Animal Care : जनावरांतील अस्थिभंगाची कारणे अन् उपाय

Animal Health : आघाताचे स्वरूप, दिशा, हाडाची ताण सोसण्याची क्षमता यावर अस्थिभंग अवलंबून असतो. अस्थिभंगाबरोबरच जखम झाली असेल, तर त्या जखमेत जंतुसंसर्ग होऊन पू होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. सय्यद मोहम्मद अली, डॉ. जी. एस. खांडेकर

Animal Bone Fracture : हाडांमध्ये भेग किंवा मोडणे हे अस्थिभंग म्हणून ओळखले जाते. एखादा आघात किंवा ताण पडल्यामुळे हाड पूर्ण किंवा अंशतः मोडते. आघाताचे स्वरूप, दिशा, हाडाची ताण सोसण्याची क्षमता यावर अस्थिभंग अवलंबून असतो.

काही विकृतींमुळे अस्थींमध्ये भंग होण्याची विशेष प्रवृत्ती आढळते. हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. वय, आजार आणि पोषणातील चुन्याच्या अभावामुळे हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन मोडते. अपघातामध्ये हाडे मोडण्याचा संभव असतो.

जनावरांमध्ये पायाचा अस्थिभंग जास्त प्रमाणात दिसतो. जनावरांमध्ये मेटाकार्पस (समोरील पायांतील हाडे), मेटाटारसच्या टिबिया (मागच्या पायांतील हाडे), रेडिअस आणि अल्ना (समोरील पायांतील हाडे) आणि ह्यूमेरसच्या कोपराचे हाड मोडण्याची शक्यता जास्त असते. फरा, मांडी आणि कंबरेचे हाडदेखील बऱ्याच वेळा मोडलेले दिसते. जबडा, पाठीचा कणा, छातीच्या बरगडीच्या हाडांचे मोडणे दिसून येत नाही.

Animal Care
Animal Disease : जनावरांतील बबेसियोसिस आजार

हाड मोडण्याचे प्रकार

स्थिर अस्थिभंग : हाडाचा कोपरा मोडतो.

भेगाळलेला अस्थिभंग : हाडाला आडवी भेग पडते.

कमकुवत अस्थिभंग : हाडांचे एकापेक्षा जास्त तुकडे होतात.

लहान वासरू, कोकराची हाडे लवचिक असतात. त्यामुळे ती पूर्ण न मोडता फांदीप्रमाणे केवळ एक बाजूला मोडतात. पूर्ण ताटातूट न झाल्यामुळे तुकडे एकमेकांबरोबर राहतात. असा अस्थिभंग केवळ क्ष-किरणांनी दिसतो. योग्य उपचारामध्ये लवकर जुळून येतो. मोठ्या जनावरांमध्ये हाडे कडक असतात. वाळलेल्या काठीप्रमाणे कडकन तुकडे होतात.

काही वेळा त्वचेला जखम न होता अस्थिभंग आतल्या आत राहतो. हाड मोडून वरची त्वचा, मऊ भागांना जखम होते अशा अस्थिभंगास अवघड अस्थिभंग म्हणतात. जखमेत जंतूंचा प्रादुर्भाव होऊन पू, सूज, ताप, जखम मोठी होणे, या समस्या दिसतात.

अस्थिभंगाची लक्षणे

जनावरांच्या अस्थिभंगाची सर्वसाधारण लक्षणे माणसाप्रमाणेच असतात. श्रोणीफलकाचा अस्थिभंग झाल्यास मोडलेल्या हाडावर भार देऊन जनावर उभे राहू शकत नाही. चेहऱ्याच्या हाडांपैकी कोणत्याही हाडाचा भंग झाला तर अन्न चावणे किंवा रवंथ करणे शक्य होत नाही. लाळ सारखी गळत राहते. दात तुटतात.

मणक्याचा अस्थिभंग घोडा आणि श्‍वानामध्ये अधिक प्रमाणात दिसतो. फऱ्याच्या हाडाजवळ जाड स्नायूंमुळे मोडलेल्या हाडाचे तुकडे एकमेकांपासून फार दूर जात नाहीत, त्यामुळे अस्थिभंग लवकर बरा होतो.

मोडलेले हाड जुळून येणे हे जनावरांमध्ये सोपे नसते.

अस्थिभंगाबरोबरच जखम झाली असेल, तर त्या जखमेत जंतुसंसर्ग होऊन पू होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.

Animal Care
Animal Care : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

अस्थिभंगाच्या जागी असह्य वेदना होते. वेदनेच्या जागेवरून अस्थिभंग कोठे आहे हे शोधता येते.

अस्थिभंगामुळे त्या भागाची हालचाल कमी होते किंवा बंद पडते. हाड तुटल्यामुळे पुढची हालचाल होत नाही. हालचालीमुळे वेदना होत असल्याने पशू तो भाग हलवत नाही.

अस्थिभंग होऊन हाडाचे तुकडे वेगवेगळे झाले असतील तर त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा दिसतो. सूज जास्त असेल तर मात्र हा विचित्र आकार लपून जातो.

अस्थिभंगाने अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे तो भाग सुजतो.

अस्थिभंगाच्या जागी हाताने थोडे दाबून पाहिल्यास हाडांचे तुकडे एकमेकांवर घासल्याचा आवाज येतो.

वेदना, सूज, हालचालींवर बंधन, वेगळा आकार व टोके घासल्याच्या आवाजावरून अस्थिभंगाचे निदान बहुतेक वेळा खात्रीने करता येते.

अस्थिभंगाची जागा, प्रकार, एकूण नुकसान, तुकडे कोठे आहेत हे क्ष-किरण चित्रात स्पष्ट कळून येतात.

विशिष्ट अस्थिभंग (उदा. मेटाकार्पेल हाडे, मेटाटारसाल हाडे, खूर, खुबा, खांदा) नुसत्या तपासणीवरून खात्रीपूर्वक सांगता येत नाही, पण क्ष-किरण चित्रात हे स्पष्ट होते.

उपचार

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आवश्यक क्ष- किरण चाचणीनंतर उपचार करावा.

लहान जनावरांत लांब हाडांच्या पोकळीत जंतुहीन सळई घालून हाड हलू नयेत असा प्रयत्न करतात. विविध उपकरणांचा उपयोग करून हाडे स्थिर ठेवण्यात येतात. हाडांमधील मज्जेमध्ये (लांब हाडांच्या पोकळ भागात आढळणाऱ्या मऊ पदार्थात) खिळ्यासारख्या धातूचा तुकडा घालून हाडे जोडतात.

हाड मोडलेल्या ठिकाणी शक्य असल्यास लाकडी फळीचा आधार देऊन बांधावे. अस्थिभंगावर उपचार केल्यानंतरही क्ष किरण चित्र काढून हाड नीट बसले आहे का हे तपासावे.

जनावरास योग्य वेदनाशामक गोळ्या नियमित द्याव्यात.

कॅल्शिअम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्व ड युक्त टॉनिक नियमितपणे द्यावे.

डॉ. सय्यद मोहम्मद अली, ९५४५०४०१५५ (पशू शल्यचिकित्सक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com