सोयाबीनला पावसाचा फटका
1. पावसामुळं सोयाबीन काढणी ठप्प झाल्याची स्थिती आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अनेक भागांत पाऊस पडतोय. मध्य प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं येथील पिकाचं नुकसान वाढलंय. तसचं काढणीवरही परिणाम होतोय. सध्या देशभरात सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार १०० रुपये दर मिळतोय. सध्या नवं सोयाबीन दबावात असलं तरी ओलावा कमी झाल्यानंतर सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
गहू दरातील तेजी कायम
2. देशात सध्या गव्हाला चांगला दर मिळतोय. देशात यंदा गहू उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच निर्यातही वाढली होती. आता सरकारनं गहू आणि गव्हाच्या पदार्थांची निर्यातबंदी केली आहे. मात्र तरीही देशात गव्हाची टंचाई भासतेय. सरकारकडील गव्हाचा साठाही मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्यानं कमी आहे. मागीलवर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारकडे ४ लाख २० हजार टन गव्हाचा साठा होता. तो यंदा २ लाख २७ हजार टनांपर्यंत कमी झालाय. त्यामुळं बाजारात गव्हाला सध्या २ हजार १०० ते २ हजार ५०० रुपये दर मिळतोय. पुढील काही दिवस गव्हाचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
गहू दरातील तेजी कायम
3. मागील आठवडाभरात मक्याचे दर नरमलेले दिसले. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये नवा मका बाजारात आलाय. मात्र सध्या सुरु असलेल्या पावसामुळं मका पिकाचंही नुकसान होतंय. सध्या मक्याला पोल्ट्री उद्योगातूनही कमी मागणी आहे. तसचं सध्या सोयापेंडचे दर कमी झाल्यानं मका, ज्वारी आणि बाजारीचा वापर कमी झालाय. त्याचा परिणाम मका दरावर झालाय. सध्या मक्याला सरासरी १ हजार ९०० ते २ हजार २०० रुपये दर मिळतोय. मक्याचे हे दर काही दिवस टिकून राहतील, असं मका प्रक्रियादारांनी सांगितलं.
गवारचे दर टिकून
4. गवारचे दर मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत. गवारला श्रावण महिन्यात मागणी सुधारली होती. मात्र बाजारातील आवक जेमतेमच राहीली. आताही बाजारात हीच परिस्थिती आहे. त्यामुळं गावरचे दर तेजीत आहेत. सध्या गावरला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी २० क्विंटलपेक्षाही कमी आवक होतेय. त्यामुळं पुढील काही दिवस गावरचे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
अमेरिकेत कापूस दर वाढले
5. भारताबरोबरच सध्या अमेरिकेतही कापसाचा नवा हंगाम (America Cotton Season) सुरु झालाय. मागील महिन्यात अमेरिकेच्या कृषी विभाग (United States Department Of Agriculture) अर्थात युएसडीएनं अमेरिकेतील कापूस उत्पादन (Cotton Production) वाढेल, असा अंदाज जाहीर केला होता. त्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण यंदा अमेरिकेतील कापूस पिकाला दुष्काळ आणि अतिपावसाचा फटका बसतोय. अमेरिकेतील महत्वाचं कापूस उत्पादक राज्य टेक्सास आहे. यंदा येथील कापूस उत्पादनात मोठी घट येईल, असा अंदाज अनेक संस्था आणि जाणकार व्यक्त करत आहेत. टेक्साससोबतच इतरही राज्यांमध्ये पिकाचं नुकसान होतंय. जाणकारांच्या मते युएसडीए ऑक्टोबरच्या अहवालात अमेरिकेतील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करू शकते.
ही शक्यता लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे सुधारलेले दिसतात. मागील आठवड्यात डिसेंबरचे कापसाचे वायदे ८४ ते ८५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते आज ८७.३७ सेंटवर पोचले.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारल्यानं देशातील दरालाही आधार मिळतोय. देशातील बाजारात कापसाची आवक सध्या वाढतेय. दिवाळीनंतर आवकेत मोठी वाढ होईल. या काळात कापसाचे दर टिकून राहण्यास आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामुळं मदत होईल. सध्या देशात कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ते १० हजार रुपये दर मिळतोय. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजाराची स्थिती पाहता यंदा कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.