
Agricultural Equipment: चारा पिकांमध्ये हिरवा चारा, गवत किंवा मुरघासासाठी पिकविलेली पिके उदा. अल्फा अल्फा, वाटाणा, ढूब (क्लोव्हर) आणि विविध गवते यांचा समावेश होतो. कुरणांमध्ये मुक्तपणे उगवणारी विविध गवते आणि पिक म्हणून वाढवलेली गवते मूलतः एकाच गटात येत असली तरी व्यवस्थापनामध्ये मोठा फरक असतो. कुरणामध्ये पशुधन चरण्यासाठी सोडले जाते. मात्र शेतीमध्ये घेतलेल्या चारा पिकांचे लागवडीसह काढणीपर्यंतची सर्व कामे शेतकऱ्यांद्वारे केली जातात.
योग्य अवस्थेत चारा पिकांची कापणी करून ती सरळ जनावरांना खाण्यास दिली जातात किंवा किंचित निबर कडबा असल्यास त्याची कुट्टी करून ती जनावरांना दिली जातात. या कामांसाठी चांगल्या कापणी यंत्राची व कुट्टी यंत्राची आवश्यकता भासते. त्यातही चारा पीक हिरवा चारा, सुका चारा किंवा मूरघास करणे या पैकी नेमक्या कोणत्या उद्देशाने घेतले आहे, त्यानुसारही व्यवस्थापनामध्ये काही बदल होत असतात.
चारा कापणी यंत्रांचे प्रकार
चारा पिकांची कापणी ही वेगवेगळ्या उद्देशासाठी केली जाते. (उदा. हिरवा चारा, गवत, मूरघास निर्मिती, सुका चारा इ.) त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता भासते. चारा कापणी यंत्रांमध्ये स्वयंचलित आणि ट्रॅक्टरला जोडलेले असे दोन प्रकार येतात.
एका ओळीमध्ये असलेले पीक कापणी करून ओळीत टाकणारी (विंडरो) यंत्रे. कापल्यानंतर ओळीत पडलेला चारा उचलण्यासाठीची यंत्रे. उचलेला चाऱ्याच्या गाठी बांधणीची यंत्रे. चारा गाठी गुंडाळून ठेवण्यासाठीची यंत्रे. चारा अधिक काळ टिकविण्यासाठी तो सुकवून किंवा वाळवून वापरला जातो. त्या साठी चारा कंडिशनर सारखी विशिष्ट यंत्रे वापरतात.
चारा कापणी यंत्रामधील यंत्रणा
उत्पादनाचा उद्देश काहीही असला तरी त्यात कापणी हा भाग अंतर्भूतच असतो. या कापणीसाठी यंत्रामध्ये साधे वस्ताऱ्यासारखे चालणारे कापणी यंत्र (कटर बार) असते, किंवा गोल फिरणारे कापणी यंत्र (रोटरी मॉवर) वापरले जाते. कटर बार प्रकारच्या कापणी यंत्रात धारदार पाती सतत हलणारी वापरलेली असतात.
थेट कट हेडर : गवत, घास (अल्फाअल्फा) आणि बरसीमसारख्या उभ्या पिकांना कापण्यासाठी यात एक कटर बार वापरलेला असतो. यासाठी बाजारात स्वयंचलित व ट्रॅक्टरचलित यंत्रे उपलब्ध आहेत. या यंत्रणेत गवत कापून यंत्राच्या मागील बाजूस ओळीत सोडले जाते. या यंत्रात पडलेला चारा उचलण्यासाठीची व्यवस्था नसते.
विंड रो पीकअप हेडर : विंड रोमध्ये व्यवस्थित कापून टाकलेली चारा पिके उचलण्यासाठी वापरले जाते.
रो चारा हेडर : मकासारख्या एका ओळीमध्ये लावलेल्या पिकांच्या जसे गोड ज्वारी, गीनीगवत, मका यांसारख्या चारा पिकांच्या कापणीसाठी वापरले जाते.
स्नॅपर हेडर : फक्त मक्याचे कणसे धाटापासून वेगळी काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. बहुतांश वेळा कंबाईन हार्व्हेस्टर सोबत ही यंत्रणा जोडलेली असते.
चारा पिकांसाठी इतर यंत्रसामग्रीचे प्रकार
चारा कंडिशनर
सुक्या चाऱ्याचे उत्पादन व साठवणूक करणारे शेतकरी चाऱ्याची धाटे, पानांसह बारीक करून किंवा चिरडून त्यांचे पृष्ठफळ वाढवले जाते. त्यामुळे तितक्या अधिक क्षेत्रफळांतून पाणी बाष्पीभवनाद्वारे वेगाने बाहेर पडते. हे अवशेष लवकर सुकविण्यासाठी गवत-कंडिशनिंग यंत्रणांचा वापर केला जातो.
या कंडिशनर्सचे दोन मुख्य प्रकार आहेत.
रोल कंडिशनर : दोन स्टील किंवा रबर रोल असून, त्यामध्ये दाबले जाऊन धाट चिरडले किंवा बारीक केले जातात.
टाईन, किंवा फ्लेल (इम्पेलर) कंडिशनर : ज्या गवतावर मेणाचा थर असतो, तो खरडवडून काढण्यासाठी टायन्स वापरल्या जातात. गवताच्या पृष्ठभागावरील मेणाचा थर काढून टाकल्याने त्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. हा चारा लवकर सुकण्यास मदत होते.
चारा पलटणी (टेडिंग) यंत्र
टेडर आणि रेकचे अनेक प्रकार आहेत. खरं तर, दोन्ही कामांसाठी यंत्रणा जवळ जवळ सारख्याच आहेत. सामान्य टेडिंग आणि रॅकिंग यंत्रमध्ये अनेक फिरणारी चाके आणि आडव्या पट्ट्या असतात, ज्यांचे दात फिरत्या रीलवर बसवलेले असतात. तथापि, टेडर्स आणि हे रेकमधील फरक त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आहे.
