उच्च दूध उत्पादन (Milk Production) आणि आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेशी निगडित दुधाळ जनावरांमध्ये (Animal) विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध (Milk) देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो.
आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो. गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध उत्पादनाचा काळ यामध्ये दुधाळ जनावरांची निगा, आरोग्य, आहार व व्यवस्थापन योग्यप्रकारे न करणे हे चयापचय आजार होण्यामागचे मुख्य कारण आहे.
दुभत्या जनावरांमध्ये तिसऱ्या ते पाचव्या वेतामध्ये आजार दिसतो. पहिल्या किंवा दुसऱ्या वेतामध्ये जनावराची चाऱ्यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शिअमचे प्रमाण यामुळे आजार होण्याचा धोका फार कमी असतो. आजार मुख्यत्वे संकरित गाई (५ ते ७ टक्के) आणि म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. रक्तातील कॅल्शिअम कमतरतेमुळे आजार होतो. प्रसूतीनंतर दूध देण्याचा कालावधी तसेच चीक आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअमची मागणी शरीराच्या कॅल्शिअम पुरवठा करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते, तेव्हा आजार दिसतो.
गाय आणि म्हैस व्यायल्यानंतर ४८ ते ७२ तासांच्या आत अचानक कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. व्यायल्यानंतर १ ते ३ दिवसांत आजाराची लक्षणे दिसतात. जनावर अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊन खाली बसते. दुधाळ गायी, म्हशींमध्ये कॅल्शिअमची सामान्य पातळी ८-१२ मिलि/डीएल असते. जेव्हा ही पातळी ५.५ मिलि/डीएल पेक्षा कमी होते, तेव्हा आजाराची लक्षणे दिसतात. शरीरातील उर्वरित कॅल्शिअम स्नायूंमधून वापरले जाते. यामुळे शेवटी पक्षाघात आणि मज्जासंस्थेच्या अति उत्तेजनाची लक्षणे दिसून येतात.
आहारातील कॅटायन आणि अनायन असंतुलनामुळे दुग्धज्वर होतो. उच्च डी कॅड असलेले पशुखाद्य आहारामध्ये आल्यास या आजाराची शक्यता वाढवते. आहारामध्ये नकारात्मक डी कॅड हा आजार रोखू शकते.
विण्यापूर्वी आहारामधील कॅल्शिअम सामग्रीऐवजी डी कॅड कमी करणे, ही आजार टाळण्याचा उपाय आहे. कारण कॅल्शिअमचे प्रमाण कमी करण्यासाठी भाकड गायींना जास्त खुराक किंवा तृणधान्ये खायला देणे घातक ठरू शकते. यामुळे गाईंना फॅटी लिव्हर सिंड्रोम, किटन बाधा, अतिरिक्त ऊर्जेच्या घनतेमुळे पोट सरकणे यांसारख्या इतर गुंतागुंत होण्याची शक्यता असते.
डी कॅडचे संतुलन राहण्याकरिता प्रसूतिपूर्व गायींच्या आहारामध्ये अॅनिओनिक क्षार (म्हणजे क्लोराइड, सल्फर किंवा फॉस्फरसचे क्षार) पुरवठा केल्याने ही परिस्थिती टाळता येते. सामान्यतः दुभत्या गायींच्या आहारामध्ये डी कॅडची पातळी +१०० ते +२०० meq/kg असते. अॅनिओनिक क्षार किंवा आहारामध्ये खनिज आम्ल जोडल्याने डी कॅड पातळी घटते आणि दुग्धज्वराचे प्रमाण कमी होते.
हा आजार मुख्यतः माफक हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे आणि व्यायल्यानंतर उच्च दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांमध्ये बघायला मिळतो. चीकामधील कॅल्शिअम रक्त पुरवठ्यापेक्षा आठ ते दहा पट जास्त असू शकते. हे प्रमाण रक्तामध्ये हाडांमधून सोडलेल्या कॅल्शिअमपेक्षा जास्त असते. म्हणून रक्तामधील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते.
अशा जनावरास दुग्धज्वर होतो. याव्यतिरिक्त, इतर चयापचय विकारांमुळे क्लिनिकल आणि सबक्लिनिकल हायपोकॅलेसिमिया होऊ शकतो (म्हणजे बद्धकोष्ठता होणे, पोट सरकणे, जार अडकणे, गर्भाशय विकार, गर्भाशयस्नायू दाह आणि किटन बाधा (केटोसिस).
डॉ. मधुरा पाटील, (स्नातकोत्तर विद्यार्थी)
९५६१५२०७४३
डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२
(विभाग प्रमुख, पशुपोषण विभाग स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
आजाराची मुख्य कारणे ः
रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी होते. व्यायल्यानंतर चिकामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम स्रवल्यामुळे रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते.
प्रसूतिपूर्व व पश्चात दुधाळ जनावरांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता.
दुधाळ जनावरांमध्ये कॅल्शिअमची वाढलेली गरज.
आहारातून कमी प्रमाणात कॅल्शिअम मिळणे.
