Goat Rearing : दुग्धोत्पादनासाठी शेळीपालनाचा करा गांभीर्याने विचार

Dairy Production : २६ एप्रिलच्या ‘ॲग्रोवन’मध्ये ‘निरोगी आयुष्यासाठी घ्या शेळीचे दूध’ हा माझा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. आपल्या प्रतिक्रियांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनासाठी शेळीपालन यावर प्रबोधन होण्याची गरज बोलून दाखविली.
Goat Rearing
Goat RearingAgrowon

Milk Production : शेळीपालनातून मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्‍यांना अर्थार्जन मिळत असले तरी जवळपास ७० ते ८० टक्के शेळीपालन हे फक्त मांस उत्पादनासाठी केले जाते. शेळीपालनातून दूध, मटण, लोकर, कातडी आणि लेंडीखत मिळते.महाराष्ट्रामध्ये जवळपास ४८ लाख अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन शेळीपालन करतात. राज्यातील अनेक प्रांतांमध्ये, विविध हवामानामध्ये शेळीपालन केले जाते;

कारण शेळी ही अनेक प्रकारच्या वातावरणात तग धरून राहते. देशामध्ये १३.५१ कोटी शेळ्यांची संख्या असून, राजस्थान हा पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्र शेळ्यांच्या संख्येमध्ये  सहाव्या क्रमांकावर असून, राज्यामध्ये शेळ्यांची संख्या ८४ लाख आहे. अर्थात, मागील दशकामध्ये शेळ्यांच्या संख्येमध्ये १८.८२ टक्के घट झालेली आहे.

राज्यातील दूध उत्पादनासाठी वापर होत असलेल्या शेळ्यांच्या संख्येतही २६ लाखांवरून २० लाखांपर्यंत घट झालेली आहे. राज्यात उस्मानाबादी शेळ्या १२ टक्के, संगमनेरी दोन टक्के, तर इतर मिश्र प्रकारच्या जाती ८६ टक्के आहेत. उस्मानाबादी आणि संगमनेरी या दोन्हीही जाती दुग्ध उत्पादन, तसेच मटणाच्या उत्पादनासाठी चांगल्या आहेत. शेळीपालनाचा विचार केला तर मटणासाठी जास्त वापर होतो. परंतु दिवसेंदिवस शेळीच्या दुधाचे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्व पटत असताना दुधासाठी शेळीपालन या विषयावर भविष्यात मोठ्या प्रमाणात काम करायला संधी आहे.

देशाचा विचार केला तर २०१९ मध्ये ५४ लाख टन शेळीच्या दुधाचे उत्पादन मिळाले होते. दूध उत्पादनामध्ये राजस्थान एक नंबरला असून, तिथे १६ लाख टन उत्पादन होते, तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून येथे तीन लाख टनांपर्यंत दुधाचे उत्पादन मिळते. जगामध्ये शेळीपालनामध्ये आशिया खंड अग्रेसर असून, ५२ टक्के उत्पादन होते, तर आफ्रिकेमध्ये ३९ टक्के, युरोपमध्ये पाच टक्के, अमेरिकेमध्ये तीन टक्के उत्पादन घेतले जाते. जगामध्ये शेळीच्या दुधाचे उत्पादन १८७ लाख टन घेतले जाते.

Goat Rearing
Dairy Production : कोल्हापुरातील अनेक दूध संस्थांचे ‘मापात पाप’

यामध्ये भारत अग्रस्थानी आहे. जागतिक पातळीवर दुधाची मागणी वाढत आहे. शेळीच्या दुधाची पावडर तयार करून बेबी फूडमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात शेळीच्या दुधाची पावडर आयात करून बेबी फूड तयार करून जगभर विक्री केली जाते. शेळीच्या दुधापासून अत्यंत चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे चीज तयार केले जाते, ज्याला जगभर फार मोठी मागणी आहे. 

युरोपमध्ये विशेषतः फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात चीजचे उत्पादन होते. युरोपमध्ये १९५० च्या कालखंडानंतर दूध उत्पादनासाठी शेळीपालन यावर भर देण्यात आला. फ्रान्स, इटली, स्पेन, नेदरलॅण्ड या देशांनी शेळीपालनात फारच मोठ्या प्रमाणात प्रगती केली. शेळीच्या दुधाच्या सेवनाबरोबरच मोठ्या प्रमाणात चीज तयार करून त्यापासून जास्तीचा आर्थिक फायदा तेथील शेतकरी घेतात.

कृत्रिम रेतन, बंदिस्त शेळीपालन आणि यांत्रिकी पद्धतीने दुधाची काढणी, प्रक्रिया दूध आधुनिक पद्धतीने माहिती संकलन केले जाते. याचमुळे आज जगात सर्वांत जास्त प्रतिशेळी प्रतिवर्ष उत्पादन नेदरलॅण्ड ७९८ किलो, फ्रान्स ६८७ किलो याप्रमाणे असून, जागतिक सरासरी उत्पादन ९० किलो आहे. महाराष्ट्राची सरासरी दूध उत्पादन प्रतिदिन प्रतिशेळी ६०० मि.लि. आहे.

