
चंद्रकांत जाधव
Tribal Farming Technology: नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील डोंगराळ भाग व आदिवासीप्रवण क्षेत्र लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध अवजारे- यंत्रांची निर्मिती केली आहे. यात पेरणी, आंतरमशागतीपासून ते काढणीपर्यंच्या विविध यंत्रांचा समावेश आहे. त्यांचा प्रसारही सातपुड्यासह अन्य क्षेत्रात झाला असून मजुरी खर्चासह वेळ, श्रमांतही बचत होण्यास बळ मिळाले आहे.
नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यांमध्ये नंदुरबार जिल्हा वसला आहे. सातपुडा पर्वतरांगा आणि आदिवासीप्रवण असे जिल्ह्याचे स्वरूप आहे. जिल्ह्यात अल्पभूधारकांची संख्या ६७ हजारांच्या आसपास आहे. कपाशी, भुईमूग, कांदा, मका, अन्य खरीप व रब्बी हंगामातील पिकांव्यतिरिक्त केळी, पपई, मिरची आदी पिके असतात. डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) येथे कार्यरत आहे.
जमिनीचे प्रकार, शेतकऱ्यांची जमीन धारणा, मशागतीच्या कामांची गरज, शेतीपद्धतीची भौगोलिक रचना आदी बाबींचा विचार करून केव्हीकेने विविध अवजारे- यंत्रांची निर्मिती किंवा विकास साधला आहे. केव्हीकेचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) जयंत उत्तरवार यांच्याकडे ही मुख्य जबाबदारी आहे. यातील काही अवजारांची थोडक्यात झलक.
कापसासाठी बैलचलित रिजर
कोरडवाहू शेतीची गरज लक्षात घेऊन बैलचलित रिजर तयार केले आहे. लागवडीत कापसाच्या ओळी उताराला आडव्या राहतील असा आग्रह आहे. लागवडीनंतर ३५ ते ६० दिवसांनी दोन ओळींत या यंत्राद्वारे सऱ्या पाडल्या जातात. सरी ओढताना कोळपे दर आठ ते दहा फुटांनंतर उचलून घेतले जाते. त्यामुळे सरी सलग न पडता मातीचे अडथळे सरीमध्ये तयार होतात. छोटे भाग झाल्याने पावसाचे पाणी साठण्यास व मुरण्यास मदत होते. जमिनीची धूप कमी होते. पूर्वी सरी पाडण्यासाठी शेतकरी कोळप्याला दोर गुंडाळून ते दोन ओळीत बैलाद्वारे चालवायचे.
आता त्याऐवजी सुधारित बैलचलित रिजरचा वापर कार्यक्षमतेने करता येतो. रिजर मजबूत लोखंडी असून आकार इंग्रजी ‘व्ही’ प्रमाणे आहे. वजन सुमारे २५ किलो आहे. पिकाच्या दोन ओळींतील अंतरानुसार रुंदी दोन ते चार फूट किंवा कमी अधिक करण्याची सुविधा आहे. बैलांचे श्रम, वेळ तसेच सऱ्या पाडण्याच्या कामांमध्ये मोठी बचत होते. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत केव्हीकेने या यंत्राचा प्रसार केला आहे. काही शेतकऱ्यांनी या धर्तीवर ट्रॅक्टरचलित रिजर तयार करून घेतला आहे.
लाकडीऐवजी लोखंडी नांगर
सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा, शहादा व तळोद्यातील डोंगराळ भागात चढ-उताराची शेती असल्याने मोठे बैल वापरता येत नाहीत. त्यांना श्रमही खूप होतात. तेथे शेतकरी लाकडी नांगराचा वापर करतात. समस्या लक्षात घेऊन केव्हीकेने लहान बैलांद्वारे मशागत, पेरणी व आंतरमशागतीसाठी उपयुक्त, वजनाने हलकी व वापरण्यास सोपी अवजारांची मालिकाच विकसित केली आहे. त्यांची वाहतूकही शेतकरी सहज करू शकतात. यात लोखंडी नांगर, बैलचलित पेरणी यंत्र, बैलचलित कोळपे, रिजर व कल्टिव्हेटर आदींचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वनपट्टेधारकांना ही अवजारे उपलब्ध केली आहेत. केव्हीकेच्या तज्ज्ञांनी शेकडो शेतकऱ्यांना वापराबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले. शंभरहून अधिक गावांमध्ये ही यंत्रणा पोहोचली आहे.