आहारात कॅल्शिअम आणि स्फुरदाचे योग्य संतुलन नसणे (योग्य संतुलन २:१).
विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर जनावरांना पोषक आहार कमी प्रमाणात मिळणे किंवा उपासमार होणे.
आहारात ऑक्सलेट आणि मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात असणे.
चाऱ्यातील कॅल्शिअमचे आतड्यांमध्ये योग्य प्रकारे शोषण न होणे.
प्रसूतिपूर्व गर्भावस्थेत जनावरांना आवश्यकतेपेक्षा/ गरजेपेक्षा जास्त कॅल्शिअम पुरवणे.
शरीरात कॅल्सीटोनिनचे अधिक प्रमाण आणि पॅराथार्मोन या संप्रेरकाची कमतरता असणे.
प्रसूतीच्या वेळी जनावराची तणावपूर्ण स्थिती.
आजाराची लक्षणे ः
आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर असे नाव असले, तरी यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते. जनावरास ताप नसतो (९७-९८ अंश फॅरनहाइट).
जनावराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते, प्रसूती नैसर्गिकरीत्या व्हायला अडचण निर्माण होते.
दुग्धज्वर हा आजार दृश्य (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसून येतात) आणि सुप्त (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत) या प्रकारांमध्ये आढळून येतो.
लक्षणांचे टप्पे ः
अ) प्रथम अवस्था :
अवस्थेमध्ये दुग्धज्वर बहुतेक वेळा त्याच्या कमी कालावधीमुळे (< १ तास) पशुपालकांच्या लक्षात येत नाही.
या अवस्थेत दिसलेल्या लक्षणांमध्ये भूक न लागणे, उत्तेजितता, चिंताग्रस्तपणा, अतिसंवेदनशीलता, अशक्तपणा, वजन बदलणे, थर थर कापणे, डोके हलविणे, सतत जीभ बाहेर काढणे, दात खाणे, तोंडातून लाळ गाळणे, अडखळत चालणे यांचा समावेश होतो.
ब) द्वितीय अवस्था :
या अवस्थेमध्ये चिन्हे १ ते १२ तासांपर्यंत दिसू शकतात.
प्रथम लक्षण म्हणजे जनावर खाली बसते, ते नीट उभे राहू शकत नाही.
बाधित जनावर पोटावर बसून मान पोटाकडे वळवून बसते. निस्तेज आणि सुस्त दिसते.
नाकपुड्या कोरड्या पडतात, डोळे कोरडे पडतात. त्यांची हालचाल मंदावते, शरीर थंड पडते. शरीराच्या तापमानात सामान्यत: ९६ अंश फॅरनहाइट ते १०० अंश फॅरनहाइटपर्यंत घट दिसते.
श्वासोच्छ्वास व नाडीचे ठोके जलद होतात (प्रति मिनीट १०० ठोके).
जनावर लघवी करणे, शेण टाकणे, व दूध देणे बंद करते.
जनावर रवंथ करणे थांबवते आणि ओटी पोटाची हालचाल मंदावल्यामुळे जनावराचे पोट फुगते, गुदद्वार सैल पडते.
गाभण जनावरांमध्ये शेवटच्या महिन्यात जर कॅल्शिअमची पातळी कमी असेल तर मायांग बाहेर येते (प्रामुख्याने म्हशींमध्ये हे बघायला मिळते).
आजार विण्याच्या वेळी गर्भार गायीला झाला तर नवजात वासरू व गाय सुदृढ असल्यावर ही गर्भाशयाच्या मंदावलेल्या हालचालींमुळे नैसर्गिकरीत्या प्रसूती होत नाही. जर अशा गायीला कॅल्शिअम सलाइनद्वारे दिले, तर रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण योग्य होते. बाधित गाईची प्रसूती नैसर्गिकरीत्या होते.
दृष्टीस दिसणारे चिन्ह म्हणजे अपचन आणि बद्धकोष्ठता.
जनावराला उठविण्याचा प्रयत्न करून ही जनावर उभे राहत नाही.
क) तिसरी अवस्था :
जनावरांच्या हृदयाचे ठोके क्षीण होऊन वाढलेले असतात. हृदयाची ध्वनी शक्यतो ऐकायला येत नाहीत. हृदय गती १२० ठोके प्रति मिनीट किंवा त्याहून अधिक वाढते.
तिसऱ्या टप्प्यातील गायी उपचारांशिवाय काही तासांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये योग्य उपचार न मिळाल्यामुळे जनावर तिसऱ्या टप्प्यामध्ये जाते. जनावर उभे राहण्यास असमर्थ असते. जनावर आडवे पडते. जनावराचे अंग सैल पडते, पापण्यांची हालचाल होत नाही, गुदद्वार बाहेर येते, जनावर बेसावध होते आणि चेतना कमी होते. जनावर अत्यवस्थ होते.
तिसऱ्या टप्प्यात जनावरास तत्काळ योग्य उपचार न मिळाल्यास जनावर दगावू शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.