
Agriculture Threshing Machine:
अवतल
सिलिंडर आणि अवतल एकत्रितपणे मळणी यंत्रणा (थ्रेशिंग युनिट) बनवतात. अवतल पिकापासून धान्य वेगळे करते आणि पेंढ्यापासून काढून टाकते. मळणीसाठी भरलेले पीक मळणी कक्षातच ठेवण्यासाठी अवतल प्रदान केलेले असते. त्यातून फक्त धान्य आणि थोड्या प्रमाणात भुस्सा बाहेर जाऊ शकेल. मळणी सिलिंडर आणि अवतल जाळी यामधील अंतर महत्त्वाचे असून, मळणी फक्त या जागेत होत असल्याने महत्त्वाचे असते.
अवतल हे लोखंडी पट्ट्या किंवा बारपासून बनलेले वक्र युनिट असून, ते मळणी सिलिंडरजवळ बसवले जाते. सिलिंडर आणि अवतलमधील अंतर धान्याच्या आकार आणि प्रकारानुसार समायोजित करता येते. उदा. गव्हासाठी अवतल अंतर ५ ते १३ मिमी आणि भातासाठी ५ ते १० मिमी असते. अवतल अंतर कमी झाल्यामुळे मळणी कार्यक्षमता वाढते, परंतु तुटफूट वाढून नुकसानही वाढते. अंतर वाढविल्यास तुटफूट कमी होत असली तरी मळणीची कार्यक्षमताही कमी होते. पुरवठ्याच्या बाजूला वरील झाकणाचे अंतर आउटलेटच्या तुलनेत कमी असते.
अवतलाचे दोन प्रकार
जाळीदार (स्क्रीन) अवतल : मळणी यंत्राचा खालील हा भाग अर्धवर्तुळाकार असून, एमएस रॉडपासून जाळीदार बनवलेला असतो. काही वेळा अवतल हे तारेनेही देखील बनवले आढळते. मळणीनंतरचा निघालेले पिकांचे आवरण व भुस्सा हा या छिद्रातून खाली जातो.
छिद्रित अवतल : सौम्य स्टील पत्र्यामध्ये (एमएस शीट) छिद्रे केलेली असतात. या छिद्रांचा आकार धान्याच्या आकारानुसार बनवला जातो. उदा. गहू, तांदूळ यांच्या सारख्या लांबट धान्यासाठी वेगळे, तर ज्वारी, बाजरीसाठी गोल धान्यासाठी वेगळे आणि सोयाबीन, हरभरा यांच्या आकारानुसार थोडी मोठी छिद्रे पाडली जातात. अवतल दोन्ही टोकांना लोखंडी पत्र्याने बंद केला जातो.
स्वच्छता यंत्रणा (क्लिनिंग युनिट)
धान्य भुश्शापासून वेगळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या, त्या हलविण्याची यंत्रणा आणि सोबत ॲस्पिरेटर (हवा ओढून घेणारा पंखा) किंवा ब्लोअर (हवेचा झोत तयार करणारा पंखा) यांची एकत्रित रचना केलेली असतात. या सर्व यंत्रणेला स्वच्छता यंत्रणा असे म्हणता.
ब्लोअर किंवा अॅस्पिरेटर : ज्या मळणी यंत्रामध्ये निर्वात सफाई युनिट दिलेले असते, त्याला सामान्यतः अॅस्पिरेटर प्रकारचे मळणी यंत्र असे म्हणतात. तर धान्य व भुस्सा खाली पडत असताना त्यावर आडव्या दिशेने हवा सोडण्यासाठी ब्लोअर बसवलेले असते. त्यास ब्लोअर प्रकारचे मळणी यंत्रण मिळतात.
मळणी केंद्रामध्ये मळणीमध्ये धान्य त्याच्या आवरणापासून वेगळे केले जाते. मात्र तो भुस्सा आणि धान्य एकत्रच असते. ते वेगळे करण्यासाठी मुख्य शाफ्टवर सफाई पंखा बसवला जातो. याच शाफ्टवर मळणी सिलिंडर, फ्लायव्हील आणि चलित पुली बसवलेली असते. पंखा हलक्या वजनाचा भुस्सा व अन्य कचरा बाहेर फेकतो (ब्लोअर) किंवा हवेद्वारे खेचून घेतो (ॲस्पिरेटर). उर्वरित विभागणीसाठी हलणाऱ्या चाळण्या उपयोगी ठरतात.
