
१. राज्यात असमान पावसामुळे अनेक पिकांवर ताण निर्माण झाला आहे.
२. कोळपणी, तणनियंत्रण, सरी काढणे यासारख्या पारंपरिक उपायांनी जमिनीतील ओलावा टिकवता येतो.
३. आच्छादन, ठिबक-सिंचन, मटका सिंचनसारख्या आधुनिक उपायांनी पाण्याचा वापर कार्यक्षम होतो.
४. रासायनिक फवारणीतून पिकातील ताण कमी करून उत्पादन टिकवता येते.
५. कमी पावसात फळबागा आणि भाजीपाला लागवडीत मातीची भर व कॅवोलीनसारखी फवारणी उपयुक्त ठरते.
Crop Management in Mild Drought: राज्यात यंदा पावसाचे वितरण असमान आहे. काही भागात जास्त तर काही भागात कमी पाऊस अशी परिस्थिती आहे. राज्यातील सव्वादोनशे तालुक्यांमध्ये कमी पावसाची नोंद आहे तर १३० तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. शिवाय पुढच्या दोन आठवड्यात पाऊस कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. अशा काळात पिकांची काळजी घेणे आवश्यक असते. शेतकरी सोप्या पद्धतींचा वापर करून या संकटाच्या काळात आपल्या पिकाला वाचवू शकतात.
राज्यात भात, मका, कापूस, ऊस, कांदा, बाजरी, तूर, उडीद, मूग या पिकांसह फळभाज्या, फळे यांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पारंपरिक उपाय शेतकऱ्यांना माहिती आहेत. त्याला एकात्मिक पद्धतींची जोड दिल्यास पिके १०-१५ दिवस चांगल्या प्रकारे तग धरु शकतात.
अ. पारंपरिक पद्धत-
शेतकरी प्रामुख्याने पारंपरिक पद्धतींचा वापर करतात. त्यातील आंतरमशागतीमध्ये विविध पद्धतींचा उपयोग होतो.
कोळपणी-
दोन हलक्या कोळपण्या कराव्या. साधारणत: सोयाबीन, मूग अशा पिकांमध्ये २१ दिवसांनी आणि फुले येण्याआधी कोळपणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनियमित पावसात पिकाची अवस्था बघून हलकी कोळपणी करावी. जेणेकरुन जमिनीला पडलेल्या भेगा बुजवल्या जातात आणि पाणी संधारणाचे काम होते. कोळपणी केल्याने एक ते दोन आठवडे पिके तग धरुन ठेवतात आणि जमिनीत ओलावा टिकतो. जे पीक मोठे झाले आहे अशा ठिकाणी कोळपणी शक्य नसल्यास तेथील मोठे तण उपटून घ्यावे.
तण व्यवस्थापन-
तणाचे एक रोप एका पिकाच्या रोपापेक्षा दुप्पट तिप्पट पाणी पिते. त्यामुळे तणांचे तात्काळ व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेतकरी कोळपणी, किंवा बाजारात असलेल्या विविध तणनाशकांचा वापर करु शकतात.
सरी काढणे-
तज्ञांच्या मतानुसार, कपाशी आणि तूर या पिकांमध्ये प्रत्येक ओळीनंतर एक जलसंधारणाची सरी काढून ठेवावी. यासोबत सोयाबीन, मूग, उडीद या पिकांमध्ये चार ओळींनंतर एक सरी काढावी. ही सरी काढण्यासाठी बळीराम नांगराचा वापर करावा. या सरीमुळे जास्त झालेल्या पावसामुळे साठलेले पाणी सुरक्षितरीत्या बाहेर काढता येते किंवा कमी पाऊस पडल्यास तो मुरवला आणि साठवला जाईल. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतांमधला पाण्याचा निचरा होण्याची सोय करावी.
मातीची भर देणे-
ही पद्धत फळबागेत वापरता येऊ शकते. झाडाला त्याच्या खोडाजवळ जमिनीच्या लगत मातीची भर घालावी. यामुळे भेगा नष्ट होतात आणि होणाऱ्या पाण्याचे उत्सर्जन थांबते. सोबत झाडाची मुळे उन्हापासून बचावतात आणि जमिनीत ओलावा टिकून राहतो.
