदू (ब्रेक-इव्हन पॉइंट) प्रति वर्ष ७० तास आहे.
चाचणीदरम्यान दिसलेले फायदे
सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या ‘ड्रीप लॅटरल-कम-प्लॅस्टिक मल्च लेइंग मशिन’ च्या तुलनेत, नवीन प्लांटर प्रति हेक्टरी २६ मनुष्य-दिवस वाचवतो. म्हणजेच श्रमात ८९ टक्के बचत होते. कामकाजाच्या खर्च प्रति हेक्टर ६,६०० रुपयांनी (४३ टक्के) कमी होतो.
केवळ मनुष्यबळाने केलेल्या कामांच्या तुलनेमध्ये प्रति हेक्टरी ३२ मनुष्य-दिवस (९१ टक्के कामगार) वाचू शकतात. तर कामकाजाचा खर्च प्रति हेक्टरी ३,७०० रुपये (३० टक्के) कमी होतो.
पारंपरिक लागवडीच्या तुलनेत ठिबक सिंचनासह प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास विविध पिकांच्या उत्पादनात १० ते १०० टक्के इतकी वाढ मिळाल्याचे प्रयोगात दिसले आहे.
या यंत्राच्या तंत्रज्ञान हस्तांतरासाठी यंत्र उत्पादक, व्यावसायिक अर्ज करू शकतात. त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तंत्रज्ञान हस्तांतर मार्गदर्शक सूचनांच्या अधीन परवाना मिळू शकतो. त्याच्या तपशीलवार अटी, तांत्रिक माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी directorciae@gmail.com व chetankumarsawant@gmail.com यावर संपर्क करता येईल.
विविध राज्यांमध्ये अशा यंत्रांसाठी वेगवेगळे अनुदान धोरण आहे. आपल्या कृषी विभागाकडून ते समजू शकेल.
डॉ. चेतनकुमार सावंत ०७८२८९२६७९९
(डॉ. चेतनकुमार सावंत, डॉ. अजित मगर आणि डॉ. अभिजित खडतकर हे भोपाळ - मध्य प्रदेश येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. तर डॉ. भास्कर गायकवाड हे बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.