Wheat Rate : मका, हरभरा, गहू फायदेशीर ठरणार

सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उशिरा लावलेल्या खरिपातील पिकांची काढणी लांबवर पडताना दिसत असली, तरी आता रब्बीची लगबग लवकरच सुरू होईल. पिकांचे नियोजन झाले असले, तरी पेरणी थोडी दूर असून, बाजारातील आढावा घेऊन शेवटच्या क्षणी काही बदल केले जातील. मका (Maize), हरभरा (Chana) आणि गहू (wheat) ही पिके चांगला परतावा देतील, असे दिसतेय. त्याच बरोबर खरिपातील मूग आणि उडीद ही कडधान्य पिकेही चांगला परतावा देतील, असे सध्याच्या स्थितीवरून वाटत आहे.
Wheat Rate
Wheat RateAgrowon

पावसाळा अधिकृतपणे सप्टेंबर अखेर संपत असला, तरी पाऊस (Rain) काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. मागील दोन-तीन वर्षांचा अनुभव विचारात घेतला तर दिवाळीनंतर अगदी डिसेंबरमध्ये पाऊस येणेही आता नवलाचे राहिलेले नाही. अन्नधान्य (Food Grain) पिकवण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर-नोव्हेंबर हे खास महत्त्वाचे महिने असतात. एक तर खरिपाची काढणी आणि त्यानंतर लगेच रब्बी हंगामाची पेरणी (Rabi Sowing) यासाठी अनुकूल वातावरणाची गरज असते. परंतु मागील दोन-तीन वर्षांमध्ये हे वेळापत्रक कोलमडून गेल्याचे दिसत आहे.

खरंतर ग्लोबल वॉर्मिंगमुळे झपाट्याने बदलत चाललेल्या हवामान चक्रामुळे सर्वच ऋतू अलीकडे एखाद महिन्याने तरी पुढे गेलेले दिसत आहेत. म्हणून त्याअनुषंगाने आपली शेती पद्धतींमध्ये देखील बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करणाऱ्या तज्ज्ञांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून शेती क्षेत्र जात असताना आपल्याकडे चांगला पाणीसाठा उपलब्ध असणे ही फार मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच खरिपामधील अनुशेष रब्बीमध्ये भरून काढण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उशिरा लावलेल्या खरिपातील पिकांची काढणी लांबवर पडताना दिसत असली, तरी आता रब्बीची लगबग लवकरच सुरू होईल. पिकांचे नियोजन झाले असले तरी पेरणी थोडी दूर असून, बाजारातील आढावा घेऊन शेवटच्या क्षणी काही बदल केले जातील. मका, हरभरा आणि गहू ही पिके चांगला परतावा देतील, असे दिसतेय. त्याच बरोबर खरिपातील मूग आणि उडीद ही कडधान्य पिकेही चांगला परतावा देतील असे सध्याच्या स्थितीवरून वाटत आहे.

महागाईपासून सुटका नाही

मागील वर्षामध्ये जागतिक पातळीवरील अन्नधान्य टंचाई आणि त्याला जोडून कोविडनिर्मित पुरवठा साखळीमधील बिघाड यांच्या एकत्रित परिणामामुळे जो महागाईचा भडका उडाला त्याचा फायदा उत्पादकांना बऱ्याच प्रमाणात मिळाला. आता पुरवठा साखळी बरीच सुधारली असली तरी अन्नधान्य टंचाई बऱ्याच अंशी तशीच राहणार आहे.

Wheat Rate
Wheat Rate : गव्हाचे दर पुन्हा वाढले

गहू, मका, सोयाबीन व सूर्यफूल यांच्या उत्पादनामध्ये कमी-जास्त परंतु घट निश्‍चित आहे. युक्रेनमधील उत्पादन पूर्ववत व्हायला दोन वर्षे तरी लागतील, असे दिसून येत आहे. अमेरिकन खंडामध्ये आणि यूरोपमध्ये सतत तिसऱ्या वर्षी ला-निनाच्या प्रभावामुळे दुष्काळजन्य स्थिती राहणार असल्यामुळे तेलबिया, कापसाबरोबर, मका आणि गहू यांचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे येत्या वर्षात महागाईमध्ये मोठी कपात होण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत. उलट इंग्लंडने महागाईपासून आराम मिळण्यासाठी २०२४ उजाडेल असे म्हटले आहे.

केवळ भारताच्या दृष्टीने विचार केला तर पाकिस्तान, बांगला देश आणि श्रीलंका या देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती, चलन संकट आणि एकंदर आर्थिक समस्यांमुळे या देशांचे अन्नधान्याबाबत परावलंबित्व कमालीचे वाढणार आहे. यातून भारताला निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉलर समोर रुपयाची झालेली विक्रमी घसरण हा मुद्दाही निर्णायक ठरणार आहे.

Wheat Rate
Chana Cultivation : हरभरा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

चीन काय करतोय हे जगाला कधीच समजत नसले तरी तेथील महागाईदेखील आता प्रमाणाबाहेर वाढली आहे. प्रचंड दुष्काळामुळे तेथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लागणाऱ्या अन्नधान्याचे उत्पादन करण्यासाठी पाणी कसे पुरवायचे असा पेच तेथील राज्यकर्त्यांना पडला आहे. चीन, अमेरिका असो किंवा इतर कुठला देश; तेथील दुष्काळाची दाहकता हंगाम संपण्याच्या अखेरच्या काळात जास्त जाणवते. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने जरी जागतिक बाजारात शेतीमाल बाजारभाव दबावात आले तरी २०२३ मध्ये नव्याने तेजी येणे अशक्य नाही.

