Animal Diet Management : गाई, म्हशींचे प्रसूतिपूर्व, प्रसूतिपश्चात आहार व्यवस्थापन

Dairy Cattle Nutrition : गाई, म्हशींपासून अधिक दुग्धोत्पादन मिळविण्यासाठी त्यांना संतुलित, सकस आणि योग्य अन्नघटकांनीयुक्त आहार देणे आवश्यक असते.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ.जी.एम.गादेगावकर, डॉ.एस.ए.ढेंगे

Animal Health Management : जनावरांमध्ये प्रसूतिपूर्व सुमारे पन्नास दिवस आणि प्रसूती पश्चात पन्नास दिवस या कालावधीला परिवर्तन कालावधी म्हणजेच संक्रमण काळ असे संबोधले जाते. या काळात गाभण असलेले, दूध न देणारे जनावर, गाभण नसलेल्या व दूध देणाऱ्या परिस्थितीत रूपांतरित केले जाते. या काळात केल्या जाणाऱ्या आहार व्यवस्थापनास परिवर्तन आहार असे म्हणतात. या अवस्थेमध्ये आहारातील गरजा, पोषक तत्त्वांची गुणवत्ता आणि मात्रा यात अचानकपणे बदल होतात.

परिवर्तन आहाराची मुख्य उद्दिष्टे

गाभण कालावधीत गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाची समाधानकारक वाढ करणे, गाभण काळाच्या शेवटी प्रसव सुलभ करणे.

व्यायल्यानंतर पहिले पाच ते सहा आठवडे दैनंदिन दुग्धोत्पादनात वृद्धी करणे. वेताचा कालावधी वाढवणे आणि प्रजनन शक्ती मध्ये सुधारणा करणे.

प्रसव प्रक्रियेत जनावराची झालेली शरीराची झीज भरून काढणे, प्रसूतिपश्चात ६० ते ७० दिवसात जनावरचा शरीर गुणांक पूर्ववत करून त्या जनावरांचे प्रजनन चक्र प्रस्थापित करून ते जनावर प्रसूती पश्चात शंभर दिवसाच्या आत गाभण राहून दरवर्षी वासरू जन्माला यावे.

Animal Care
Animal Diet : गाय, म्हशीला असं खाद्य दिल्यामुळे उन्हाळ्यातही टिकून राहील दूध

गाभण काळातील आहार व्यवस्थापन

प्रसूती पूर्व दोन महिने कालावधीत आहाराचा दर्जा, पाचकता उच्चतम राहील, जनावरांची दैनिक आहार ग्रहण करण्याची क्षमता समाधानकारक राहण्यासाठी जनावरांचे आहार नियोजन करावे.

गाई, म्हशींच्या गाभण काळात गर्भाची वाढ पहिले सहा महिने हळुवार होते. त्यानंतरच्या तीन महिन्यात ती झपाट्याने म्हणजे पहिल्या सहा महिन्याच्या वाढी३पेक्षा तिप्पट होते. म्हणून या काळात पुढील दुग्धवाढीच्या आणि गर्भाच्या पोषणाच्या दृष्टीने जादा शक्तीचा संचय करून ठेवण्याची गरज पडते.

गाभण काळातील शेवटच्या तीन महिन्यामध्ये गर्भाशय, कासेच्या पेशींचे पुनरुज्जीवन आणि वाढ देखील झपाट्याने होत असते. या सर्व गोष्टींमुळे गाई, म्हशींना गाभण काळातील शेवटचे तीन महिने अतिरिक्त खुराक देणे आवश्यक असते.

गाभण काळातील शेवटच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये गाई, म्हशींचे दूध काढले जात नाही. त्याला भाकड काळ म्हणतात. या काळात गाई, म्हशी आटवल्या जातात जेणेकरून त्यांना पुरविलेली सर्व पोषण मूल्य शरीर पोषणासाठी, गर्भाच्या वाढीसाठी, कासेच्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी वापरली जातील. या भाकड काळात गाय दूध देत नसली तरी अतिरिक्त खुराक देणे महत्त्वाचे ठरते.

गाभण काळातील शेवटच्या दोन महिन्यांतील आहार व्यवस्थापन

देशी गाईला १ किलो खुराक शरीरपोषणासाठी, १.२५ किलो अतिरिक्त खुराक गर्भाच्या योग्य वाढीसाठी देण्यात यावा. म्हशी व संकरित गाईंना १.५ किलो खुराक शरीरपोषणासाठी आणि १.७५ किलो अतिरिक्त खुराक गर्भाच्या वाढीसाठी देणे संयुक्तिक ठरते.

