
डॉ. एस. एस. वाणे, डॉ. ए. एस. झापे
Facilities of Farmer: सध्या कृषी क्षेत्रात कुशल मजुरांचा तुटवडा सातत्याने भासत आहे. त्याची कारणेही अनेक आहेत. शेती व्यवसाय कमी काळात, कमी कष्टात आणि आवश्यक असेल त्या ठिकाणी मजुरांचा उपयोग करून इतर कामे यंत्राव्दारे करणे फायद्याचे ठरत आहे. या मजूर टंचाईवर मात करण्याकरिता आणि आपल्या शेतातील उत्पादकता वाढविणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, मालाची ने-आण, साठवणूक आणि त्यावरील प्रक्रिया करणे गरजेचे बनले आहे. भारतात दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असलेले शेतकरी ८३ टक्के आहेत. कृषी यांत्रिकीकरणाचे महत्त्व समजलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण तसेच कृषी यांत्रिकीकरणामध्ये ८ ते १० टक्के कामांचा समावेश आहे.
पीक उत्पादनवाढीसाठी शेतीची सर्व कामे वेळेत होणे फार महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने जमीन मशागत, पेरणी/ लागवड, आंतरमशागत, पीक संरक्षण, काढणी आणि मळणी, पाणी व्यवस्थापन, शेतीमाल तसेच विविध घटकांची वाहतूक, काढणीनंतर शेतीमाल व्यवस्थित ठेवणे आणि शेतीमालावर प्रक्रियेसाठी कुशल मजुरांची कमतरता आणि त्यासाठी लागणाऱ्या अवजारांच्या किमती जास्त आहे. शेतीला लागणारे यंत्रे तसेच कृषी अवजारे प्रत्येक शेतकऱ्यास विकत घेणे परवडण्यासारखे नाही. तसेच आजकाल नोकरी करूनही शेती करणाऱ्यांना पूर्ण वेळ शेतीसाठी देणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन गावामध्ये कृषी अवजारांची बँक असेल तर शेतीला लागणारी यंत्रे, अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध होऊन शेतीची कामे वेळेत होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल.
कृषी अवजार बँकेचा उद्देश
छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेगवेगळी अवजारे आणि यंत्रे उपलब्ध करून देणे.
अवजारांच्या वैयक्तिक मालकीबाबत कुणाचीही आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होऊ न देणे.
शेतीला लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण जेथे कमी आहे तेथे यांत्रिकीकरण वाढविणे.
वेगवेगळी अवजारे, यंत्रे भाडेतत्वावर देण्याची सेवा उपलब्ध करून देणे.
शेतीच्या हंगामी कालावधीत यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करणे मुख्यत्वे छोट्या शेतकऱ्यांकडे एखाद्या पिकासाठी वेगवेगळी कामे करणारी यंत्रे, अवजारे भाडेतत्वावर देण्याची सेवा उपलब्ध करून देणे.
अवजार बँकेची स्थापना करताना...
गावशिवारातील पाच ते सात किलोमीटर क्षेत्रामध्ये छोटे शेतकरी असावे.
४ ते ५ गावांच्या मध्यभागी असणाऱ्या गावामध्ये कृषी अवजारांचे बँकेची सुरुवात करावी.
ट्रॅक्टरची संख्या कमी असणारे गाव.
अन्नधान्याचे उत्पादन कमी, परंतु उत्पादन क्षमता जास्त असणारे गाव.
प्रत्येक अवजारास बँकेमार्फत कमीत कमी १० हेक्टर प्रति दिवस किंवा ३०० दिवस एका हंगामात शेती मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत काम मिळावे.
बँकेमध्ये उपलब्ध अवजारे, यंत्रे
ट्रॅक्टर : कमीत कमी ३५ एच पी क्षमता.
जमीन तयार करणे : नांगर, पलटी नांगर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर.
पेरणी/लागवड : पेरणी यंत्र, रुंद वरंबा व सरी यंत्र, खत व पेरणी यंत्र.
आंतरमशागत : ट्रॅक्टरचलित डवरणी / कोळपणी यंत्र.
पीक संरक्षण : फवारणी पंप (ट्रॅक्टरचलित/ स्वयंचलित), नॅपसॅक फवारणी पंप.
काढणी आणि मळणी : कॅम्बाईन हार्वेस्टर, मळणी यंत्र.
पाणी व्यवस्थापन : मोटर, पंप, ठिबक / तुषार सिंचन संच.
शेतीमाल, वस्तूंची वाहतूक : ट्रॉली.
शेतीमाल साठवण सुविधा : शीतगृह.
प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रे : उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उदा. सोयाबीन प्रक्रियेसाठी यंत्रणा, दूध, पनीर, पीठ निर्मिती यंत्रणा.
- डॉ. एस. एस. वाणे, ९४२३४७३६२९
(विषय विशेषज्ञ- कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.