मोगी कोळपे ठरले लोकप्रिय
केव्हीकेने विकसित केलेले मनुषयचलित मोगी कोळपे लोकप्रिय झाले आहे. तणनियंत्रण, खुरपणी- कोळपणी, मातीची भर देणे अशी कामे हे एकचाकी यंत्र करते. त्याचा प्रसार शहादा, तळोदा, नवापूर, नंदुरबार तालुक्यातील सपाट क्षेत्रासह दुर्गम अक्कलकुवा, धडगावातही झाला आहे. १५, २० आणि ३० सेंटिमीटर रुंदीचे त्यास पाते आहे. हलक्या व मध्यम जमिनीत ज्वारी, बाजरी, मका, कांदा, भुईमूग, मिरची, भाजीपाला आदी ओळीतील पिकांसाठी ते उपयुक्त आहे. वजन सात किलो असल्याने सहज उचलून नेता येते. पिकांना मातीची भर देण्यासाठी त्यास रिजर जोडता येतो. दोन जणांच्या साह्याने पिकांना पाणी देण्यासाठी सऱ्याही ओढता येतात. पात्याचा आकार इंग्रजी ‘व्ही’ प्रमाणे असल्याने वारंवार पाते स्वच्छ करण्याची आवश्यकता नसते. उभे राहून चालवावे लागत असल्याने महिला, पुरुष कमी श्रमात कार्यवाही करू शकतात. महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगण आदी नऊ राज्यांतील अडीच हजारांहून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत.
शेतकरी सुविधा केंद्राद्वारे प्रसार
शेतीत राबणाऱ्या महिलांना गुडघेदुखी, पाठीच्या मणक्याचे आजार, हातांना जखमा, त्वचेवर खाज सुटणे असे त्रास सहन करावे लागतात. या अवजारांचा प्रसार महिला व अन्य शेतकऱ्यांपर्यंत करण्यासाठी केव्हीकेने गावांमधून शेतकरी सुविधा केंद्र उभारले आहे. त्याद्वारे छोटी अवजारे, यंत्रे शेतकऱ्यांना खरेदी व भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जातात. वापरण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते.
कांदा, लसूण यासाठी हातखुरपे
कांदा, लसूण पिकांत निंदणी, आंतरमशागत करताना पिकास इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.. तण काढण्यासह आंतरमशागतीचे काम वेळखाऊ असल्याने वेळ अधिक लागतो. त्यामुळे मजुरीचा खर्च वाढतो. श्रमही अधिक लागतात. त्यावर केव्हीकेने विकसित केलेले हात खुरपे हा चांगला पर्याय ठरला आहे. त्यास तीन दाते आहेत. बसून काम करता येतेच, मात्र हँडलला लाकडी दांडा किंवा बांबू लावल्यास उभे राहूनही आंतरमशागत करता येते. बटाटे, हळद, आले काढणी, परसबागेसह कुंड्यांमध्येही माती भुसभुशीत करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. नंदुरबार जिल्ह्यात ५५० पेक्षा अधिक शेतकरी त्याचा वापर करीत आहेत.
जयंत उत्तरवार ८२०८०२७५४४, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदे, नंदुरबार
कांदा, भुईमूग, गवार पिकात कोळप्याचा वापर
काकरदा (ता. नंदुरबार) येथील देविदास महाजन यांची सात एकर शेती असून त्यात कापूस, भुईमूग, गवार व अन्य भाजीपाला ते घेतात. केव्हीकेकडील अवजारे विशेषतः मोगी कोळप्याचा वापर ते करतात. वापरण्यास सुलभ असल्याने आम्ही पती-पत्नी त्याचा वापर करतो. त्यातून निंदणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. एका दिवसात एक एकरात कोळपणी शक्य झाल्याचे महाजन म्हणाले.
देविदास महाजन ९७६३३७११९१
दुर्गम क्षेत्रात लाभ
धनाजे (ता. धडगाव) या दुर्गम क्षेत्रातील जात्र्या पावरा यांची तीन एकर शेती आहे. पूर्वी ते पारंपरिक लाकडी नांगराचा वापर करायचे. त्यात अचूकता साध्य होत नव्हती. वेळ खर्च व्हायचा. आता केव्हीकेकडील लोखंडी नांगर, पेरणी यंत्राचा वापर ते करतात. त्यातून खर्चासह वेळेतही बचत होत आहे.
जात्र्या निंबा पावरा ९४०४५६८८३२,
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.