
Agriculture Technology: खरिपात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होत असली तरी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता करणे ही सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीही तशी आव्हानात्मक बाब असते. त्यासाठी अलीकडे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर चारा निर्मितीचे प्रयत्न अनेक शेतकरी करतात. मात्र यात शेडची उभारणी, त्यातील रॅक्स यासाठी लोखंडी ॲंगलचा वापर वापर केला जातो.
ही तंत्रज्ञान अधिक सोपे, स्वस्त आणि कार्यक्षम करण्यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने अभ्यास केला आहे. त्यातून विभागप्रमुख डॉ. सुचिता गुप्ता, राजेश मुरूमकार आणि अजय तळोकार यांनी यंत्रसामग्री, स्ट्रक्चर डिझाइन, बियाण्यांची निवड, सिंचन पद्धती आदी सर्व घटकांचा विचार करीत हायड्रोपोनिक युनिट प्रभावीपणे विकसित केले. हे मॉडेल अनेक शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरू शकते.
हायड्रोपोनिक ही मातीविना शेती करण्याची पद्धती आहे. यात फक्त पाणी किंवा पोषणतत्वयुक्त पाण्याचा माध्यम म्हणून वापर केला जातो. बिया अंकुरित करून त्याची थोडी वाढ केली जाते. यात पाण्याचाही पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यामुळे कमी जागेमध्ये, मर्यादित पाण्यामध्ये व १० ते १२ दिवसांत पोषक अशा हिरव्या उपलब्धता करणे शक्य होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने संरचना (स्ट्रक्चर) उभारणीसाठी लोखंडी अँगलऐवजी ३×२×३ मीटर आकाराचे यू-पीव्हीसी पाइप वापरले आहेत. या संरचनेमध्ये फॉगर सिस्टिम, टायमर, प्लॅस्टिक ट्रे आणि छताला ५० ते ७५ टक्के क्षमतेचे शेडनेट बसवले जाते. ही संरचना उष्णतेचा परिणाम कमी करत आर्द्रता वाढवते. त्यामुळे अशा नियंत्रित वातावरणात बिया अंकुरित होऊन वेगाने वाढतात.
हायड्रोपोनिक पद्धतीने चारा तयार करण्यासाठी चांगल्या प्रतिचा गहू किंवा मका बियाणे निवडावे. बियाण्यांची उगवण क्षमता किमान ८० टक्क्यांपेक्षा अधिक असावी. सुरुवातीला संबंधित बियाणे स्वच्छ धुऊन १२ ते २४ तास पाण्यात भिजवत ठेवावे. नंतर त्यातील पाणी निथळून २४ ते ३० तास गोणीत झाकून ठेवून मोड आणावेत. मोड आलेले बियाणे ट्रेमध्ये पसरवून हायड्रोपोनिक स्ट्रक्चरच्या रॅकमध्ये ठेवावे.
बाहेरीत तापमानाचा विचार करून दर दोन तासांनी दोन मिनिटे किंवा दर तासाला एक मिनिट या वारंवारितेने फॉगरद्वारे अत्यंत सूक्ष्म थेंबानी (धुके) तयार करावे. त्यामुळे शेडमध्ये आर्द्रतायुक्त वातावरण राहते. प्रति ट्रे २५० ते ३०० मि.लि. पाणी दररोज लागते. १० ते १२ दिवसांत २० ते ३० सेंमी उंचीचा हिरवा चारा तयार होतो. हा सकस हिरवा चारा जनावरांना दिल्यास त्यांची उत्पादकता नक्की वाढते.
- मातीविना केवळ पाण्यावर आधारित व वर्षभर उत्पादन घेणे शक्य
- अतिशय कमी पाण्यात हिरवा चारा उत्पादन शक्य. पारंपरिक शेतीतील चारा उत्पादनाच्या तुलनेत पाण्यात ८० ते ९० टक्के बचत होते.
- पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेमध्ये कमी जागेत, कमी मजुरांमध्ये अधिक उत्पादन शक्य.
- कमी वेळेत (८ ते १० दिवसांत) जनावरांना खाण्यायोग्य चारा उपलब्ध होतो.
- पोषणमूल्ये जास्त व पचायला सोपा चारा.
- कोरडवाहू किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर.
संरचना उभारणीत सामान्य शेतकरी एमएस स्टील किंवा जीआय पाइपचा वापर करतात. हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये पाणी आणि अधिक आर्द्रता यामुळे माइल्ड स्टील किंवा जीआय पाइपच्या संरचना गंजण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची सक्षमता कमी होत जाते. नव्याने तयार केलेल्या संरचनेमध्ये त्याऐवजी यूपीव्हीसी पाइपचा वापर केला जातो. त्यामुळे सतत पाण्याशी संपर्क राहूनही स्ट्रक्चर सुस्थितीत राहते. ही संरचना माइल्ड स्टील व जी आय पाइपच्या तुलनेत स्वस्त असून मजबूतही आहे. असे तयार केलेली संरचना हलकी असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणेही सोयीचे ठरते. ऊन, वारा व पावसाचा कोणताही परिणाम होत नाही.
हिरवा चारा उत्पादनातील वेळ आणखी कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश हा घटक महत्त्वाचा ठरतो. कारण तो प्रकाश संश्लेषणामध्ये म्हणजे वनस्पतीच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करतो. नियंत्रित पर्यावरणीय शेतीसाठी प्रकाश स्रोत म्हणून एलईडीचा वापर करता येतो. मात्र तो अधिक प्रभावी करण्यासाठी विविध रंगाच्या एलईडी प्रकाशासोबत त्यांची तीव्रता आणि योग्य कालावधी निर्धारित करण्यासाठी अभ्यास करण्यात आला.
त्यातून पंदेकृवि हायड्रोपोनिक स्ट्रक्चरमध्ये गहू व मका हिरवा चारा पिकांचे उत्पादन घेताना रात्रीच्या वेळी १२ तास ९३० लक्स प्रकाश तीव्रतेचे लाल व जांभळा प्रकाश उत्सर्जित करणारे एलईडी डायोड्स वापरल्यास पिकाची व त्यातील पोषणमूल्याची वाढ वेगाने होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
संपर्क : डाॅ. राजेश मुरूमकार, ९८५०५४५३८४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.