Bullet Tractor : मजूर टंचाईला रामराम! बुलेट ट्रॅक्टरने शेतीत क्रांती

Agriculture Juggad : नांगरणी, कोळपणी, फवारणी, मळणीपर्यंत विविध कामे कमी वेळेत, कमी कष्टांत करणाऱ्या या छोटेखानी, आकर्षक ट्रॅक्टरला आजच्या मजूरटंचाईच्या युगात शेतकऱ्यांकडून चांगली पसंती व मागणी येऊ लागली आहे.
Bullet Tractor
Bullet Tractor Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : लातूर जिल्ह्यातील मुरंबी (ता. चाकूर)  हे मूळ गाव असलेले मकबूल चाँदसाब शेख सध्या निलंगा येथे स्थानिक झाले आहेत. त्यांची दोन एकर शेती आहे. वडील शेतीच करीत.

आर्थिक समस्येमुळे मकबूल यांना शालेय शिक्षण अर्धवट अवस्थेतच सोडावे लागले. त्यानंतर लातूर येथे काकांच्या ट्रॅक्टर गॅरेजमध्ये त्यांनी अकरा वर्षे कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर बंधू मन्सूरभाई यांच्या निलंगा येथील गॅरेजमध्ये ते कौशल्य अजमावू लागले.

ट्रॅक्टरसंबंधीचीच सर्व कामे असल्याने दररोज अनेक शेतकऱ्यांसोबत त्यांचा संपर्क येई. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुरुस्ती करताना शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या लक्षात येऊ लागल्या. सध्या शेतीत मजूरटंचाईची समस्या तीव्र झाली आहे.

बैल बारदाना सांभाळणेही कठीण होऊ लागले आहे. अशावेळी शेतकऱ्यांचा यांत्रिकरणाकडे ओढा आहे. या सर्व बाबी पाहता अनुभवी व बुद्धिकौशल्य असलेल्या मकबूलभाईंना मिनी ट्रॅक्टर विकसित करण्याची कल्पना सुचली. त्या दृष्टीने अभ्यास व प्रयत्न सुरू केले.

Bullet Tractor
Agriculture Technology: शक्तिचलित मळणी यंत्राचे प्रकार, अंतर्गत घटक

बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती

सध्याच्या युगात ग्रामीणसह शहरी भागातही बुलेटची मोठी क्रेझ आहे. बुलेटस्वार नेहमीच ती थाटात चालवताना दिसतो. त्यामुळे छोटा ट्रॅक्टर असा तयार करायचा की त्यास बुलेटची शान असली पाहिजे असा विचार मकबूलभाईंनी केला. संकल्पना तडीस नेण्यासाठी त्यांनी जुनी बुलेट खरेदी केली.

सन २०१५ पासून त्यावर विविध प्रयोग सुरू केले. दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर पहिला बुलेट ट्रॅक्टर तयार झाला. मग शेतात त्याच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली. त्यातील त्रुटी व समस्या लक्षात घेऊन सुधारणा होत गेल्या. अखेर २०१८ च्या दरम्यान अपेक्षित बुलेट ट्रॅक्टर तयार करण्यात मकबूलभाईंना यश आले.

बुलेट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 बाजारातून बहुतांश सुटे भाग आणले जातात. गरजेनुसार काही भाग तयार करून घेतले जातात. गॅरेजमध्ये ‘फ्रेम’ तयार करून ट्रॅक्टरची निर्मिती केली जाते. सध्या तीन चाकी यंत्र आहे. मात्र मागणीनुसार चारचाकी तयार करणेही शक्य.

 साडेचारशे किलो वजन. दहा एचपी क्षमता. पेरणी, कोळपणी, फवारणी, रोटाव्हेटर चालवणे, मळणी आदी सर्व कामे करतो. अर्धा लिटर डिझेलमध्ये एक एकर फवारणी तर एक लिटर डिझेलमध्ये एक एकर पेरणी होते. एक मनुष्यही सर्व कामे करू शकतो.

 दोन ओळींतील अंतरानुसार चाकांतील अंतरही कमीजास्त करण्याची सोय. बारा ते वीस इंचावर पेरणी असली तरी कोळपणी करता येते.

 मकबूलभाई सुमारे १६ अवजारेही तयार करतात. यात पेरणी, कोळपणी, फवारणी, रोटाव्हेटर, सोयाबीन कापणी यंत्र आदींचा समावेश. (हे कापणी यंत्र ऑइल प्रेशरवर चालत असल्याने कंपने जाणवत नाहीत.) हरभरा, उडीद, मुगातही वापर शक्य.