या व्यतिरिक्त गाई, म्हशींना प्रती दिन ५ ते ६ किलो सुका चारा आणि २० ते २२ किलो हिरवा चारा एकाच वेळी न देता विभागून थोड्या थोड्या वेळाने कुट्टी करून द्यावा, जेणे करून चाऱ्याची नासाडी न होता नुकसान टाळता येईल.

अतिरिक्त खुराकाचे फायदे

प्रसूती सुलभ होते, जार अडकण्याचे प्रमाण कमी होते. सशक्त वासरू जन्माला येते.

कासेच्या पेशींचे पुनरुज्जीवन होऊन कासेची वाढ चांगली होते. वेतातील दुग्धोत्पादनामध्ये वृद्धी होते.

शरीरामध्ये अन्नद्रव्यांचा साठा निर्माण होतो, जो वेताच्या सुरुवातीच्या काळात दुग्धोत्पादनासाठी वापरला जातो.

वेताचा कालावधी वाढतो. जनावरांचा शरीर गुणांक टिकवला जातो. प्रसूतीनंतर जनावर लवकर माजावर येतात आणि चांगले रेतन होते.

आव्हानात्मक आहार

जास्त दूध देणाऱ्या गाई,म्हशींना गाभण काळातील शेवटचे तीन आठवडे अधिक प्रमाणात खुराक दिला जातो. यामध्ये गाभण काळातील शेवटचे तीन आठवडे जनावरास त्याच्या गरजेपेक्षा ५०० ग्रॅम अधिक खुराक दिला जातो. हळूहळू खुराकाचे प्रमाण १ किलो/१०० किलो शरीर वजन एवढ्या प्रमाणात वाढवून दिले जाते.

यामुळे व्यायल्यानंतर जास्त पशुखाद्य खाणे आणि पचवणे यासाठी पचन संस्था सक्षम बनते. अशा प्रकारे अधिक खुराक दिल्याने पशूंच्या अधिकाधिक दूध देण्याचा मर्यादेला आव्हान दिले जाते. जनावरांच्या वेतातील दुग्धोत्पादन वाढवणे शक्य होते.

Animal Care
Animal Diet : उन्हाळ्यात दुधवाढीसाठी कसा असावा जनावरांचा आहार?

खाद्यामध्ये एनआयोनिक क्षार

जनावराच्या रक्ताचा सामू आम्लधर्मी करून जनावराच्या हाडात असलेले कॅल्शिअमचे साठे चीक आणि दूध तयार करण्यासाठी उपलब्ध (मोबिलायझेशन) करून देण्याच्या दृष्टीने आहार नियोजन करावे. २) सामान्यपणे जनावरांच्या शरीरातील रक्ताचा सामू अल्कली प्रकारचा असतो, तो जर आम्लधर्मी स्वभावाचा झाला तर जनावरच्या हाडातील कॅल्शिअमचे साठे रक्तात येतात. जनावर व्यायल्यानंतर कॅल्शिअम फार मोठ्या प्रमाणात चीक व दुधावाटे बाहेर पडते.

जनावराच्या हाडातील कॅल्शिअम रक्तात येऊन ते विण्याच्या वेळी कासेत उपलब्ध झाले तर कॅल्शिअम समृद्धी निर्माण होते. अशा प्रकारचे कॅल्शिअमचे साठे उपलब्ध न झाल्यास चीक व दूध देताना जनावरांना शरीरातील अन्य ठिकाणाहून कॅल्शिअम उपलब्ध करावे लागते. याचा विपरीत परिणाम म्हणजे जनावरांच्या मज्जा संस्थेचे काम बिघडते, दुग्धज्वरासारखे चयापचयाचे आजार दिसून येतात, जनावरांनी दिलेल्या चिकातून वासरास पूर्णान्न मिळत नाही, व्यायल्यानंतर वार वेळेत बाहेर पडत नाही. जनावरांमध्ये गर्भाशय, कासेचा दाह होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जनावरांना विण्याच्या आधी २० ते २५ दिवस ऋणभार अधिक (एनआयोनिक) असलेले क्षार मिश्रण आहारातून पुरवावे.

