Minister Caught Gaming: ऐसे कैसे झाले भोंदू

Rummy In The Assembly Session: ऑनलाइन रमी खेळताना रंगेहाथ सापडल्यामुळे नाचक्की झालेल्या कृषिमंत्र्यांच्या कृतीमागचा हेतू सहानुभूतिपूर्वक समजून घेतला पाहिजे. विषाचा कडू घोट गिळणाऱ्या भोळासांब निलकंठ महादेवाशीच या कृतीची तुलना करता येईल.
Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao KokateAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

१. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाइन रमी खेळताना विधानपरिषदेत रंगेहाथ सापडले.

२. त्यांच्या कृतीमागे सहानुभूतीने पाहावे लागेल, कारण ते शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, असा उपरोधिक सूर लेखकाचा आहे.

३. विधानमंडळातील कामकाजाची सद्यस्थिती आणि गोंधळावर टीका करत, ही कृती एक प्रकारचा "सविनय कायदेभंग" म्हणून दाखवली आहे.

४. गेल्या काही वर्षांत कृषिमंत्री हे पदच चर्चेचा विषय बनले असून, त्याला ग्लॅमरही मिळाले आहे.

५. लेखकाने कोकाटे यांना 'मनोरंजन मंत्री' करण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे.

Maharashtra Politics Issue: भारतीय शेती हा (मॉन्सूनवरचा) जुगार आहे, असे निरीक्षण ब्रिटिश कर्मचारी सर गाय फ्लीटवुड विल्सन यांनी १९०९ मध्ये नोंदवले होते. त्यापासून शब्दशः प्रेरणा घेऊन राज्याच्या शेती खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे चक्क विधानपरिषदेच्या सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असली तरी कृषिमंत्र्यांच्या या कृतीमागचा हेतू सहानुभूतिपूर्वक समजून घेतला पाहिजे.

राज्यातले शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांशी झुंज देताना मेटाकुटीला आले आहेत. बोगस बियाणे, खतांचा तुटवडा, लिंकिंग, दुबार पेरणीचे संकट, वातावरणातील बदलामुळे शेतीची होत असलेली वाताहत, जमिनीची ढासळलेली सुपीकता, सिंचनाची बोंब, सरकारच्या धोरणांमुळे शेतीमालाचे पडलेले भाव, पीक विम्याचे फाटके संरक्षक कवच, घटलेले उत्पन्न, थकलेले कर्ज अशा दहा तोंडाच्या राक्षसाने शेतीभोवती घट्ट फास आवळला आहे.

Agriculture Minister Manikrao Kokate
Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

अशा स्थितीत सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, ही उद्विग्नता मनात दाटून आल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आता जुगार तरी खेळून बघू, असा विचार कृषिमंत्र्यांनी केला असावा. ही खरे तर सरकारच्या नामुष्कीची कबुली ठरते. यातला दुसरा मुद्दा म्हणजे आजघडीला ऑनलाइन जुगार, गेमिंगच्या विळख्यात ग्रामीण महाराष्ट्र पुरता अडकलेला आहे. यात अनेक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रश्नाची धग कळावी, यासाठी ‘याची देही याचि डोळा’ त्याची अनुभूती घ्यावी म्हणून कृषिमंत्री प्रत्यक्ष ऑनलाइन जुगार खेळून बघत असावेत. विषाचा कडू घोट गिळणाऱ्या भोळासांब निलकंठ महादेवाशीच या कृतीची तुलना करता येईल.

आजमितीला विधिमंडळातील कामकाजाचा दर्जा कमालीचा घसरलेला आहे. ‘महाप्रतापी’ आमदारांमुळे सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. सांसदीय आयुधांचा परिणामकारक वापर करून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याची, राज्याच्या वाटचालीला दिशा देणारे कायदे करण्याची जबाबदारी विसरून ‘नेसूचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्या’ गुंड-पुंड धटिंगणांचा आखाडा असे स्वरूप विधिमंडळाला प्राप्त झाले आहे.

काही सन्माननीय अपवाद वगळता मंत्री, आमदारांना गंभीर चर्चा करण्यात स्वारस्य उरलेले नसून एकमेकांचे हिशोब चुकते करण्याच्या कुरघोडीच्या राजकारणाला तिथे उत आला आहे. ‘आवारा संसद’ची प्रचिती पदोपदी येत असताना राज्यातील चौदा कोटी जनतेला न्याय देण्यात लोकशाहीचा हा प्रमुख स्तंभ कुचकामी ठरतोय, या जनभावनेला वाट देण्याचे काम कृषिमंत्र्यांनी केले आहे. इथल्या रटाळ आणि नीरस चर्चेतून काय निष्पन्न होणार, असा भ्रमनिरास झाल्यामुळे ते मोबाईलमध्ये डोके खुपसून जुगार खेळत एक प्रकारे निषेध नोंदवत होते.

कायदेमंडळात बसून केलेली ‘सविनय कायदेभंगा’ची कृती म्हणून त्याकडे पाहावयास हवे. अगदी मोजके अपवाद वगळता पावसाळी अधिवेशनाकडे कृषिमंत्र्यांनी पाठच फिरवली होती. इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा मंत्रालयात बैठका घेण्यात, दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यात त्यांनी वेळ सत्कारणी लावला. खरे तर परदेश दौरा करण्याचा घाट त्यांनी घातला होता म्हणे. परंतु काही कारणांनी त्यांचे विमान जमिनीवरच राहिले. अन्यथा अधिवेशन (आणि शेतकऱ्यांना) वाऱ्यावर सोडून कृषिमंत्री परदेश दौऱ्यावर रवाना अशा बातम्या झळकल्या असत्या.