चाळणी : बहुतेक शक्तिचलित मळणी यंत्रे दोन चाळण्यानी सुसज्ज असतात. वरच्या चाळणीमध्ये छिद्राचा आकार हा धान्य दुसऱ्या जाळीवर जाईल इतपत मोठा निवडलेला असतो. या चाळण्या सतत हलत्या राहिल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. या चाळण्यामध्ये भुस्सा व अन्य काडीकचरा इ. वरच राहतो. तो बाहेर काढला जातो. इतर लहान चाळण्या लहान धान्य किंवा तणांच्या बिया इ. काढून टाकतात. स्वच्छ केलेले धान्य बाहेर पडते.
थरथरणारी यंत्रणा : चाळण्या हलणाऱ्या किंवा दोलनशील असतात. त्या हलविण्यासाठी क्रॅक जोडलेला असतो. हा क्रॅंक मुख्य अक्षावरून (शाफ्ट) बेल्ट किंवा रॉडद्वारे मिळालेल्या ऊर्जेने चालतो. विशेषतः मुख्य शाफ्टची वर्तुळाकार हालचाल चाळण्याच्या दोलनशील गतीमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे त्या वर आलेले धान्य व भुस्सा इ. हलते. चाळणीतून गाळले जाण्याची क्रिया योग्य प्रकारे होण्यास मदत होते त्यासाठी त्यांच्या दोलनाची गती व वारंवारिता महत्त्वाची असते. ती आपल्या गरजेनुसार समायोजित करता येते.
शक्ती संचालन यंत्रणा
(पॉवर ट्रान्समिशन युनिट) : मळणी यंत्रे सहसा ट्रॅक्टरच्या पीटीओवर आणि कधी कधी इलेक्ट्रिक मोटर्स किंवा डिझेल इंजिनच्या ऊर्जेवर चालवली जातात. मळणी यंत्र शेतात उभे केल्यावर/बसवल्यानंतर, ट्रॅक्टर पीटीओ शाफ्टला फ्लॅट पुलीने जोडले जाते. या पुली फ्लॅट बेल्टच्या साह्याने योग्य पद्धतीने जोडल्या जातात आणि मळणी यंत्र चालवले जाते. मळणी यंत्राच्या मुख्य शाफ्टवर बसविलेला ब्लोअर फॅन फिरून स्वच्छतेचे काम करतो.
या मुख्य शाफ्टच्या ऊर्जा व्ही-बेल्ट आणि क्रॅंक व्हीलच्या मदतीने चाळण्या हलत्या (दोलनशील) ठेवल्या जातात. मळणी यंत्राच्या मुख्य अक्षावर एका टोकाला एक जड फ्लायव्हीलदेखील दिलेले असते. ते सामान्यतः ओतिव लोखंडापासून बनलेले असते. ते गतिज ऊर्जा साठवून योग्य गतीने चढ-उताराशिवाय यंत्रणा फिरती ठेवते. हे एखाद्या बॅटरीमध्ये विद्युत ऊर्जा साठविण्याप्रमाणेच असते. या अवजड फ्लाय व्हीलमुळे संपूर्ण मळणी सिलिंडरला सतत आणि समान प्रमाणात गतिज ऊर्जा पुरवली जाते.
वाहतूक चाके : वाहतुकीसाठी मळणी यंत्राच्या पायांवर चाके दिली जातात. ही चाके पूर्वी बहुतेक ओतिव लोखंडाने बनवली जात. मात्र अलीकडे चांगल्या वाहतुकीसाठी हवा भरलेल्या चाकांचा वापर केला जातो.
मळणी यंत्रामध्ये एक अतिशय मजबूत फ्रेम दिली जाते; ज्यावर सर्व कार्यात्मक भाग जोडलेले असतात. फ्रेम सहसा जाड लोखंडी ॲंगलपासून व पुरेशी मजबूत बनवलेली असते. शेतातील परिस्थिती, काम करताना होणारी कंपने झेलण्याइतपत ते ताकदवान असावी लागते.
डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.