Soybean Pest Control: सोयाबीनवर हुमणी आणि पाने खाणाऱ्या अळीचा हल्ला! शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपाय

Humani And Spodoptera Management: राज्याचे महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनवर सध्या पाने खाणारी अळी आणि हुमणीचे आक्रमण वाढले आहे. या दोन्ही अळ्यांमुळे सोयाबीनचे नुकसान वाढत आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण गरजेचे आहे. शेतकरी एकात्मिक पद्धतीने या किडींचे नियंत्रण करु शकतात.
Soybean Pest Control
Soybean Pest ControlAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती

१. सध्या सोयाबीनवर पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) आणि हुमणी अळीचे जोरदार आक्रमण आहे.

२. या अळ्यांमुळे पानं कुरतडली जातात, मुळे खाल्ली जातात आणि उत्पादनात मोठी घट होते.

३. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पारंपरिक, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक उपायांचा समावेश आहे.

४. ट्रायकोकार्ड, जैविक बुरशी (बिव्हेरिया, नोमुरिया), प्रकाश सापळे आणि ट्रॅप पिक वापरून प्रभावी नियंत्रण मिळते.

५. हुमणीवर नियंत्रणासाठी मडकी सापळे, रात्री कडूलिंब, बाभुळचे झाड हलवणे आणि मेटारायझियमसारखी बुरशी उपयुक्त आहे.

Soybean Humani and Pest Control: राज्याचे महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनवर सध्या पाने खाणारी अळी आणि हुमणीचे आक्रमण वाढले आहे. या दोन्ही अळ्यांमुळे सोयाबीनचे नुकसान वाढत आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण गरजेचे आहे. शेतकरी एकात्मिक पद्धतीने या किडींचे नियंत्रण करु शकतात.

पाने खाणारी अळी

पाने खाणारी अळी म्हणजे स्पोडोप्टेरा लिटुरा ही अळी बहुपीकभक्षी आहे. ही सोयाबनसह कपाशी, बटाटा, झेंडू, कोबी, भेंडी, फुलकोबी या पिकांवरही आढळते.

या अळीसाठी कमी ते मध्यम पावसानंतरचा कोरडा काळ, २९-३० डिग्री सेल्सियस तापमान पोषक असते. सोबत रासायनिक कीडनाशकाचा सतत वापर, किडीच्या सुरवातीच्या काळात निरीक्षणाकडे दुर्लक्ष, पिकाची अर्थात खाद्याची उपलब्धता या कारणांमुळे स्पोडोप्टेरा लिटुरा किडीचा उद्रेक होतो. सरासरी १० टक्के पाने प्रादुर्भावग्रस्त असल्यास पीक आर्थिक नुकसानीची पातळी गाठते.

अळीचा जीवनक्रम

या अळीच्या जीवनक्रमात एकूण चार अवस्था असतात. अंडी, अळी, कोष, आणि पतंग. मादी पतंग शेतात मोजक्या झाडांच्या पानाखाली पूंजक्यात २५० ते ३०० अंडी देते. बदामी रंगाच्या किडीचे अंडीपुंज पानांवर असतात. अंड्यातून ३ ते ४ दिवसात अळ्या बाहेर पडतात. या अळ्या सुरुवातीचे ४ ते ५ दिवस समुहाने पाने खातात. नंतर छोटे छोटे गट करुन सर्व शेतात पसरतात. अळ्या मोठ्या झाल्यावर प्रचंड खादाड होतात आणि आधाशीपणे पाने खातात. या अळ्या दिवसा लपून राहतात आणि रात्री पिकावर हल्ला करतात.

अळीच्या उद्रेकाच्या काळात अळ्या एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरतात. पिकाला हानी पोहोचवणाऱ्या या अळ्यांचा काळ हा २० दिवसांपर्यंत असतो. त्यानंतर अळ्या कोषावस्थेत जातात. कोषातून ७-१० दिवसात नर मादी पतंग तयार होतात. साधारणत: ३० ते ५० दिवसांच्या पिकावर मादी पतंग अंडी देते.