Agriculture Minister Manikrao Kokate
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे आणि वाद; ओसाड गावच्या पाटीलकीपासून रमीपर्यंत

यापैकी नेमक्या कोणत्या कारणांसाठी आपण जुगार खेळत होतो, हे कृषिमंत्र्यांनी गुणरत्न सदावर्तेंच्या भाषेत ‘डंके की चोट पर’ जाहीर करून टाकायला हवे. उगाच जाहिरात स्कीप करत होतो, अशी लंगडी सबब सांगून ताकाला जाऊन भांडे लपवण्यात हशील नाही. वास्तविक कृषिमंत्र्यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिराच्या प्रतिष्ठेला डाग लागेल अशी कृती करणे टाळले. त्यांनी सभागृहाला जुगाराचा अड्डा बनवून पत्ते पिसले नाहीत याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत.

ते बिचारे इतरांना यत्किंचितही त्रास होता कामा नये, याची खबरदारी घेत एकटेच स्वान्तसुखाय दिल बहेलाने के लिये मोबाईलवर जुगार खेळत बसले होते. काही काळापूर्वी कर्नाटकच्या विधिमंडळात तीन मंत्री मोबाईलवर अश्लील पोर्न व्हिडिओ बघताना सापडले होते. माणिकरावांनी तशी मौक्तिके उधळली नाहीत, किंवा किमान ती उधळताना कॅमेऱ्यात कैद झाले नाहीत, ही गनिमत म्हणावी लागेल.

एरवी कुणाच्या खिजगणतीत नसणारे राज्याचे कृषिमंत्री पद गेल्या काही वर्षांपासून भलतेच फॉर्मात आले आहे. धनंजय मुंडे यांनी या बदलाची मुहूर्तमेढ रोवली आणि माणिकरावांनी त्यावर कळस चढवला. त्यांनी नित्यनेमाने दर चार-दोन आठवड्यांनी चर्चेचा धुरळा उडवून देत या पदाला ग्लॅमर मिळवून दिले. विशेष म्हणजे याच अधिवेशनात ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती सेलिब्रिटी मंडळी करतात, यावर जोरदार चर्चा झाली.

सरकारने तातडीने या सेलिब्रिटी मंडळीवर बंदी घालून जंगली रमी व तत्सम प्रकारांसाठी विद्यमान ग्लॅमरस कृषिमंत्र्यांची ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्याचा जीआर सत्वर काढावा. ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या ग्रामीण महाराष्ट्राला त्यातून थेट संदेश जाईल. बाकी पंतप्रधान नरेंद्र मोदी पेटीएमच्या जाहिरातीत झळकले होतेच की; मग माणिकरावांनी काय घोडे मारले आहे?

वास्तविक कृषी खात्याच्या ‘ओसाड गावच्या पाटिलकी’त माणिकरावांचे मन रमेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांना या खात्यात अजिबात रस उरलेला नाही. असंवेदनशील आणि बेजबाबदार कृषिमंत्र्यांच्या बुडावर लाथ मारून त्यांना हाकलून लावावे, अशी आक्रस्ताळी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. वास्तविक भावना कितीही तीव्र असल्या तरी शेट्टींसारख्या ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्याने भाषेचे पथ्य पाळले पाहिजे. वैचारिक अधिष्ठान असलेल्या चळवळीतून आलेल्या व्यक्तीला हे शोभा देणारे नाही.

सरकारने असा आततायीपणा करू नये. तर कृषिमंत्र्यांना सन्मानाने मंत्रिमंडळातून नारळ द्यावा. राजकीय अपरिहार्यतेपोटी ते शक्य नसेल तर किमान त्यांच्याकडून कृषी खात्याची जबाबदारी काढून घ्यावी व त्यांच्यासाठी एक नवीन खाते निर्माण करावे. राज्याचे पहिले मनोरंजन मंत्री म्हणून त्यांच्या बळकट खांद्यावर धुरा सोपवावी. त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील तमाम आम जनतेला बाकी काही नाही, पण चार घटका करमणुकीची तरी हमी मिळेल!

(लेखक ‘ॲग्रोवन’चे निवासी संपादक आहेत.)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. कृषिमंत्री कोकाटे ऑनलाइन रमी खेळताना का सापडले?
ते सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन गेमिंग करताना कैद झाले, यामुळे वादंग निर्माण झाला.

२. लेखकाने या घटनेवर कोणती भूमिका घेतली आहे?
उपरोधिक पद्धतीने सहानुभूती दाखवून ही कृती एक सामाजिक निरीक्षण असल्याचे भासवले आहे.

३. शेतकरी संकटाशी या घटनेचा काय संबंध आहे?
लेखात म्हटले आहे की मंत्री शेतकऱ्यांच्या वेदना अनुभवण्यासाठी ऑनलाइन जुगार खेळत होते, ही उपरोधपूर्ण मांडणी आहे.

४. कृषी खात्याचा दर्जा खरोखरच घसरलेला आहे का?
लेखकाने सध्याचे मंत्री आणि अधिवेशनातील चर्चेचा दर्जा लक्षात घेता खात्याच्या अधोगतीवर भाष्य केले आहे.

५. लेखकाने काय सूचवले आहे सरकारला?
कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून त्यांना "मनोरंजन मंत्री" बनवावे, असा विनोदी पण मार्मिक सल्ला दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com