Wheat Rate
Soybean Harvesting : सोयाबीन कापणीवर पावसाचं सावट ?

कडधान्यांना मागणी वाढणार?

हरभऱ्याच्या बाबतीत बोलायचे तरच मागील हंगामामध्ये या पिकाने उत्पादकांचीच नव्हे तर स्टॉकिस्ट्स आणि अनेक व्यापाऱ्यांची घोर निराशा केली आहे. प्रत्येक पिकामध्ये हंगामामध्ये छोट्या कालावधीसाठी का होईना एकदा तरी तेजी येते हा अनुभव असला, तरी मागील वर्षी हरभऱ्याच्या बाबतीत हे दिसून आले नाही. एकवेळ पुतीनवर हल्ला करणे सोपे, परंतु हरभऱ्याचा स्टॉक करण्यासाठी मोठे धैर्य लागते, अशा प्रकारच्या मिम्स समाजमाध्यमांमध्ये दिसून आल्या, यातून परिस्थिती लक्षात यावी. परंतु एकदा नाफेडच्या २०२०-२१ मधील स्टॉक विक्रीला लगाम बसला की किमती थोड्या सुधारतील. तर फेब्रुवारीनंतर हरभऱ्याच्या किमती चांगल्या सुधारू लागतील असे वाटते. हरभऱ्याचा स्पर्धक असलेल्या वाटाण्याचे पीक जागतिक पातळीवर बरे असले तरी त्याची मागणी त्याहून वाढणार आहे.

सध्या कोविडनंतर मांस सेवन करणाऱ्या एका वर्गामध्ये वनस्पती आणि अन्नधान्यापासून बनवलेले प्रोटीन-संपन्न पदार्थ सेवन करण्याचे फॅड म्हणा किंवा सवय म्हणा, परंतु वाढीस लागलेली आहे. याला प्लांट-बेस्ड प्रोटीन म्हणतात. चवीला मांसाहारी पदार्थांप्रमाणेच लागणारे, परंतु शाकाहारी अन्न असे याचे स्वरूप आहे. त्यासाठी वाटाणा आणि मुगाला मोठी मागणी असून येत्या वर्षात निदान तीन-चार नवीन कारखाने पाश्चिमात्य देशांमध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे सुमारे १२-१५ लाख टन कडधान्यांना तेथून मागणी येईल, अशा प्रकारच्या बातम्या वाचायला मिळाल्या आहेत. यामुळे जागतिक बाजारात या वस्तूंचे भाव चढेच राहिले तर येथे आयात त्या प्रमाणात महाग पडेल. त्याचा फायदा स्थानिक बाजारातील किमतींना होईल.

मक्यामध्ये मोठी घसरण नाही

मक्याच्या जागतिक उत्पादनात सुमारे ४०० लाख टन एवढी तूट अपेक्षित आहे. परंतु सोयापेंडीच्या किमती घसरल्यामुळे आणि तांदूळ निर्यातीवरील निर्बंधांमुळे मक्याच्या मागणीत स्थानिक बाजारात थोडी घट दिसत आहे. तसेच खरिपाची आवक लवकरच वाढणार असल्यामुळे देखील किंमतीमध्ये थोडी नरमाई दिसत आहे. परंतु मक्याच्या किमतींत सोयाबीनप्रमाणे मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. जागतिक पातळीवर कच्चे तेल महाग झाले तर इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय मक्याला पुन्हा एकदा निर्यातीची संधी उपलब्ध होऊ शकेल.

गहू चढा राहणार

गव्हाच्या किमती पुढील वर्षात देखील चढ्याच राहतील. भारतातील साठ्यांमध्ये विक्रमी घट झाली असून युक्रेन, अमेरिका याबरोबरच चीनमध्ये देखील उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आफ्रिकी देशांमधून वाढती मागणी राहील. त्यामुळे गव्हाला पुढील संपूर्ण वर्ष चांगली मागणी राहील. याचा फायदा देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीना मिळेल. तर मूग आणि उडीद याचा एकूणच पुरवठा मर्यादित असल्यामुळे मोठी तेजी जरी आली नाही तरी त्यात मंदीदेखील राहणार नाही. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे घसरणारा रुपया कुठेतरी उत्पादकांना मदतच करतो.

एकंदरीत अन्नधान्याच्या किमती चढ्याच राहण्याच्या दृष्टीने पुढील वर्ष अनुकूल वाटत असताना जागतिक मंदीचा मोठा धोका सर्वच वस्तूंसाठी निर्माण झाला आहे. त्याची व्याप्ती कशी राहील हे पुढील काळात समजून येईल. परंतु अमेरिकेमध्ये व्याजदरवाढीमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्‍चिमात्य अर्थव्यवस्थांमध्ये मंदीची सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. मंदीमध्ये सुक्याबरोबरच ओलेसुद्धा जळते, याचा विसर पडू देता कामा नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com