
Pune News: गव्हाच्या भावात मागील महिनाभरातच ३ टक्क्यांची वाढ झाली. यंदा गव्हाची पेरणी वाढली. मात्र गव्हाला मागणीही चांगली असेल. तसेच सरकारही बफर स्टाॅक करण्यासाठी हमीभावाने गव्हाची खरेदी वाढवेल. आंतरराष्ट्रीय बाजारातही गव्हाला मागणी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही गव्हाला तेजीची हवा मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशात यंदा गव्हाची लागवड वाढली आहे. देशातील गहू लागवड गेल्यावर्षीपेक्षा आणि गेल्या पाच वर्षातील सरासरी लागवडीपेक्षा अधिक आहे. १७ जानेवारीपर्यंत देशात ३२० लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली होती. तसेच यंदा वेळेत लागवड होत असल्याने वाढत्या उष्णतेचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही, अशी शक्यता काही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे देशात यंदा १ हजार १५० लाख टनांवर उत्पादन पोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र गहू पिकाला अनेक भागात बदलते वातावरण, वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. तरीही यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे.
मात्र देशात सलग दोन वर्षे जाणवलेला तुटवडा आणि गेल्या वर्षी कमी झालेले उत्पादन यामुळे सरकारकडे बफऱ स्टाॅक कमी झाला. बाजारातील पाईपालाईनही खाली आहे. देशात गव्हाचा पुरेसा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केवळ यंदा उत्पादन वाढून फायदा नाही. तर किमान दोन वर्षे तर विक्रमी उत्पादन घ्यावे लागेल. तेव्हा कुठे सरकारचा स्टाॅक आणि बाजारातील पुरवठा सुरुळीत होईल. केवळ यंदाच उत्पादन वाढून भागणार नाही. त्यामुळे यंदाही गहू बाजाराला तेजीची हवा मिळेल, असा अंदाज आहे.
दर पुन्हा वाढले
देशात गव्हाचा पुरवठा कमी असल्याने सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असूनही गव्हाच्या भावात मागील महिनाभरात ३ टक्क्यांची वाढ झाली. गव्हाचा भाव देशभरात सरासरी ३२०० ते ३३०० रुपयांवर पोचला. गव्हाची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर भाव कमी होतील. पण चांगल्या मालाचे भाव हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता धुसर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
हमीभाव आणि सरकारची खरेदी
सरकारने यंदा गव्हासाठी २ हजार ४२५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यंदाच्या हंगामात सरकारने ३०० लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. २०२४-२५ च्या हंगामात म्हणजेच गेल्या हंगामात सरकारने ३२० लाख टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. पण प्रत्यक्षात सरकारला २६६ लाख टनांचीच खरेदी करता आली. सध्या सरकारकडे १८२ लाख टन गव्हाचा स्टाॅक आहे. मागील हंगामात याच काळात २०६ लाख टन स्टाॅक होता. म्हणजेच यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल. तसेच बाजारातील पाईपलाईनही रिकामी आहे. म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणीही चांगली राहील. याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो.
रशियातील पिकाला फटका
रशिया जागतिक पातळीवर गहू निर्यातीत आघाडीवर आहे. पण रशियात यंदा गेल्या २३ वर्षातील खराब हवामान आहे. या हवामानाचा रशियातील ३८ टक्के गहू पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे रशियातील उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. असे झाले तर रशियातून निर्यात कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाला मागणी वाढेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.