Pune News : दुभत्या जनावरांना लागण होऊन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सध्या जिल्ह्यात लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन पशुसंवर्धन विभागाकडून ही लस देण्यात येत आहे.
आत्तापर्यंत ८ लाख ४३ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही मोहीम मंगळवारपर्यंत (ता.१५) असल्याने केवळ पाच दिवसांत ३ लाख १ हजार ४७८ जनावरांचे लसीकरण पूर्ण होणार का? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
जिल्ह्यामध्ये मार्च २०२२ नंतर लाळ खुरकूतची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली नसली तरी काही गोठ्यांवर जनावरांना रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लाळ खुरकूत हा रोग विषाणूजन्य असून गाय, बैल, म्हैस आदी पशूंसाठी घातक असणाऱ्या रोगावर ही लस उपयोगी आहे. जनावरांना ताप येणे, तोंडाला फोड येऊन जखमा होणे, खुरांना जखमा होणे ही लाळ खुरकूत रोगाची लक्षणे आहेत.
त्यामुळे जनावरे काही खाऊच शकत नसल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन पशुधन दगावते. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक असून पाणी आणि खाद्यातून होतो. हे टाळण्यासाठी जिल्ह्याला ११ लाख ७९ हजार ३०० लाळ खुरकूतच्या लस उपलब्ध झाल्या. आत्तापर्यंत आठ लाख जनावरांना लसीकरण झाले असले तरी अद्याप तीन लाख जनावरांपर्यंत पशुसंवर्धन विभाग पोहोचलेला नाही. ता.१५ ऑगस्टला सुरू झालेली लसीकरणाची मोहीम ता.१५ ऑक्टोबरला संपत आहे.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी कारखान्यांच्या परिसरातील गावांमध्ये प्रामुख्याने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रमुख जनावरांचा बाजार असलेल्या परिसरातील गावांमधील जनावरांचे अगोदर लसीकरण करण्यात आले.
दुभत्या जनावरांना या रोगाचा फटका बसतोच परंतु, बैलांना या रोगाची लागण झाल्यानंतर त्यांची काम करण्याची क्षमता देखील कमी होते. परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे आणि लाळ खुरकूत मुक्त भारत करण्याच्या दृष्टीने ही मोहीम सुरू आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
रोगामुळे दूध उत्पादनात घट
लाळ खुरकूत रोगाची लागण झाल्याने जनावरांचे खाणे-पिणे बंद होते. जनावरांना ताप येतो. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे कल आहे. दुधाळ जनावरांना रोगाची लागण झाल्याने दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस दूध उत्पादन क्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते.
लाळ खुरकूत तालुकानिहाय आकडेवारी
तालुका जनावरांची संख्या लस दिलेली जनावरे
आंबेगाव - ७९,१८० - ६५,४२१
बारामती - १,३४,५४८ - १,०७,००९
भोर - ४३,२६५ - ३६,७४१
दौंड - १,११,२५८ - ८९,५३९
हवेली - १,०७,१८० - २९,४५५
इंदापूर - १,७३,२३७ - १,७३,८९१
जुन्नर - ९८,०२५ - ४८,२६८
खेड - ९५,२१० - ५९,७२९
मावळ - ५६,५४९ - ४१,७२७
मुळशी - ३४,०९३ - २६,०८५
पुरंदर - ५५,३१४ - ५३,७९६
शिरूर - १,३५,५५६ - ९४,६६७
वेल्हे - २१,४७८ - १७,०८७
एकूण - ११,४४,८९३ - ८,४३,४१५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.