
Amaravati News : शेतकऱ्यांवर बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास ते बियाणे विकणाऱ्या विक्रेत्याविरूद्ध कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्याला जामीनही मिळणार नाही, अशी सोय करावी व यासोबतच ज्या भागात हे बियाणे विकल्या गेलेत तेथील कृषी अधिकाऱ्यांविरूद्धही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता. 28) कृषी विभागाच्या बैठकीत दिले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पालकमंत्र्यांनी कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी आमदार रवी राणा,आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, एसएओ राहूल सातपुते व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केलेत, हा या बैठकीतील कळीचा मुद्दा होता. यावर अमरावती व धारणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. दहा कृषी अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले असल्याने त्या तालुक्यातील स्थिती स्पष्ट झाली नाही.
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गावागावात शेतकऱ्यांसोबत संवाद बैठका आयोजित करण्याचे निर्देश दिले. येत्या १९ जुलैपर्यंत हे कार्यक्रम राबविण्यात यावेत व त्याचा अहवाल २९ जुलैला होणाऱ्या बैठकीत मांडावेत असेही निर्देश त्यांनी दिले.
अमरावती पॅटर्न तयार करा
अमरावती हा देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जिल्हा आहे. त्यांनी कृषीक्रांती घडविली होती.
त्याचाच कित्ता गिरवत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नविन कृषी क्रांती घडविण्यासाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवावेत. हा प्रयोग अमरावती पॅटर्न म्हणून राज्यात राबविता आला पाहिजे असा उपदेश पालकमंत्र्यांनी यावेळी केला.
अधिकार कपातीचा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडणार
निरीक्षकांच्या अधिकार कपातीचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. कृषी निविष्ठा तपासणीचे अधिकार कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर हा मुद्दा आपण येत्या मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.