Zero Tillage Technique: शून्य मशागत तंत्रामुळे सुधारतेय जमीन अन् शेती

Agriculture Technology: चंद्रशेखर भडसावळे यांच्या एसआरटी पद्धतीने प्रेरित होऊन, हिंगोली जिल्ह्यातील अंबा येथील संगीता व लक्ष्मीकांत अंबेकर दांपत्याने सुमारे ९० टक्के सेंद्रिय शून्य मशागत तंत्रज्ञान स्वीकारले आहे.
Sangeeta and Laxmikant Ambekar
Sangeeta and Laxmikant AmbekarAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture: एसआरटी पद्धतीचे जनक व प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांच्या प्रेरणेतून हिंगोली जिल्ह्यातील अंबा (ता. वसमत) येथील संगीता व लक्ष्मीकांत या अंबेकर दांपत्याने शून्य मशागत तंत्रज्ञान, सुमारे ९० टक्के सेंद्रिय पद्धतीचा वापर व गादीवाफा पद्धती आदींचा स्वीकार केला आहे. त्यातून कापूस, सोयाबीनसह रब्बी व उन्हाळी पिकांचे व्यवस्थापन सुधारले आहे. त्यातून जमिनीची सुपीकता, उत्पादन खर्चात बचत होण्यासह एकरी उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात वसमत ते औंढा नागनाथ राज्य महामार्गावर अंबा (ता. वसमत) गाव आहे. येथून वाहणाऱ्या आसना नदीच्या उपनदीच्या दोन्ही बाजूंनी अंबेकर या संयुक्त कुटुंबांची १८ एकर जमीन आहे. कुटुंबातील लक्ष्मीकांत व संगीता हे अंबेकर दांपत्य मुख्यतः शेती करते. कुटुंबात लक्ष्मीकांत यांचे सख्खे बंधू उमाकांत, चुलते रघुनाथराव, काकी रंजनाताई, चुलतबंधू प्रसाद व नवी पिढी मिळून १४ पर्यंत सदस्य आहेत. बंधू नोकरीनिमित्त विविध ठिकाणी वास्तव्यास आहेत. लक्ष्मीकांत यांचे बीएस्सी.डी.फार्मपर्यंत शिक्षण झाले असून त्यांचे गावी मेडिकल स्टोअर आहे. संगीता यांचे बीएस्सी.बीएड.पर्यंत शिक्षण झाले आहे. मुलगा प्रतीक व मुलगी प्रतीक्षा शिक्षण घेत आहेत.

Sangeeta and Laxmikant Ambekar
Zero Tillage Farming: शून्य मशागतीचे फायदे अनेक

शून्य मशागत तंत्राने शेती

शेतीचे व्यवस्थापन पतीच्या साथीने संगीता सांभाळतात. सिंचनासाठी दोन विहिरी, एक बोअरची सुविधा आहे. खरिपात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद तर रब्बीत हरभरा,गहू,करडई,भुईमूग आदी पिके असतात. दरवर्षी चार-पाच एकरांत हळद असते. दीड एकरांत मोसंबी लागवड असून बांधावर केसर आंब्याची लागवड आहे. मागील काही वर्षात हवामान बदलाचे परिणाम पाहण्यास मिळत आहेत. पावसाचे असमान वितरण, किडी-रोग, उत्पादनातील घट, वाढलेला उत्पादन खर्च आदी विविध कारणांमुळे अंबेकर दांपत्य अडचणीतून जात होते.

त्यातून मार्ग काढण्यासाठी ते शाश्वत शेतीचा पर्याय शोधत होते. त्यातून यू ट्यूबवर एसआरटी पध्दतीचे जनक व रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांचा शून्य मशागत शेती तंत्रावर आधारित व्हिडिओ पाहण्यात आला. त्याचा सखोल अभ्यास करून हे तंत्रज्ञान आपल्या शेती पद्धतीत वापरायचे असे दांपत्याने ठरवले. आता चार वर्षांपासून १४ एकरांवर याच तंत्राने सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा आदी पिके घेतली जात आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर

शून्य मशागत तंत्र पद्धतीत प्रत्येक पिकासाठी गादीवाफा (बेड) पद्धतीचा वापर केला जातो. दोन बेडमधील अंतर साडेचार फूट तर रुंदी दोन फूट ठेवली जाते. लागवडीसाठी टोकण यंत्राचा वापर होतो. ट्रायकोडर्मा या जैविक घटकाची बीजप्रक्रिया केली जाते. खरिपात कापूस, सोयाबीन आदी पिकांच्या काढणीनंतर कोणतीही मशागत न करता त्याच बेडवर रब्बीतील पिके घेतली जातात. मागील वर्षी टोकण यंत्राचा वापर करून तीन एकरांत कपाशीची सघन पद्धतीने लागवड केली. दोन झाडांतील अंतर एक फूट ठेवले. कपाशीच्या चार ओळींनंतर तुरीची एक ओळ घेतली.

