
१. झेंडूच्या लागवडीसाठी हलकी, मध्यम आणि निचरा होणारी जमीन निवडावी.
२. योग्य खत व पाणी व्यवस्थापनसह शेंडा खुडणे, आंतरमशागत आणि आच्छादन केल्यास अधिक फुलोत्पादन मिळते.
३. शेवंतीला योग्य प्रमाणात खत व दमट हवामानात रोग नियंत्रण गरजेचे.
४. निशिगंध बहुवर्षीय पीक असून योग्य कंद निवडणे, वेळेवर फवारणी आणि निचरा व्यवस्था महत्त्वाची.
५. सर्व पिकांवर मर, करपा व किडींचा धोका असल्याने योग्य औषध फवारणी वेळेवर करणे आवश्यक.
Flower Farming: राज्यात सणसमारंभांसाठी फुलांची चांगली मागणी असते. दिवाळी-दसरा या सणांच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी विविध फुलांची लागवड केली आहे. पण सध्या बदलत्या वातावरणामुळे बऱ्याच पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे या काळात फुलशेतीचे व्यवस्थापन कसे करावे ते याची सविस्तर माहिती घेऊया.
झेंडू
राज्यात झेंडू फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते. या पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात करता येते. हे पीक विविध प्रकारच्या जमिनींमध्ये येत असले तरी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हलकी ते मध्यम जमीन या पिकास पोषक आहे. सकस, भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली असली तरी उत्पादन कमी मिळते.
लागवड
लागवडीसाठी साधारणत: १५ ते २० सेंमी इतके उंचीचे चांगल्या प्रतीची रोपे निवडावीत. जमीन नांगरून कुळवून तयार करावी. जमीन तयार करण्यासाठी प्रती हेक्टरी ४० टन शेणखत मिसळावे. लागवड शक्यतो सायंकाळी ६० सेंमी बाय ३० सेंमी या अंतराने करावी. लागवडीपूर्वी रोपांचीमुळे ३० मिनिटे कॅप्टन ०.२ टक्के प्रमाणातील द्रावणात बुडवून लागवड करावी. झेंडूची लागवड गादी वाफ्यावर करावी; त्यासाठी सोयीनुसार लांब गादी वाफे तयार करावेत. दोन गाद्यांमध्ये ४० ते ४५ सेंमी अंतर ठेवावे.
खत व्यवस्थापन
लागवडीच्या वेळी हेक्टरी ४० टन शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी १०० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश खते द्यावी. अर्धे नत्र आणि पूर्ण स्फुरद आणि पालाश हे पुनर्पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पुनर्पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावे.
शेंडा खुडणे
रोपाचा शेंडा खुडल्याने उंच सरळ वाढण्याऱ्या रोपाची वाढ खुंटते आणि जास्त फांद्या फुटायला लागतात. त्यामुळे रोपाला झुडुपाचे स्वरुप यायला लागते.
आंतरमशागत
रोप लागवडीनंतर दोन आठवड्यांनी खुरपणी करावी. शिवाय खुरपणी करताना, रोपाला भर द्यावी जेणेकरुन रोपे फुलांच्या ओझ्याने कोलमडत नाही. सोबत उगवलेले तण ताबडतोब नष्ट करावे.
आच्छादनांचा वापर
शेतातील मातीची धुप होऊ नये म्हणून, जमिनीतील ओलावा टिकावा म्हणून आच्छादनांचा वापर करावा. यामध्ये प्लास्टिक आच्छादनाचा वापर प्रामुख्याने करावा.
पाणी व्यवस्थापन
खरीप हंगामात पाऊस नसेल तर १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तर रब्बी हंगामात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे आणि उन्हाळी हंगामात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे.
फुलांची काढणी लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांत फुले काढणीस तयार होतात. शक्यतो फुलांची काढणी संध्याकाळच्या वेळात करावी. पूर्ण उमललेल्या फुलांची देठाजवळ तोडून काढणी करावी. काढलेली फुले थंड जागेत सुकवावी. स्थानिक बाजारपेठेसाठी बांबुच्या करंड्या किंवा पोत्यात भरुन फुले पाठवावीत.
