Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे आणि वाद; ओसाड गावच्या पाटीलकीपासून रमीपर्यंत

Agriculture Minister: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा कृषिमंत्री चर्चेत आले. कोकाटे कृषिमंत्री झाल्यापासूनच आपल्या विधानांनी चर्चेत राहीले आहेत.
Kokate Controversy
Kokate ControversyAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

१) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ विधान परिषदेतून व्हायरल.

२) “ओसाड गावची पाटीलकी” आणि “ढेकळांचे पंचनामे” अशा वादग्रस्त विधानांनी सातत्याने चर्चेत.

३) कर्जमाफीच्या पैशांचा गैरवापर होतो, असं विधान करून शेतकऱ्यांबाबत अविश्वास दाखवला.

४) अवकाळी पावसानंतरही शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांना महत्त्व न दिल्याचा आरोप.

५) शेतकरी संकटात असताना मंत्र्यांच्या वागणुकीवर गंभीर टीका; कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह.

Pune News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा कृषिमंत्री चर्चेत आले. कोकाटे कृषिमंत्री झाल्यापासूनच आपल्या विधानांनी चर्चेत राहीले आहेत. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, पीकच नाही तर ढेकळाचे पंचनामे करायचे का? शेतकरी सरकारने दिलेल्या पैशातून लग्न-साखरपुढे करत फिरतात, अशी विधाने करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. आता त्यांच्या रमी प्रकरणाने वाद पेटला आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी शेतीचा जुगार खेळतात आणि कृषिमंत्री विधान परिषदेत जुगार खेळतात, अशी टिका शेतकऱ्यांनी केली आहे. 

मे महिन्यात सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री कोकाटे यांनी भेट दिली. यावेळी एका शेतकऱ्याने पंचनाम्यांबाबत प्रश्न विचारला असता, कोकाटे यांनी त्याला उलट प्रश्न केला, "काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचं? ढेकळांचे पंचनामे करायचे का?" एवढंच नाही, तर त्यांनी पुढे असंही म्हटलं की, "शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे केले जातील, पण घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे नियमात बसत नाहीत." या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली, कारण त्यांना त्यांच्या नुकसानीबाबत योग्य उत्तर मिळाले नव्हते.

Kokate Controversy
Manikrao Kokate Controversy : शेतकरी पुत्र आहात, जबाबदारीने बोला

कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी

मे महिन्यातच छत्रपती संभाजीनगर येथे प्रगतिशील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी एक अजब विधान केलं. ते म्हणाले, "कृषिमंत्रिपद म्हणजे तशी ओसाड गावची पाटीलकी. अजित पवारांनी मला हे मंत्रिपद दिलं. पण, यातही चांगलं काम करता येईल. महाराष्ट्राचं कृषिक्षेत्र आधीच अव्वल आहे, आणि पुढेही चांगलं काम करायचं आहे." या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण कृषिमंत्रिपदाला त्यांनी कमी लेखल्यासारखं वाटलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याऐवजी असं वक्तव्य करणं अनेकांना खटकलं.

Kokate Controversy
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री राजीनामा द्या!

कर्जमाफीच्या पैशांचं शेतकरी काय करतात?

एप्रिल महिन्यात नाशिकमधील माडसांगवी येथे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कोकाटे गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर कोकाटे यांनी शेतकऱ्यांवरच उलट प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, "कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे मिळतात, त्याचं तुम्ही काय करता? शेतीत एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? सरकार शेतीसाठी, सिंचनासाठी, पाईपलाईनसाठी, शेततळ्यासाठी पैसे देतं. पण, शेतकरी काय करतात? ५-१० वर्ष कर्ज भरत नाहीत आणि मग विम्याचे पैसे हवेत, ह्याचे-त्याचे पैसे हवेत, साखरपुडे करा, लग्न करा." या वक्तव्याने शेतकऱ्यांचा रोष ओढवला, कारण त्यांच्या अडचणींना हलक्यात घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.

सभागृहात रमी खेळण्याचा प्रकार

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. या महत्त्वाच्या वेळी, जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चिले जात होते, तेव्हा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला. सभागृहात गंभीर चर्चा सुरू असताना त्यांचं लक्ष खेळण्यात गुंतलं होतं. या कृत्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी जुगारसदृश्य खेळ खेळणं हे अनेकांना अस्वीकार्य वाटलं.

शेतकऱ्यांचं दुखणं आणि मंत्र्यांचं वर्तन

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अवकाळी पाऊस, दुष्काळ, आणि कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक संकटांचा सामना करत परिस्थितीशी जुगार खेळावा लागत आहे.त्यात शेतकऱ्यांची जबाबदारी असणारे कृषिमंत्री हे जुगार खेळण्यात गुंग असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या कृषिमंत्र्यांनीच अशी वक्तव्य आणि कृत्य केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कृत्यांमुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम त्यांच्या या वक्तव्यांनी आणि कृत्यांनी केलं आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न...

१) कृषिमंत्री कोकाटे यांचा रमी व्हिडिओ कधी समोर आला?
विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या वेळी, जुलै 2025 मध्ये.

२) “ओसाड गावची पाटीलकी” या विधानाचा अर्थ काय?
कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाला महत्त्व न देत तिरकस भाष्य केलं.

३) शेतकऱ्यांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान कोणती केली?
“शेतकरी सरकारच्या पैशातून लग्न करतात” असे विधान केल्याने टीका झाली.

४) शेतकऱ्यांचा संताप का झाला?
त्यांच्या समस्यांवर उत्तर न देता हलकी विधाने आणि असंवेदनशील वागणूक.

५) या वादामुळे कोणते प्रश्न उपस्थित झाले?
कृषिमंत्र्यांची जबाबदारी, संवेदनशीलता आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com