उगवणीपूर्वी तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर ब्रश कटरद्वारे तण नियंत्रण व्यवस्थापन केले. पुढेही हरभरा पिकातील तणनियंत्रणासाठी याच पद्धतीने नियोजन होते. अलीकडील प्रयोगात नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने कपाशी तसेच तूर पिकाचे नुकसान झाले. फरदडचे उत्पादन घेता आले नाही. तरीही कापसाचे एकरी सहा क्विंटल तर तुरीचे पाच क्विंटल उत्पादन मिळाले. डिसेंबरमध्ये पऱ्हाटी व तुऱ्हाटी कापून घेतली. त्यानंतर गादी वाफ्यावर ठिबकच्या नळ्या अंथरून उन्हाळी सूर्यफुलाची लागवड केली. सध्या त्याची काढणी सुरू आहे. दीड एकरांत मोसंबीची लागवड असून त्यामध्येही शून्य मशागत तंत्राचा वापर केला आहे.

Sangeeta and Laxmikant Ambekar
Zero Tillage Farming: शून्य मशागत शेती तंत्र हीच कोरडवाहूची दिशा

संगीता आपला अनुभव सांगताना म्हणतात, की हळद पिकात शून्य मशागत तंत्राच्या वापरासाठी काही मर्यादा जाणवत आहेत. साडेचार फूट अंतरावर गादीवाफे तयार करून ट्रायकोडर्माची बेणेप्रक्रिया करून लागवड करतात. गावापासून दूर असल्याने शेतात सालगड्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

सेंद्रिय पद्धतीचा वापर

शेतीत रासायनिक पद्धतीचा केवळ १० टक्क्यांपर्यंत किंवा गरजेएवढाच वापर केला जातो. शेतातून जाणाऱ्या नदीकाठी वड, मोहगणी, अर्जुन, बेल, बांबू आदीची वनराई आहे. बांबूचे बेट असल्याने मातीची धूप होत नाही. वनराईमुळे पक्ष्यांचे वास्तव्य असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रणास मदत होते. झाडपाला वापरून दशपर्णी अर्क तयार केला जातो. यासह जिवामृत, वेस्ट डी कंपोझर, गांडूळ खत आदींचाही वापर होतो. एक बैलजोडी, गाई व दोन म्हशी आहेत. त्यांच्यापासून शेणखत व गोमूत्र उपलब्ध होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाकडून निर्मित बायोमिक्स तसेच अन्य सेंद्रिय, जैविक निविष्ठांचा वापर सर्व पिकांसाठी केला जातो.

उत्पादन व झालेले फायदे

शून्य मशागत तंत्राचा अंगीकार केल्याने अनेक फायदे दिसू लागले आहेत. जमीन भुसभुशीत व सुपीक होऊ लागली आहे. धूप कमी होत आहे. पिकांच्या मुळ्या, अवशेष जमिनीत कुजविल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढीस लागले आहे. नांगरणी व त्यासंबंधी प्रत्येक हंगामात होणारा खर्च कमी होऊन एकूण उत्पादन खर्च कमी झाला आहे. टोकण यंत्र आणि तण नियंत्रणसाठी ब्रश कटर यांचा वापर केला जात असून मजुरांवरील अवलंबित्व व त्यांच्यावरील खर्च कमी झाला आहे.

शून्य मशागतीसह सेंद्रिय पद्धतीचा वापर, गादीवाफा पद्धत व एकूणच व्यवस्थापन सुधारून प्रत्येक पिकाच्या एकरी उत्पादनात दोन ते तीन क्विंटलची वाढ झाली आहे. कपाशीचे पूर्वी सहा ते सात क्विंटल मिळणारे उत्पादन आता ८ ते ९ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे. सोयाबीनचे एकरी ११ ते १२ क्विंटलपर्यंत तर हरभऱ्याचे ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू लागले आहे. हळदीचे एकरी २३ ते २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.

प्रक्रिया उद्योगाची जोड

सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळदीची पावडर तयार करून त्याची विक्री करतात. मागील दहा वर्षांत या उद्योगात त्यांचा चांगला जम बसला आहे. मूग, उडीद, तूर या कडधान्यांच्या डाळीही तयार केल्या जातात. करडईचे तेल काढून घरी वापरतात. विविध ठिकाणचे महिला बचत गट तसेच कृषी प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन गोदावरी फूड प्रॉडक्ट्स या ब्रॅण्डने त्या उत्पादनांची विक्री करतात. सन २०१७ मध्ये जिल्हास्तरीय आदर्श उद्योजिका पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शेतीत पती लक्ष्मीकांत यांचे वसमतचे तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे, मंडळ कृषी अधिकारी मनोज लोखंडे, कृषी सहायक परासराम वानखेडे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.

संगीता अंबेकर ९९२३४८१५०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com