Soybean Pest Control
Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

एकात्मिक व्यवस्थापन

पाने खाणाऱ्या अळीवर प्रभावी नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यामध्ये पारंपरिक, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक अशा पद्धतींचा वापर होतो. त्यासाठी कृषी विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी उपाय सूचविले आहेत.

पारंपरिक उपाय

१.पिकाचे नियमित निरीक्षण करावे.

२. आठवड्यातून दोनदा शेतातील जाळीदार पाने शोधून ती अळ्यासहीत रॉकेल मिश्रित पाण्यात (५० मि. ली. प्रती लिटर पाणी) बुडवावीत किंवा जाळावीत. त्यामुळे अळ्या छोट्या आणि पुंजीत असताना मेल्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही.

३.शेतात सापळा पीक म्हणून ५ ते १० एरंडीची झाडे लावावीत. यामुळे कीडग्रस्त जाळीदार मोठी पाने लांबूनच ओळखू येतात. ती अळ्यांसहीत नष्ट करावीत तसेच मुख्य पिकांवरील अशी पाने अळ्यासहीत नष्ट करावी.

यांत्रिक उपाय

पिकामध्ये एकरी ८ याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. पिकापेक्षा २ फुट जास्त उंचीवर पक्षी थांबे लावावेत.

जैविक उपाय

१. पेरणीनंतर साधारणत: २५ ते ३० दिवसांना ट्रायकोकार्ड्स् लावावेत. ट्रायकोकार्ड्स् वर टेलिनोमस रेमस प्रजाती असते. हे मित्रकीटक त्यांची अंडी पाने खाणाऱ्या अळीच्या अंडपुंजीत घालते. यामुळे अंड अवस्थेतच किडीवर आळा घालण्यास मदत होते.

२.एस. एल. एन. पी. व्ही. (मॅजिक) या विशिष्ट विषाणूयुक्त कीडनाशकाची फवारी करावी. हे विषाणू पाने खाणाऱ्या अळ्यांचा शरीरात शिरून त्यांची वाढ खुंटवते आणि कालांतराने ३ ते ४ दिवसांत रोगाची साथ होऊन मरतात. प्रती हेक्टरसाठी १० मि.ली. एस. एल. एन. पी. व्ही. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

३.बिव्हेरिया बॅसियाना- ही बुरशी पाने खाणाऱ्या अळ्यांना रोगग्रस्त करते. फुले बिव्हेरिया हे जैविक बुरशीजन्य कीडनाशक २.५ ते ३ कि.ग्रॅ. प्रती हेक्टर दिलेल्या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारावे.

४. नोमुरिया रिलेई- ही बुरशीसुद्धा स्पोडोप्टरा अळीसाठी घातक आहे. या बुरशीमुळे अळ्यांमध्ये साथीचा रोग निर्माण होऊन अळ्या हिरवट राखाडी होऊन मरतात. फुले नोमुरीया या कीडनाशकाचा २.५ ते ३ कि. ग्रॅ. प्रती हेक्टर पाण्यात मिसळून फवारावे. मेलेल्या अळ्यांचे अवशेष पानावर व जमिनीवर आढळतात.

Soybean Pest Control
Soybean Pest Management: सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळीवर तातडीने आळा घाला; बंदोबस्तासाठी सोपे उपाय!

रासायनिक उपाय

पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास तात्काळ एन्डोक्झार्काब १५.८% ईसी ६.६ मि.लि. किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५० टक्के ईसी ३ मि.लि. १० किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.९० टक्के ईसी हे कीडनाशक ९ मि.लि. आणि फ्लुबेंडियामाईड २०टक्के डब्ल्यू जी ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

हुमणी अळी

हुमणी ही सुद्धा बहुभक्षीय कीड आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. अंडी, अळी, कोष आणि भुंगेरे अशा चार अवस्थांमध्ये ती आढळते. त्यामुळे या अळीच्या नियंत्रणासाठी अंडी, अळी आणि भुंगेरे या तिनही अवस्थांमध्ये सक्रियपणे नियंत्रण करावे लागते.