एनआयोनिक क्षार मिश्रणामुळे विण्याचा वेळी जनावरांचे रक्त आम्लधर्मी होते. त्याचा परिणाम म्हणून जनावराच्या हाडातील कॅल्शिअम चीक व दुग्धोत्पादनासाठी कासेत उपलब्ध होतो. अशा प्रकारचे ऋणभारित क्षार मिश्रण एनडीडीबी तसेच अन्य काही कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. पशुपालकांनी त्याचा पूरक म्हणून आहारात उपयोग करावा.

पशू प्रसूतीच्या एक महिना आधी पशू आहारात ७५-१०० ग्रॅम प्रती दिवस एनआयोनिक क्षारांचा वापर केल्यास दुग्धज्वर, वार न पडणे इत्यादीची शक्यता कमी करता येते. कॅल्शिअम क्लोराइड, मॅग्नेशिअम सल्फेट, अमोनिअम क्लोराइड यासारख्या विविध एनआयोनिक क्षारांचा अवलंब पशू खाद्यात करता येतो. एनआयोनिक क्षारांचा वापर फक्त प्रसूतिपूर्व पशूंच्या आहारातच करावा.

प्रसूती पश्चात आहार व्यवस्थापन

गाय, म्हैस व्यायल्यानंतर ६ ते ८ आठवड्यात दुग्धोत्पादन हे सर्वाधिक पातळीवर पोहोचते. ती सर्वाधिक सरासरी पातळी दीर्घकाळ कायम ठेवल्यास वेतातील दुग्धोत्पादनात वाढ होते. पशुपालकास त्याचा आर्थिक फायदा होतो. परंतु याकाळात गाभण व प्रसूती काळातील तणावामुळे पशूंची आहार खाण्याची क्षमता प्रसूतीनंतर कमी असते, परिणामी दूध उत्पादनासाठी लागणारी ऊर्जेची गरज व आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या तफावतीमुळे पशूच्या शरीरात ऊर्जेची कमतरता तयार होते.

या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी दुधाळ पशू शरीरातील संचयित स्निग्धांचा वापर दुग्धोत्पादनासाठी करतात. परिणामस्वरूप चयापचय संबंधी विकार होतात व एकंदरीत पशूंचे दुग्धोत्पादन, सर्वांगीण आरोग्य व प्रजनन शक्ती यावर दीर्घकाळ परिणाम होतो. हे टाळण्याकरिता आहार व्यवस्थापन करावे.

प्रसूतींनंतर आठवडाभर जनावरास हलका व पचनास सुलभ असा आहार द्यावा. यामध्ये गहू भुसा व तृणधान्यांचा आहारात वापर करावा. प्रसूतींनंतरचे ५ ते ६ दिवस तेलबियांपासून मिळणाऱ्या पेंडींचा आहारातील वापर टाळावा, जनावरांना गरम पाणी पिण्यास द्यावे. आहारात हिरव्या व सुक्या चाऱ्याचा अवलंब पशूंच्या दुग्धोत्पादनाप्रमाणे करावा.

उर्जासंबंधी पोषण व्यवस्थापन

एक किलो सरकी किंवा सोयाबीन बियांचा आहारात शिजवून किंवा गरम करून समावेश करावा. या बियांमधून पशूंना ऊर्जा व प्रथिने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. तेल बियांच्या आहारातील अवलंबामुळे पशूंची ऊर्जेची गरज भागते. दुग्धोत्पादन व शरीर वजन टिकून राहण्यास मदत होते.

गाई, म्हशींच्या दुग्धोत्पादनानुसार आहारात १०० ते १५० ग्रॅम बायपास फॅटचा अवलंब करावा किंवा खुराकामध्ये ०.५ ते २ टक्के याप्रमाणात अवलंब करावा. यातून ऊर्जेची गरज भरून निघते.

आहारातील कॅल्शिअम क्षाराचे प्रमाण कमी करणे

गाभण काळातील शेवटच्या तीन आठवड्यामध्ये आहारातील कॅल्शिअमची मात्रा कमी करावी, जेणेकरून पॅराथायरोईड ग्रंथी कार्यरत होईल. हाडांमधून कॅल्शिअम शोषून रक्तात आणण्याच्या क्षमतेत वाढ होईल. दुग्धज्वर सारख्या समस्या टाळता येतील.

प्रसूतीच्या शेवटच्या काळात आहारात कॅल्शिअम विरहित क्षार मिश्रण वापरावे. लवण, उसाची मळी, लसूणघास यांचा आहारातील वापर कमी करावा.

- डॉ.जी.एम.गादेगावकर, ९९३०९०७८०६

(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com