पलटणी यंत्रे (ज्याला इन्व्हर्टर देखील म्हणतात) ही अवजारे शेतात गवत पसरविण्यासाठी आणि उलटण्यासाठी वापरली जातात.
टेडर्स गवताच्या खालच्या बाजूस सूर्यप्रकाश देतात, त्यामुळे जलद वाळण्यास मदत होते.
चारा गोळा करणारे दातूळ (रॅकिंग) यंत्रे
रॅकिंग यंत्र हे अर्धवट वाळलेले गवत गोळा करतात आणि ओळीत (विंड रोमध्ये) बदलतात, ज्यामुळे गवत पूर्णपणे सुकते आणि बेलर कार्यक्षमतेने गवत उचलू शकतो.
सिंगल रॅपिंग यंत्र
गवताच्या तयार केलेल्या चौकोनी गाठी किंवा गोलाकार गाठी प्लॅस्टिक कागदामध्ये गुंडाळण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. या साध्या यंत्रामध्ये गाठी एका गोलाकार फिरणाऱ्या टेबलावर ठेवल्या जातात. प्लॅस्टिक कागद लपेटून गाठी स्वतः भोवती फिरते. त्या वेळी त्या भोवती गुंडाळी केली जाते. काही यंत्रात मोठ्या गाठीभोवती कागद फिरवून गुंडाळला जातो.
सध्या बाजारपेठेत चारा काढणीसाठी बरीच यंत्रे, तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे अचूक आणि अद्ययावत अशा नवीन यंत्रणा उपलब्ध होत आहेत. चारा कापणी करतानाच उत्पादनाची गुणवत्ता, त्यातील आर्द्रतेचे तात्कालिक आलेख/वितरण (रिअल-टाइम मॅपिंग) देणारी आधुनिक चारा कापणी यंत्रे आणि त्यासाठीच्या अत्याधुनिक मार्गदर्शक प्रणाली विकसित होत आहेत.
चक्रीय कापणी यंत्र
रोटरी मॉवरमध्ये रोपांच्या कापणीसाठी गोल फिरणारी वृतचीती (ड्रम) किंवा तबकडी (डिस्क) प्रकारचे पाते वापरले जाते. घास कापणी साठी आजकाल शेतकरी खांद्यावर अडकवलेले गवत कापणी यंत्र वापरतात. घास एका बाजूला ढकलून गठ्ठे करण्यासाठी गवत कापणी यंत्राच्या वर वक्राकार पत्रा लावला जातो. यासाठी कापणी करणाऱ्या व्यक्तीला कौशल्य असणे गरजेचे असते त्यामुळे त्यांना थोडे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण कापणीच्या वेगाबरोबर कापणीच्या उंचीवर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण जाते.
गाठी बांधणी (बेलिंग) यंत्रे
बेलर ही अशी यंत्र आहेत जी शेतातील पीक उचलतात आणि ते गासडीमध्ये दाबतात. बेलिंग ही गवत आणि सायलेज उत्पादनासाठी सामान्य प्रक्रिया आहे. दोन्ही प्रकारच्या उत्पादनात यंत्रसामग्री सामान्यतः सारखीच असते. तथापि, काही उत्पादक विशेष सायलेज बेलर देतात जे उच्च-ओलावा पिकांचे अधिक सहजपणे व्यवस्थापन करण्यासाठी डिझाइन केलेले असतात.
बेलरचे तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते
लहान आयताकृती बेलर : लहान, हलक्या वजनाच्या चौकोनी गाठी तयार करण्यासाठी मनुष्यचलित दट्ट्या ढकलून चालणारे यंत्र, लहान शेतकऱ्यांसाठी अधिक योग्य आहे.
मोठे आयताकृती बेलर ः खूप कॉम्पॅक्ट केलेले आणि जड गाठी तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचलित आणि शक्तीचलित यंत्र आहे.
मोठे गोल बेलर ः गोल गाठी तयार करण्याचे हे यंत्र पाश्चिमात्यांमध्ये लोकप्रिय आहे.
आधुनिक पाश्चात्त्य शेतकरी तीन प्रकारच्या गोल बेलरपैकी एक वापरतात :
व्हेरिएबल-चेंबर बेलर : अनेक बेल्ट असतात; गवताच्या प्रमाणात अवलंबून गाठींचा आकार बदलतो.
फिक्स्ड-चेंबर बेलर: स्टील रोलर्स किंवा बेल्ट असतात; गवत तयार होण्याच्या सुरुवातीपासून चेंबर समान परिमाण राखतो म्हणून गाठीचा अंतिम आकार बदलता येत नाही
सेमी-व्हेरिएबल फिक्स्ड चेंबर बेलर : ऑपरेशनल तत्व फिक्स्ड-चेंबर बेलर प्रमाणेच आहे, परंतु गाठींचा आकार बदलू शकतो.
सुका चारा किंवा हिरव्या कडबा कुट्टीच्या (सायलेज) गाठी गुंडाळण्यासाठी रॅपिंग यंत्रणा वापरल्या जातात. गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि बाह्य घटकांपासून (तापमान, आर्द्रता, सूक्ष्मजीव इ.) गाठींचे संरक्षण करणे हे या प्रक्रियेचे सामान्य उद्देश आहेत. ही यंत्रे विविध आकार आणि प्रकारात येतात. शेतकरी तयार गाठी बांधणी आणि प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून ठेवण्यासाठी सिंगल रॅपिंग यंत्र किंवा रॅपिंग बेलर वापरू शकतात.त्यात गाठी बांधणी बरोबरच रॅपिग करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.