यातील भुंगेरे हे कडूलिंब, बाभुळ या झाडांवर सायंकाळी बसतात. त्या झाडांची पाने खातात आणि मिलनानंतर काही काळाने मादी भुंगेरे अंडी देतात. अंड्यामधून अळ्या बाहेर आल्यावर या अळ्या सुरुवातीला अपूर्ण कुजलेले शेणखत तर मोठ्या झाल्यावर झाडाची मुळे खातात. यामुळे पिकाला पोषण मिळत नाही आणि रोपे वाळतात, त्यांची वाढ खुंटते आणि पिक मरते.

हुमणीचे नियंत्रण

सोयाबीन पिकावरील हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी काही सोप्या पद्धती वापरता येतात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी सुचविलेले उपाय खालीलप्रमाणे,

पारंपरिक उपाय

१. रात्रीच्या वेळी मोठ्या काठीने झाडे हलवून हे भुंगेरे खाली पाडावेत आणि त्यांना गोळा करून रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकून नष्ट करावे.

२. एरंडी बियांचा सापळाही यामध्ये फायदेशीर ठरतो. यासाठी एक किलो एरंडी बिया, ५० ग्रॅम यीस्ट पावडर, ५० ग्रॅम बेसन आणि अर्धा लिटर ताक हे सर्व २ लिटर पाण्यात मिसळून २-३ दिवस आंबवून ठेवावे. हे मिश्रण मातीच्या मडक्यांमध्ये ओतून एकरी पाच मडकी जमिनीत पुरावीत.

३. आंतरमशागतीतही किडीवर नियंत्रण मिळवता येते. जमिनीची कोळपणी करताना बाहेर आलेल्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. पीक तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. सुकलेली झाडे उपटून त्यांच्या मुळाजवळील अळ्याही नष्ट कराव्यात.

यांत्रिक उपाय

भुंगेरेंच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचाही वापर करता येतो. ५ ते १० सापळे एका हेक्टरसाठी पुरेसे असतात. सापळ्यात पकडलेले भुंगेरे गोळा करून मारून टाकावेत.

जैविक उपाय

जैविक नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली नावाची बुरशी उपयोगी ठरते. ही बुरशी ५० ग्रॅम प्रमाणात १० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाजवळ आळवणी करावी. तसेच, हेटरोऱ्हॅबडीटीस इंडिका नावाच्या जंतूंवर आधारित द्राव्याचा वापर करता येतो. २.५ लिटर द्राव्य ५०० लिटर पाण्यात मिसळून हे मुळाजवळ टाकावे.

रासायनिक उपाय

सध्या सोयाबीन पिकावर कोणतेही रासायनिक कीटकनाशक अधिकृतरीत्या शिफारस केलेले नाही. त्यामुळे जैविक व यांत्रिक उपायांवर भर देणे योग्य ठरेल.

वारंवार विचारलेले प्रश्न (FAQs):

१. पाने खाणारी अळी कधी पिकावर आक्रमण करते?
पेरणीनंतर २० ते ३० दिवसात अळीचा प्रादुर्भाव दिसतो, विशेषतः कोरड्या हवामानात.

२. हुमणी अळी झाडाचे काय नुकसान करते?
हुमणी अळी झाडांची मुळे खाते, त्यामुळे रोप वाळते आणि उत्पादन घटते.

३. ट्रायकोकार्ड्स कसे काम करते?
ट्रायकोकार्ड्सवरील मित्रकीटक अळीच्या अंड्यात अंडी घालून वाढ थांबवतात.

४. जैविक कीडनाशके कोणती वापरावी?
बिव्हेरिया बॅसियाना, नोमुरिया रिलेई, आणि एस.एल.एन.पी.व्ही. यांचा उपयोग करावा.

५. हुमणी नियंत्रणासाठी कोणता घरगुती सापळा फायदेशीर आहे?
एरंडी बी, बेसन, यीस्ट आणि ताक यांचे आंबवलेले मिश्रण मडक्यांत ठेवून वापरावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com