
Indian Agriculture: सध्या उन्हाळी मशागतीची कामे राज्यात प्रगतिपथावर आहेत. कोणत्याही पिकाची पेरणी अथवा लागवड करायची असेल तर जमीन खोल नांगरून घ्यावी, एखादी वखरपाळी द्यावी, येथूनच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सुरू होते. शेतीची मशागत केली म्हणजे जमीन लागवड योग्य होते, घातक तण आणि रोग-किडींचा बंदोबस्त करण्यासाठी मशागत ही बाब आवश्यकच आहे. उत्तम मशागत म्हणजे पीकही उत्तम अशी सर्वसाधारण समजूत शेतकऱ्यांमध्ये आहे.
विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काळ्या कसदार जमिनीची तर दरवर्षी पेरणीपूर्व नांगरणी, वखरणी बहुतांश शेतकऱ्यांना करावीच लागते. राज्यात यांत्रिकीकरण वाढल्याने जवळपास ८० टक्क्यांहून अधिक मशागतीची कामे ट्रॅक्टरने होत आहेत. ट्रॅक्टरच्या वजनाचा अतिरिक्त दाब पडून मातीचे घनीकरण होत आहे. घनीकरणामुळे मातीची रचना बदलते, मातीमध्ये हवा-पाणी जाण्यासाठीची छिद्रे कमी होतात.
पिकांच्या मुळांची वाढ कमी होऊन उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटते. नैसर्गिक स्थितीत असलेल्या जमिनीची मशागत केली असता तिच्यातील कार्बनसह इतरही पोषक घटकांचे प्रमाण कमी होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. खोल मशागतीने मातीची धूप वाढते. आपल्या राज्यात, देशातही मशागत ते काढणीपर्यंत पिकांचे उत्तम व्यवस्थापन केले तरी बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळते. त्याचे कारण मातीचे होत असलेले घनीकरण हे आहे.
यावर उपाय म्हणून जगभर आता शून्य मशागत तंत्राचा वापर वाढत आहे. आपल्या राज्यातही प्रतापराव चिपळूणकर या शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्राचे यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता त्याचा प्रसार राज्यभर करीत आहेत. त्यात त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. पोकरा प्रकल्पांतर्गतही शून्य मशागत तसेच बीबीएफ तंत्राचा अवलंब केला असता नैसर्गिक आपत्तीत पिके वाचून शेतकऱ्यांचा फायदाच झाला आहे. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांमध्ये शून्य मशागत तंत्राबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पूर्वापार शेतकरी शेतीची मशागत करीत आले असताना शून्य मशागत तंत्रावर त्यांचा पटकन विश्वास बसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
शेतात बियाणे पेरता यावे, पिकाला पाणी देण्यासाठी सऱ्या, वाफे करता याव्यात आणि तण तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता शेतकरी नांगरणी करतात. नांगरट न करता ही तिन्ही उद्दिष्टे आपण साध्य करू शकलो तर पिकांची वाढ, उत्पादनवाढ यासाठी नांगरणीची आवश्यकता नाही. आता पेरणीऐवजी टोकन पद्धतीने लागवड तंत्राचा प्रसार होतोय. कपाशीची तर सर्रासपणे टोकन केली जाते, बरेच शेतकरी सोयाबीनही टोकन पद्धतीने लावत आहेत.
उन्हाळ्यात कडक झालेली जमीन पावसाच्या एक-दोन पाण्याने मऊ होते. अशा जमिनीत कोणत्याही पिकाची नांगरट न करता टोकन करता येते. टोकन पद्धतीत पेरणीपेक्षा बियाणे कमी लागते. खरिपातील बहुतांश पिकांना पाणी देण्याची गरज नाही. शिवाय ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करताना सरी, वरंबे अशा रचनेची गरज नाही. सरी, वरंब्याची रचना करण्यासाठी दरवर्षी नाही तर तीन वर्षांत एकदा मशागत करायला हरकत नाही.
तण नियंत्रणासाठी तणनाशके उपलब्ध आहेत, त्यांचा समजून उमजून वापर केला तर तण व्यवस्थापन होते. अशा प्रकारच्या तण व्यवस्थापनाने जमिनीचा पोतही सुधारतो. कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी खोल नांगरटीशिवाय एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीत इतर अनेक प्रभावी उपाय आहेत, त्यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. अर्थात मशागत की शून्य मशागत कोणते तंत्रज्ञान वापरायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य शेतकऱ्यांना आहे. परंतु उन्हाळी मशागतीसाठीचे एकंदरीतच कष्ट, त्यावर होणारा खर्च आणि त्याचे काही तोटेही पाहता शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्राकडे हळूहळू वळायला हरकत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.