
फ्यूचर्स किमती ः सप्ताह ५ ते ११ एप्रिल, २०२५
आता बाजारात हळद, हरभरा व गहू यांची आवक वाढती आहे. या सप्ताहात अमेरिकेतील सोयाबीन व कापूस यांचे भाव अनुक्रमे ६.८ व ४.८ टक्क्यांनी वाढले. अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा हा मोठा परिणाम दिसला. भारतातही त्यामुळे सोयाबीनचे भाव ४ टक्क्यांनी व कापसाचे भाव ०.१ टक्क्याने वाढले.
या सप्ताहात हळद, मूग व तूर यांचे भाव घसरले. इतरांचे भाव वाढले. हरभऱ्याच्या भावात लक्षणीय वाढ झाली (५.३ टक्के). कांद्याचे भाव स्थिर होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवर वाढीव कर लादण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची स्थगिती दिली.
त्यामुळे चीन वगळता इतर देशांशी अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटी नव्याने सुरू होतील. त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याचा शेतीमालाच्या बाजारावर निश्चितच परिणाम होईल. सध्या अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध मात्र जोरात पेटलेले आहे. त्यामुळे भारतासह सर्वच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
अमेरिकेने चीनवर लादलेल्या १४५ टक्के आयात शुल्काला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर लागू असणारे ८४ टक्के आयात शुल्क वाढवून ते १२५ टक्के करण्याची घोषणा केलेली आहे. तसेच चीनने अमेरिकेच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्रित प्रतिकार करण्याचे आवाहन युरोपियन संघटनेतील देशांना केलेले आहे. खुद्द अमेरिकेतील शेतकरी ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अडचणीत आलेले आहेत.
अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या व्यापाराचे मूल्य एकूण ५८५ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. परंतु यात अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीपेक्षा चीनमधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण खूप अधिक आहे. अमेरिकेतून चीनमध्ये सर्वाधिक निर्यात सोयाबीनची होते, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
११ एप्रिल २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात पुन्हा ०.४ टक्का वाढून रु. ५३,९८० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव ०.१ टक्क्याने वाढून रु. ५४,५०० वर आले आहेत. जुलै भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात १ टक्क्याने वाढून रु. १,४५७ वर आले होते. या सप्ताहात ते ०.३ टक्का वाढून रु. १,४६१ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.५ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचा हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहे.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात १.१ टक्क्याने घसरून रु. २,२२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्का वाढून रु. २,२४० वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती ३.२ टक्क्यांनी वाढून रु. २,४१८ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,४४५ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव ९.२ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात ७.९ टक्क्यांनी वाढून रु. १४,६१४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्का घसरून १४,५०२ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती ३.४ टक्क्यांनी घसरून रु. १४,५५४ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १४,७५८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्याने अधिक आहेत. सांगली मधील (राजापुरी) स्पॉट भाव रु. १५,६३५ आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात ५.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,८८८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ६,२०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक वाढती आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,७२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. मुगाचा हंगाम आता संपला आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,४४४ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ४ टक्क्यांनी वाढून रु. ४,६२१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,४२८ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ७,०६० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.
कांदा
कांद्याची किंमत (पिंपळगाव) या सप्ताहात या सप्ताहात रु. १,३१० वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ५०० वर आली होती; या सप्ताहात ती रु. ६८८ वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.