ब. यांत्रिक पद्धत-
ज्या भागांमध्ये कमी पाऊस झालेला आहे अशा भागात कमी क्षेत्राच्या पिकासाठी आच्छादन हा उत्तम पर्याय ठरतो. प्लास्टिकचे किंवा भाताचे तूस, सोयाबीनच्या काडाने आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील पाण्याची धूप थांबते. साधारणत: एकरी एक टनापर्यंत त्याची गरज असते. म्हणून मजूर आणि संसाधनांच्या गरजेमुळे आच्छादन हा थोडा खर्चिक भाग ठरु शकतो. कमी क्षेत्रातील भाजीपाला लागवड, फळबागेत आच्छादन फायदेशीर ठरते.
सिंचनाचा वापर-
ज्या ज्या शेतांमध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी तुषार सिंचन, ठिबक सिंचन, मटका सिंचन यांचा वापर करावा. शक्यतो संध्याकाळच्या वेळेला किंवा हवेचा वेग कमी असताना तुषार सिंचनाचा वापर करावा; जेणेकरुन त्याचे बाष्पीभवन कमी होईल.
क. जैविक उपाय-
जीवामृतची आवळणी किंवा फवारणी करावी. १ लिटर जीवामृताची १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
ड. रासायनिक पद्धत-
१. ज्या शेतातील पिके ३० दिवसांच्या आत आहेत, अशा ठिकाणी पोटॅशियम नायट्रेटचा (१३:००:४५) (१ %) या खताचा वापर करु शकतात. या खतामुळे पिकावरील रंध्राचे उघडण्याचे आणि बंद होण्याचे प्रमाण नियंत्रित करते. (रंध्र म्हणजे पिकांच्या पानांवरील सूक्ष्म छिद्रे, ज्यांच्याद्वारे पिकातील पाण्याचे बाष्पीभवन होते). पिकावरील कमी पाण्यामुळे आलेला ताण कमी करण्यास मदत होते. या खताच्या फवारणीसाठी १०० ग्रॅम प्रती दहा लिटर पाणी असे घ्यावे. जे पीक ३० ते ३५ दिवसांचे आहे त्या पिकांवर २ टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी म्हणजेच २०० ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. ज्याठिकाणी जमिनीत ओल नाही किंवा पिकाला अन्नद्रव्य मिळत नाहीत अशा ठिकाणी १९:१९:१९ हे खत ५० ते १०० ग्रॅम फवारणीमधून द्यावे.
३. फळबागांमध्ये बोर्डोपेस्ट फवारावे. पानांवर पडलेल्या बोर्डोपेस्टमुळे जे सूर्यकिरण झाडावर पडतात ते परावर्तीत होतात, त्यामुळे त्या झाडाची पाण्याची गरज कमी होते.
४. ज्या पिकांमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आहे अशा पिकांमध्ये तात्काळ औषधे, बुरशीनाशक, कीडनाशकांची फवारणी करावी आणि किडीचा बंदोबस्त करावा.
५. कॅवोलीन (खडूची भुकटी) फळबागांमध्ये फवारावे. याने पानांवर पडेलेले कॅवोलीन जास्तीत जास्त सूर्यप्रकाश परावर्तीत करतात त्यामुळे उष्णता वाढत नाही त्यामुळे पाण्याचे उत्सर्जन कमी होते. सर्वसाधारणपणे सर्व पिकांमध्ये ७ टक्के अर्थात ७०० ग्रॅम कॅवोलीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
६. अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये शेतांमधील पाण्याचे प्रमाण पाहून गरजेनुसार युरिया टाकावा.
१. पाऊस कमी झाल्यास पीक कसे वाचवावे?
कोळपणी, तणनियंत्रण, आच्छादन व सिंचन प्रणालींचा वापर करावा.
२. पाण्याचा ताण असलेल्या पिकांना कोणते खत द्यावे?
पोटॅशियम नायट्रेट (13:00:45) किंवा 19:19:19 खताची फवारणी करावी.
३.कोणत्या पिकांमध्ये सरी काढणे आवश्यक असते?
कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद यामध्ये सरी काढाव्यात.
४. आच्छादन केव्हा करावे आणि त्याचे फायदे काय?
भाजीपाला व फळबागांमध्ये करावे; यामुळे जमिनीत ओल टिकते.
५. फळबागेसाठी कोणती रासायनिक फवारणी उपयुक्त आहे?
बोर्डोपेस्ट किंवा कॅवोलीन फवारणीने झाडांचे पाणी बाष्पीभवन कमी होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.