
अकोला ः येथील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV) ज्वारी, तूर, तांदळाच्या वाणांना (Jowar, Tur, Paddy Verity) भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. तुरीचा ‘पीडीकेव्ही आश्लेषा’, ज्वारी पिकाचा रब्बी हुरडा वाण ‘ट्रॉम्बे अकोला सुरूची’ आणि तांदळाचा ‘पीडीकेव्ही साधना’ या वाणांचा त्यात समावेश आहे.
तूर पिकाचा ‘पीडीकेव्ही आश्लेषा’ हा मध्यम कालावधीत परिपक्व होणारा (१७४ ते १७८ दिवस) वाण आहे. तसेच मर, वांझ, फायटोप्थेरा, करपा, मॅकोफोमिना करपा व पानांवरील सर्कोसपोरा ठिपके या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम वाण आहे. ७४ टक्के डाळीच्या उताऱ्यासह अधिक उत्पादन देणारा (सरासरी १९ ते २० क्विंटल प्रतिहेक्टर) आहे. तूर पिकाचा हा वाण राष्ट्रीय पातळीवर मध्य भारतासाठी (महाराष्ट्र, गुजरात, मध्य -प्रदेश, छत्तीसगड) खरीप लागवडीसाठी प्रसारित केला आहे.
ज्वारी पिकाचा बहूप्रतीक्षित रब्बी हुरडावाण ‘ट्रॉम्बे -अकोला सुरूची (टीएकेपीएस ५) ज्याची उत्पादनक्षमता हेक्टरी ४३ क्विंटल आहे. ९१ दिवसांत परिपक्व होतो. महत्त्वाच्या किडी व रोगांना सहनशील व मळणीसाठी सुलभ आहे. रब्बी हंगामातील हुरड्याचा वाण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित झाला आहे.
तर तांदळाचा ‘पीडीकेव्ही साधना’ हा लांब बारीक दाण्यांचा (१००० दाण्यांचे वजन २५.७ ग्रॅम), पानांवरील करपा व खोडकिडीला साधारण सहनशील, खाण्यासाठी तसेच पोह्या करता उत्तम असणारा, मध्यम कालावधीचा (११८ ते१२० दिवस), अधिक उत्पादन देणारा (४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टर) विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरीप हंगाम लागवडीसाठी प्रसारित केला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वात ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रामेश्वर घोराडे, कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय गावंडे आणि कृषी संशोधन केंद्राचे (साकोली जि. भंडारा) वरिष्ठ भात पैदासकार डॉ. श्यामकुंवर यांच्यासह ज्वारी, कडधान्य व भात संशोधन केंद्रातील सहकाऱ्यांनी या वाणांसाठी पुढाकार घेतला.
ज्वारीसह कडधान्य व तेलबिया पिकांखालील क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. नुकतेच राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त पीक वाण शाश्वत शेतीसाठी परिणामकारक ठरत आहेत. येत्या काळात ‘एक गाव- एक पीक वाण’ संकल्पना राबवित उपरोक्त पीक वाणांची प्रात्याक्षिके गावोगावी राबविण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डाॅ. पंदेकृवि, अकोला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.