पीक संरक्षण
कीड नियंत्रण- झेंडूवर पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे औषधांची फवारणी करणे गरजेचे असते. प्रादुर्भाव दिसताच अॅसिफेट एक ग्रॅम किंवा डायमेथोएट एक मि.ली. प्रतिलिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. याखेरीज झेंडूवर उष्ण आणि दमट हवामानात करपा रोग, मर रोग येतात. मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे. ज्यामुळे पाने पिवळी पडतात, मुळे कुजतात, परिणामी झाड वाळून जाते. आफ्रिकन जातीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. यासाठी सुरवातीला योग्य जमिनीची निवड करणे आवश्यक आहे. निचरा होणारी जमीन निवडावी शिवाय दरवर्षी पिकाची फेरपालट करावी.
करपा हासुद्धा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग झाडाच्या खालच्या पानांपासून सुरु होतो आणि वरती सरकतो. या रोगामुळे पानावर काळे ठिपके दिसतात, ते पुढे विस्तारतात. त्यामुळे पानगळ होतो आणि शेवटी झाड मरते. याच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसताच रोगट पाने जाळून टाकावीत. नियंत्रणासाठी मँकोझेब ०.२ टक्के किंवा कार्बेन्डाझिम ०.१ टक्के यांची आलटून पालटून १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेळी फवारण्या गरजेनुसार कराव्यात.
शेवंती
फुलांची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली शेवंती जागतिक उलाढालीत गुलाबानंतर येते. महाराष्ट्रात सुमारे ४०० ते ५०० हेक्टर क्षेत्र शेवंतीच्या लागवडीखाली आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यांत शेवंतीची सर्वाधिक लागवड होते. सध्या राज्यात अनेक ठिकाणी शेवंतीची लागवड झाली आहे. शेवंतीची आंतरमशागत, पीकाचं संरक्षण, काढणी याच्या सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धती पाहूयात.
लागवड
शेवंतीच्या लागवडीसाठी मध्यम हलकी आणि चांगली निचरा होणारी जमीन हवी. लागवडीसाठी जमीन आधी उभी आडवी नांगरुन घ्यावी. लागवडीयोग्य जमीन तयार करण्यासाठी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवड ही सरीच्या दोन्ही बाजूस ३० सें.मी. अंतरावर बगलेत करावी. लागवड शक्यतो दुपारचे ऊन कमी झाल्यावर करावी म्हणजे मर कमी होते.
खते
शेवंतीसाठी हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्यावेळी १५०:२००:२०० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे. तर लागवडीनंतर १ ते दीड महिन्याने १५० किलो नत्र हेक्टरी याप्रमाणात द्यावे.
पाणी व्यवस्थापन
लागवडीपासून पाऊस सुरु होईपर्यंत पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुले येण्याच्या काळात रोपावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळी हंगामात १२ ते १५ दिवसांनी जमिनीच्या गरजेनुसार पाणी द्यावे. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास जादा पाणी खोडाच्या तळाशी सरीत साठून राहते आणि त्यामुळे मूळकुज होतो. म्हणून पावसाळ्यातही पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल अशी व्यवस्था करावी.
आच्छादनांचा वापर
शेतातील मातीची धुप होऊ नये म्हणून, जमिनीतील ओलावा टिकावा म्हणून आच्छादनांचा वापर करावा. यामध्ये प्लास्टिक आच्छादनाचा वापर प्रामुख्याने करावा.
शेंडा खुडणे
शेवंतीच्या रोपाचा शेंडा खुडल्याने उंच सरळ वाढण्याऱ्या रोपाची वाढ खुंटते आणि जास्त फांद्या फुटायला लागतात. त्यामुळे रोपाला झुडुपाचे स्वरुप यायला लागते.
रोग नियंत्रण
शेवंतीवर मर आणि पानावरील ठिपके हे रोग प्रामुख्याने आढळतात. मर रोग हा केव्हाही होऊ शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडांची खोडे तपकिरी होऊन पाने पिवळी पडून निस्तेज आणि मऊ पडतात. तर काही दिवसांत झाड मरते. मर रोगाच्या नियंत्रणासाठी झाडाच्या मुळाशी मँकोझेब ०.२ टक्के प्रमाणात किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड ०.३ टक्के प्रमाणात द्रावण मिसळावे.
शेवंतीच्या पानांवरील ठिपके हा रोग पावसाळी दमट हवामानात आढळतो. या रोगाचा परिणाम जमिनीलगतच्या पानांवर होतो. पानांवर काळपट तपकिरी गोलाकार ठिपके पडतात. ते हळूहळू मोठे होतात आणि परिणामी संपूर्ण पान करपते. हा रोग बुंध्याकडून शेंड्याकडे पसरतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब ०.२ टक्के किंवा कार्बेन्डॅझीम ०.१ टक्के, क्लोरोथॅलोनील ०.२ टक्के हे आलटून पालटून बुरशीनाशक वापरावे.
