Animal Care : गावकरी एकवटले, ‘देवगायीं’ना दिला निवारा

Stray Cow : या ‘देवगायीं’ना सामूहिक आश्रय मिळाल्याने त्यापासून असलेला त्रास तर वाचलाच, शिवाय या अभिनव संकल्पनेचा इतर गावांकरिता आदर्श निर्माण केला आहे.
Stray Cows
Stray CowsAgrowon
Published on
Updated on

Washim News : ‘गाव करी ते, राव काय करी’ ही म्हण प्रत्यक्षात उतरविण्याचे काम जिल्ह्यातील वडजी या छोट्याशा गावाने केले आहे. गावशिवारात भटकणाऱ्या देवगायींना एकत्रित करून त्यांचा संपूर्ण सांभाळ गावाने सुरू आहे.

एक आदर्शवत अशी ‘श्री हनुमान सामूहिक गोशाळा’ यातून सुरू झाली आहे. यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाचा लोकसहभाग मिळाला आहे. या ‘देवगायीं’ना सामूहिक आश्रय मिळाल्याने त्यापासून असलेला त्रास तर वाचलाच, शिवाय या अभिनव संकल्पनेचा इतर गावांकरिता आदर्श निर्माण केला आहे.

रिसोड तालुक्यात असलेले वडजी हे सव्वाशे ते दीडशे कुटुंबाचे छोटेसे गाव. हे गाव संत्रा उत्पादकतेत जिल्ह्यात अग्रेसर मानले जाते. या गावात २० वर्षांपूर्वी एक ‘देवगाय’ सोडण्यात आली होती. आज तिच्यापासून गावात ३० गायी झालेल्या आहेत. देवगाय असल्यामुळे कोणीही या गायीला बांधून ठेवत नव्हते. परिणामी, गावातील किंवा शिवारातील शेतांमध्ये या गाईद्वारे मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत होती. याचा फटका शेतकऱ्यांना झेलावा लागत होता.

दरम्यान, शेतकऱ्यांनी या त्रासापासून मुक्त होण्यासाठी सर्व गायी कुठल्या तरी गोशाळेत नेऊन सोडून देण्याचा निर्धार केला. पण बऱ्याच गोशाळांनी त्यांची विनंती नाकारली. सरतेशेवटी ते सोनू पारख यांच्या गोशाळेकडे गेले असता, त्यांनी या शेतकऱ्यांचे मत परिवर्तन करून या गायींमुळेच तुमच्या गावाची प्रगती आहे व या गायी कोणत्याही गोशाळेत सोडून न देता तुम्हीच गोशाळा तयार करून गायींची सेवा करा असे सुचवले.

Stray Cows
Animal Care : जनावरांतील सांसर्गिक श्वसनलिका दाह

त्यांची ही सूचना पटली. गावात करडा कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून गटशेती उपक्रमासाठी तयार झालेल्या युवा शेतकऱ्यांनी एकत्र येत यावर चर्चा केली. हे सर्वच युवा शेतकरी एकत्रित येऊन संत्रा, हळद व इतर पिकांचे नियोजन करीत आहेत. त्यांनी आपल्या गावातच सामूहिक गोशाळा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. गावातील सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून एक आगळीवेगळी गोशाळा उभी करण्याचा प्रस्ताव तयार केला.

गोशाळा सुरू करण्याच्या दृष्टीने जागा, चारा, पाणी, पैसा, संगोपनाची जबाबदारी असे विविध प्रश्‍न समोर आले. पण निर्धार पक्का असल्याने प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर मिळत गेले. जागेचा प्रश्‍न डॉ. सुनील पंढरी बोरकर यांनी सोडवला. त्यांच्या मालकीची अर्धा एकर जमीन या गोशाळेसाठी उपलब्ध करून दिली. त्यांचेच भाऊ सतीश पंढरी बोरकर यांनी चारा उत्पादनासाठी त्यांचे अर्धा एकर शेती दिली.

गावातील शेतकऱ्यांनी संपूर्ण श्रमदान करीत गोशाळेचे बांधकाम करण्यास पुढाकार घेतला. पाच हजार रुपयांपासून ते २१ हजार रुपयांपर्यंत वर्गणी दिली. गावातील जे युवक नोकरीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत त्यांनीही मोलाची आर्थिक मदत केली. पाहता पाहता आठवड्यातच सात लाख रुपये उभे राहिले.

अवघ्या १५ दिवसांत गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी श्रमदानाने गोशाळेचे संपूर्ण बांधकाम केले. गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात निघणारे विविध पिकांचे कुटार सुद्धा चाऱ्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले. जनावरांना प्यायला २४ तास पाणी मिळावे यासाठी तेथे बोअरवेलही खोदली. त्याला भरमसाट पाणी लागले.

अशी चालवली जाते गोशाळा

या गोशाळेतील दैनंदिन कामे करण्यासाठी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांमधील सेवा कार्याचा आदर्श सोबत ठेवण्यात आला. त्याच धर्तीवर गावातील प्रत्येक कुटुंब सेवा देत असते. वर्षातील दोन ते तीन दिवस प्रत्येक कुटुंबाला विभागून देण्यात आले आहेत. आपल्या नियोजित दिवशी संबंधित कुटुंबीय गो शाळेची संपूर्ण कामे करीत असतात. शिवाय नीलेश सरनाईक, भागवत बोरकर व रामेश्वश्‍वर देशमुख हे घरोघरी देवपूजेवेळी वाहिलेले नैवेद्य व घरांमध्ये शिल्लक राहणारे अन्न गोळा करून या गोशाळेत पोहोचवितात.

Stray Cows
Animal Care : तीन लाख जनावरांच्या लसीकरणाचे आव्हान

लोकवर्गणीचा आदर्श

गावाचे कार्य समजून या गोशाळेसाठी प्रत्येक कुटुंबाने वाटा उचलला. प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतातील उत्पादित मालाच्या क्विंटल मागे एक किलो धान्य या गोशाळेसाठी दान देतो. यासोबतच गावातील प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी त्यांच्या मिळकतीतून एक लाख रुपयांमागे एक हजार रुपये, याप्रमाणे आर्थिक मदत गोळा करतात. परिणामी, आजपर्यंत ४० क्विंटल धान्य व संत्रा उत्पादकांकडून सव्वा लाख रुपये वर्गणी जमा झालेली आहे.

गावात होणारे वर्षश्राद्धाचे खर्चसुद्धा आता गोशाळेला दिला जातो. सर्वधर्मीय गावकरी या गोशाळेसाठी तण-मन-धनाने काम करीत आहेत. या गोशाळेमुळे जनावरांपासून होणारा त्रास तर वाचलाच शिवाय गोशाळेमुळे गावकऱ्यांची एकीही वाढली. शेतीसाठी शेणखत, गोमूत्र या ठिकाणावरून उपलब्ध होऊ लागले आहे. गणपत ग्यानोजी खंडारे हे या गोशाळेचे २४ तास अत्यल्प मानधनात सेवा कार्य म्हणून काम सांभाळत आहेत.

(संपर्क ः गोपाल बोरकर ९२८४०५५१४२, राजेश बोरकर ९३०९५४३१४४)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com