शेतकऱ्यांकडून पसंती

सुरुवातीला अलगुड (कर्नाटक) व उदगीर येथे दोन ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर मागणी येऊ लागली. मागील सहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेशापर्यंत ट्रॅक्टरने भरारी घेतली असून चारशेहून अधिक ट्रॅक्टर्सची विक्री झाली आहे.

एखाद्या शेतकऱ्याला विक्री करण्यापूर्वी आघीच्या ग्राहक शेतकऱ्यासोबत संपर्क करून दिला जातो. समाधान झाल्यानंतरच खरेदी-विक्रीची पुढील प्रक्रिया केली जाते. सोशल मीडिया तसेच पुणे व बारामती येथील कृषी प्रदर्शनांमधूनही या यंत्राचा प्रसार झाला आहे.

महिन्याला मागणीनुसार आठ ते दहा ट्रॅक्टर्सची निर्मिती केली जाते. जून ते ऑगस्ट दरम्यान ४० पर्यंत यंत्रांची मागणी होत असली तरी तेवढ्या संख्येने निर्मिती करणे आजतरी शक्य नाही. येत्या काळात महिन्याला ३० ट्रॅक्टर्स उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. यासोबत इलेक्ट्रीक बॅटरी रिचार्जवर आधारित बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे.

यांत्रिकीकरणासाठी कृषी विभागाच्या वतीने अनुदानाची सोय आहे. मकबूलभाईंनी त्यानुसार कृषी विभागाकडे प्रस्ताव दिला. त्यानुसार २०२२ मध्ये हरियानातील केंद्र सरकारच्या संबंधित संस्थेकडून ट्रॅक्टरची चाचणी घेण्यात आली. एप्रिल २०२३ मध्ये त्याचा अहवाल प्राप्त होऊन यंत्र अनुदानासाठी पात्र ठरले.

Bullet Tractor
Agriculture Technology: मळणी यंत्राच्या विविध यंत्रणा

शेतकऱ्यांसाठी किफायतशीर

बाजारातील यंत्रांसोबत तुलना करताना मकबूलभाई म्हणतात, की बाजारातील मिनी ट्रॅक्टर्स चारचाकी व १५ ते २० एचपी क्षमतेपर्यंतचे आहेत. त्यांची किंमत पाच लाखांपर्यंत आहे. अवजारांसह त्यांची किंमत दहा लाखांपर्यंत जाते. त्या तुलनेत बुलेट ट्रॅक्टर तीन व चारचाकी अशा दोन्ही प्रकारांत आहे. त्याची किंमत एक लाख ९५ हजारापर्यंत आहे.

त्याचा देखभाल खर्चही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. वजनही तुलनेने कमी असल्याने पिकांचे व जमिनीचे नुकसान होत नाही. अडीच फूट रुंद जागेतही हा ट्रॅक्टर काम करू शकतो तसेच कोणासही तो चालवणे शक्य होते. त्याचे उदाहरण म्हणजे माटेफळ (ता. लातूर) येथील एक शेतकरी महिला याच ट्रॅक्टरच्या साह्याने मशागतीची कामे करीत असल्याचे मोठे समाधान आहे असे मकबूलभाई सांगतात.

यंत्राने दिली मोठी उभारी

बंधू मन्सूरभाई यांचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात झाला. त्यानंतर कुटुंबाची सारी जबाबदारी मकबूलभाई सांभाळत असून, पुतण्या मेहराज देखील या व्यवसायात त्यांना साथ देतो ‘मेकॅनिक’ म्हणून वीस वर्षांच्या प्रवासात बुलेट ट्रॅक्टरने कुटुंबाला मोठी उभारी दिली.

पूर्वी शेतकऱ्यांकडून आगाऊ पैसे घेऊन ट्रॅक्टर निर्मिती करावी लागत होती. आता वीसपर्यंत ट्रॅक्टर निर्मितीची आर्थिक क्षमता विकसित केल्याचे मकबूलभाईंनी सांगितले. त्यांच्या ट्रॅक्टरचे सर्वत्र कुतूहल आहे. यामुळेच मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी त्यांच्या गॅरेजला भेटी दिल्या. खासगी संस्था व संघटनांनी पुरस्काराने गौरव केला आहे. व्यवसायातून १२ जणांना रोजगार मिळाला आहे.

मकबूल शेख ९८८१४३६२६२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com