शेवंतीवरील किडे
मावा आणि फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. पानाच्या खालच्या बाजूने जाळ्या तयार करुन पाने गुंडाळणारी कोळी कीडही आढळते. या किडी पाने आणि फुलांचे मोठे नुकसान करतात, त्यामुळे फुलांची गुणवत्ता बिघडते. यासाठी पाण्यात विरघळणारे गंधक तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यासोबत अंगावर केस असणाऱ्या अस्वल अळीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. क्विनॉलफॉस दोन मिली प्रतिलिटर प्रमाणात फवारल्यास या किडीचे नियंत्रण होते.
काढणी
शेवंतीच्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी. फुले शक्यतो सूर्योदयापूर्वी काढावीत. उमललेली फुले उशिरा काढल्यास रंग फिका पडतो आणि वजनही कमी भरते. लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांनी या फुलांचा काढणी करायला सुरु करावे, त्यानंतर एक महिना ही काढणी चालू असते. फुलांचे पॅकिंग बांबूच्या करंड्या किंवा पोत्यांत केले जाते. लांबच्या बाजारपेठेसाठी बांबूच्या करंड्यांचा तर जवळच्या बाजारपेठेसाठी पोत्यांचा उपयोग पॅकिंगसाठी करावा.
निशिगंध
निशिगंधाची फुले ही सुवासिक आणि आकर्षक असतात. वर्षभर या फुलांना भरपूर मागणी असते त्यामुळे बाजारभावही चांगला मिळतो.
लागवड
या पिकाची लागवड करताना निचरा होणारी जमीन निवडावी. हरळी किंवा लव्हाळ्यासारखी बहुवर्षीय तणे असलेली जमीन टाळावी. निशिगंधाचे पीक बहुवर्षीय आहे. एकदा लागवड केल्यास जमिनीत हे पीक तीन वर्षे ठेवता येते. या फुलाच्या लागवडीसाठी कंदाचा वापर केला जातो. त्यासाठी मागील वर्षाच्या पिकातून निघालेले दर्जेदार कंद वापरावेत. निवडलेले कंद लागवडीपूर्वी कॅप्टन ०.३ टक्के द्रावणात १५ ते २० मिनिटे ठेवावेत.
खत व्यवस्थापन
मशागतीच्या वेळी हेक्टरी ३० टन शेणखत किंवा कंपोस्ट खते मिसळावे. माती परीक्षणानुसार २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्र हे लागवडीच्या वेळी ५० किलो आणि लागवडीनंतर ३०-६०-९० दिवसांनी राहिलेले नत्र समान प्रमाणात द्यावे.
पाणी व्यवस्थापन
पीकाच्या वाढीसाठी पाण्याचा ताण पडू नये याची काळजी घ्यावी, ताबडतोब पाणी द्यावे.
रोग नियंत्रण
करपा रोगाची सुरवात पानांवर ठिपके पडून होते. तपकिरी रंगाचे ठिपके कालांतराने मोठे होऊन संपूर्ण पान करपते. पान टोकाकडून बुंध्याकडे करपत जाते. नियंत्रण मँकोझेब ०.२५ टक्के किंवा क्लोरोथॅलोनील ०.२० टक्के या पैकी एका बुरशीनाशकाची दर १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून २ ते ३ वेळा फवारणी करावी.
खोडकूज हा बुरशीजन्य रोग आहे. नावाप्रमाणे हा खोडापासून सुरु होतो. सुरवातीला झाडाच्या खालील पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. नंतर हे ठिपके पडून पाने गळतात. यामुळे फुलांच्या उत्पादनावरही परिणाम होतो. यासाठी वाफ्यात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगट पाने तसेच झाडे गोळा करुन जाळून नष्ट करावी. प्रादुर्भाव दिसताच कॅप्टन ०.२५ टक्के या बुरशीनाशकाची फवारणी करावी. प्रादुर्भाव झालेल्या रोपांना बुंध्याजवळ बुरशीनाशक फवारावे. ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर लागवड करताना केल्यास फायदेशीर ठरते.