युरोप खंडामध्ये मागील ७० वर्षांत आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेळी दूध उत्पादनामध्ये फार मोठी प्रगती केली. इस्राईलनेही यामध्ये मागील काही दशकांत चांगली प्रगती केली असून, तेथील सरासरी दूध उत्पादन ३०५ किलो प्रतिवर्षपर्यंत वाढले आहे. चीन फार मोठ्या प्रमाणात शेळीच्या दूध पावडरची आयात करतो. यासाठी चीनमध्येच विविध प्रांतांमध्ये दूध उत्पादनासाठी शेळीपालनासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

Goat Rearing
Goat Rearing : शेळ्या, मेंढ्या संगोपनात आहार, आरोग्य महत्त्वाचे

अमेरिकेमध्येही मागील १०-११ वर्षांपासून दूध उत्पादनासाठी शेळीपालन यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. जगामध्ये मागील दोन दशकांत शेळ्यांची संख्या ३४ टक्क्यांनी वाढली तर मेंढ्या फक्त १० टक्क्यांनी वाढल्या. गाईंची संख्या स्थिर आहे. या सर्व विश्‍लेषणावरून लक्षात येते की दूध उत्पादनासाठी शेळीपालनावर सर्व जग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. भारतासारखा देश शेळ्यांची संख्या आणि दूध उत्पादनाच्या आकडेवारीमध्ये आघाडीवर दिसत असला, तरी या क्षेत्रावर काम फारच कमी प्रमाणात सुरू आहे. ज्याप्रमाणे धवलक्रांतीनंतर गोपालनासाठी अनेक उपक्रम राबविले गेले तसेच उपक्रम पुढील काही दशकांमध्ये शेळीपालनासाठी राबविण्याची गरज आहे.

दूध उत्पादनासाठी शेळीपालन हा व्यवसाय संघटित नाही. तसेच यासाठी कोणतेही नवीन तंत्रज्ञान वापरले जात नाही. आज देशामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या शेळ्यांच्या जाती विविध प्रांतांमध्ये आहेत. उत्तरेकडील जमनापरी ही शेळी दिवसाला दोन ते अडीच लिटर दूध देते. गुजरातची सुरतीही दोन ते अडीच लिटर, राजस्थानची जखरना दोन ते तीन लिटर दुधाचे उत्पादन देते. महाराष्ट्रातील उस्नामाबादी शेळी दोन ते तीन लिटरपर्यंत दररोज दूध देऊ शकते. परदेशातील सानेन ही जात साडेतीन ते चार लिटरपर्यंत दररोज दूध देते.

अर्थात, यासाठी चांगल्या शेळ्यांची विभागनिहाय निवड करणे, मूळ जातींच्या चांगल्या वंशावळीच्या शेळ्यांची जपणूक करून त्यांपासून वीर्य काढून गोठवलेले वीर्य कृत्रिम रेतनासाठी वापरून शेळ्यांचे चांगले कळप तयार करणे यावर भर द्यावा लागेल. बंदिस्त पद्धतीने शेळीपालन तसेच तेथे यांत्रिकीकरण करून दुधाची काढणी आणि हाताळणी, प्रक्रिया करून विक्री व्यवस्थेवर विशेष कार्य करावे लागणार आहे.

जास्त दूध उत्पादनासाठी शेळीचा खुराक व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन यावरही मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल. दूध उत्पादनासाठी शेळीपालन यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होण्याची गरज आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये कार्य करत असलेल्या कर्मचाऱ्‍यांनी ज्या प्रमाणात दूध उत्पादनासाठी गोपालकांना तयार केले त्याचप्रमाणे त्यांना दूध उत्पादनासाठी शेळीपालनाकरिता आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अवगत करून तयार करण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात युवक, महिलांना रोजगाराचा गंभीर प्रश्‍न असतो. त्यांना दुधासाठी शेळीपालन या व्यवसायाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकातून कुशल बनविले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. दूध काढण्यापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यातून प्रक्रिया उद्योगही निर्माण होऊ शकतात. शेळीच्या दुधाला जागतिक पातळीवर मागणी वाढत आहे.

तसेच देशांतर्गतही फार मोठे मार्केट या दुधाला निर्माण होऊ शकते, याचा गांभीर्याने विचार राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे. फक्त गाईचेच दूध या एकाच वाटेने जाऊन अडचणी निर्माण करण्यापेक्षा नवीन पाऊलवाट शोधली पाहिजे. अन्न स्वावलंबन, कमी पाण्यात-कमी जमिनीत रोजगार निर्मिती, अल्प भांडवलात सुरू होणारा व्यवसाय म्हणजे दुधासाठी शेळीपालन- ज्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com