Animal Care : जनावरांतील वंध्यत्व कमी करण्याचे उपाय

Animal Health : अयोग्य आहार, खनिजांची कमतरता हे जनावरांतील वंध्यत्वाचे मुख्य कारण आहे. काही वेळा पूर्ण वंध्यत्व आनुवंशिक कारणांनी होऊ शकते. जनावरांच्या आनुवंशिक तपासणी बरोबर प्रजनन व्यवस्थापनसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे.
Animal Health
Animal HealthAgrowon

डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. अर्चना कदम

Animal Disease : वंध्यत्व म्हणजे जनावरांची पुनरुत्पादन करण्यास असमर्थता किंवा गर्भधारणा करण्यास असमर्थता. हे वंध्यत्व पूर्णतः किंवा अंशतः असू शकते. मादी पुनःपुनः माजावर येणे हे अंशतः वंध्यात्वाचे प्रमुख लक्षण आहे. याची अनेक कारणे असू शकतात. अयोग्य आहार किंवा आहारात खनिजांची कमतरता हे मुख्य कारण आहे.

काही वेळा पूर्ण वंध्यत्व आनुवंशिक कारणांनीसुद्धा होऊ शकते. याकडे आपण दुर्लक्ष करतो. आनुवंशिक तपासणी बरोबर प्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. आहार, व्यवस्थापन, आजारपण वगळता, प्रामुख्याने वंध्यत्वाची इतर काही आनुवंशिक कारणे आहेत.

व्यवस्थापन पद्धती

रेतनाच्या काळात पोषक तत्त्वांच्या अभावामुळे कमकुवत पिढी तयार होते, यामध्ये पुनरुत्पादन क्षमतेचा आभास जाणवतो. जनावरांमधील माज वेळेवर ओळखणे आणि योग्य वेळी रेतन करणे महत्त्वाचे आहे.

परिपक्वतेच्या काळात जनावरास खनिज मिश्रण आणि शक्य झाल्यास पेंड खाऊ घालावी. क्वचित नरा बरोबर जुळी जन्मलेली मादी पूर्णतः वंध्यत्व घेऊन जन्मास येते. अशा मादीला फ्रीमार्टिन म्हणतात.

Animal Health
Animal Care : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

प्रजनन व्यवस्थापन

मोठ्या कळपात निवड प्रक्रियेमुळे आणि छोट्या कळपात इन्ब्रीडिंगमुळे आनुवंशिक बदल होतात. निवड प्रक्रियेमुळे सकारात्मक आणि इन्ब्रीडिंगमुळे नकारात्मक बदल कळपात होतात. इन्ब्रीडिंग म्हणजे जवळच्या नात्यात (जसे नर- संतती, मादी- पुत्र, भावंडं) प्रजनन केल्यामुळे सारखेपणा निर्माण होतो.

कळपात इनब्रीडिंग वाढल्यास अप्रगत असलेली जनुके व्यक्त होतात. अशी जनुके शारीरिक वाढ, पुनरुत्पादन, उत्पादनक्षमता या घटकांवर विपरीत परिणाम करतात. काही पिढ्यांनंतर कळपातील अर्भकांचे वजन वाढण्याची क्षमता कमी होते. जनावरांत अंशतः वंध्यत्व येते. हे टाळण्यासाठी योग्य प्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

जनावरांमध्ये एका नरापासून अनेक मादी गर्भधारणा करतात. एका कळपात मर्यादित नर ठेवले जातात आणि हेच नर पिढ्यान् पिढ्या प्रजननासाठी वापरले जातात म्हणून इन्ब्रीडिंग वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी कळपातील नर वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे.

नर बदलल्याने कळपातील इन्ब्रीडिंग टळते तसेच नवीन नराची जनुके कळपात येतात. पुढील पिढी अधिक समृद्ध होण्यास मदत होते. गट प्रजनन प्रणालीच्या साहाय्याने नराची अदलाबदल केल्यास इन्ब्रीडिंग टाळता येते. उत्तम परिणाम दिसून येतात. इन्ब्रीडिंग टाळण्यासाठी नात्यात समागम टाळणे ही आवश्यक आहे.

Animal Health
Animal Care : जनावरांतील अस्थिभंगाची कारणे अन् उपाय

गुणसूत्रांचे दोष

प्रत्येक प्राणिमात्रात गुणसूत्रे असतात. या गुणसूत्रांवर जनुके असतात. यामुळे दुग्ध उत्पादन, मांस उत्पादन, अंडी उत्पादन अवलंबून असते. पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्रे दुप्पट होऊन दोन पेशीत जातात पण क्वचित वियोग न झाल्यास गुणसूत्रांत दोष निर्माण होतात. असे दोष लैंगिक गुणसूत्रांत निर्माण झाल्यास जनावरात वंध्यत्व निर्माण होते.

गुणसूत्रांत संरचनात्मक विकृती झाल्याने विसंगती निर्माण होते. सदृश्य निरोगी दिसणारे जनावर सामान्य पुनरुत्पादन करण्यास असक्षम असते. गुणसूत्रांत संरचनात्मक विकृतीचे मुख्यतः चार प्रकार आहेत. गुणसूत्रांचे क्रमपरिवर्तन, गुणसूत्र लोप पावणे, गुणसूत्रांची प्रत बनणे आणि गुणसूत्रांचे स्थानांतर. या चार प्रकारांतील सर्वांत घातक दोष म्हणजे, ‘गुणसूत्रांचे स्थानांतर’.

गुणसूत्रांचे स्थानांतर झाल्यास जनावराची प्रजनन क्षमता कमी होते. १/२९ रोबर्त्सोनियन स्थानांतर या प्रकारचे नर हे प्रजननक्षम नसतात. ते दोषपूर्ण शुक्राणू पेशी निर्माण करतात. असे नर प्रजननासाठी वापरल्यास मादी मध्ये गर्भपात होतात.

हे गर्भपात गर्भधारणेच्या अवघ्या काहीच दिवसात होत असल्याने लक्षात येत नाही. त्यामुळे मादी परत माजावर येते. यालाच आपण अंशतः वंध्यत्व म्हणतो. गुणसूत्रांत दोष निर्माण न होऊ देणे हे आपल्या हातात नसले तरी प्रजनन व्यवस्थापन करून आपण असे जनावर ओळखू शकतो. त्यांना कळपातून बाहेर काढल्यामुळे पुढच्या पिढीत दोष प्रसारित होणार नाहीत.

जनुकांमध्ये दोष

जनुके ही डीएनएची बनलेली असतात. जर डीएनएमध्ये दोष निर्माण झाले, तर शरीर योग्य प्रमाणात प्रथिने बनवू शकत नाही. काही जनुके प्रजननक्षमतेशी संबंधित असतात. म्हणूनच जनुक दोषांमुळे वंध्यत्व निर्माण होते.

प्रजनन व गर्भधारणा घडून येण्यासाठी अनेक संप्रेरकांची आवश्यकता असते. हे संप्रेरक निसर्गतः प्रथिने असतात. इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे मादीमध्ये तर एंड्रोजन हे नर संप्रेरक आहे. जनुकांमधील दोषांमुळे या संप्रेरकांत दोष निर्माण झाल्यास प्रजनन क्षमता कमी होते.

नर किंवा मादीमध्ये काही आनुवंशिक दोष असल्यास ते वासरामध्ये वारसाने जातात. यासाठी जनुक दोषांसाठी तपासणी करता येते.कार्यक्षम जनावरांची निवडक करून प्रजनन करावे.

डॉ. प्राजक्ता जाधव, ९८१९६६४७५१

(सहायक प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com