काढणी
लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांत फुले येतात. फुलदांडे व सुटी फुले यासाठी लागवड केली जाते. दांडीसाठी खालची २-३ फुले उमलल्यावर दांडे कापावेत. एक डझन दांड्यांचे जुडे बांधून वर्तमानपत्रात गुंडाळून कागदी खोक्यात भरावेत. सुट्या फुलांसाठी पूर्ण कळ्या किंवा उमललेली फुले सकाळी ५-८ वा. किंवा सायंकाळी ६-७ वाजता काढावीत. सुटी फुलांना जास्त मागणी असल्याने फुले ५ ते ७ किलो क्षमतेच्या करंडी/खोक्यात भरून बाजारात पाठवावीत.
फुलांची साठवण
फुले ही नाशवंत असतात तरी त्यांची योग्य प्रकारे साठवण केल्यास फुले ७ ते ८ दिवस चांगल्या स्वरुपात राहतात. ही साठवण काळजीपूर्वक करावी. फुलाच्या प्रकारानुसारही त्याची साठवण पद्धतीत बदल आढळतात.
१. फुलांची काढणी ही शक्यतो संध्याकाळच्या वेळात उन्हं गेल्यावर करावी. पहाटेच्या वेळात केली तर फुलांवर दव साचलेले असते. दवाचे अंश राहिल्याने फुले लवकर खराब होतात.
२. फुलांची काढणी झाल्यावर लगेच पोत्यात भरुन न ठेवता, २ ते ४ तास त्यांना शेडमध्ये सुकवावे त्यानंतर ते पोत्यात भरावे.
३. फुले सुकवताना आणि पोत्यात भरताना त्यांना निवडून घ्यावे. किडकी फुले वेगळी करावी तसेच अळ्या आणि कीड काही असल्यास लगेच काढून टाकावे.
४. काढणी सणासुदीच्या ४-५ दिवस आधी झाली असेल तर फुलांना शीतगृहांमध्ये ठेवावे.
शीतगृहात साठवण
फुलांची शीतगृहात साठवण करताना काळजीपूर्वक करावी लागते. शीतगृहात साठवण करण्यापूर्वी फुलांना निवडून सुकवून घ्यावे.
झेंडू हे फुल अति थंड वातावरणात खराब होते. त्यामुळे झेंडू आणि निशिगंधाला शीतगृहात ठेवण्यासाठी १० ते १२ डिग्री सेल्सियस इतके तापमान ठेवावे.
शेवंती फुलासाठी मात्र थंड हवामान गरजेचे असते त्यामुळे शेवंतीला २ ते ४ डिग्री सेल्सियस तापमानात ठेवावे.
शीतगृहात फुलांना ठेवताना फुले कॅरेट किंवा बॅगमध्ये ठेवताना फुले आणि बॅगचा थेट संपर्क टाळावा. कापड किंवा कागदाचा एक थर लावावा.
जैविक उपाय-
फुलपिकांमध्ये सुरुवातीच्या काळात जैविक औषधांचा वापर सुरुवातीच्या काळात करावा. ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळवणारे जिवाणू आणि अॅझेटोबॅक्टर यांचा वापर लागवडीदरम्यान करावा. पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जीवाणू) अॅझेटोबॅक्टर ही खते शेणखतात मिसळून टाकावे. तर ट्रायकोडर्माचे २.५ ते ३ किलो प्रती हेक्टर या प्रमाणानुसार वापरावे.
एखादा रोग किंवा कीड उद्भवल्यावर रासायनिक कीडनाशकांची, बुरशीनाशकांची फवारणी करणे योग्य ठरते.
१. झेंडूची फुले किती दिवसांत काढणीस येतात?
साधारणपणे लागवडीनंतर ६०-६५ दिवसांनी फुले तयार होतात.
२. निशिगंध पीक किती वर्षे एकाच जमिनीत घेता येते?
तीन वर्षे एकाच जमिनीत निशिगंधाचे पीक घेता येते.
३. शेवंतीच्या रोगांपासून संरक्षण कसे करावे?
मर व ठिपक्याच्या रोगांसाठी मँकोझेब किंवा कार्बेन्डाझीम यांची फवारणी करावी.
४. सणासुदीला फुलशेतीत कोणती फुले जास्त नफा देतात?
झेंडू, शेवंती आणि निशिगंध ही फुले सणासुदीला जास्त मागणीमुळे नफ्याची शक्यता अधिक असते.
५. झेंडूची रोपे किती अंतरावर लावावीत?
६० x ३० सें.मी. अंतरावर रोपे लावणे योग्य असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.