Animal Care : जनावरांमध्ये होते कांद्याची विषबाधा

Onion Poisoning : कांद्याच्या विषबाधेमुळे जनावरांच्या शरीरात वायू अधिक प्रमाणात तयार होतो. तयार होणारा वायू आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर न टाकल्यामुळे जनावरांना पोटफुगी होते.
Animal Disease
Animal DiseaseAgrowon

डॉ. सोमेश गायकवाड, डॉ. महेश जावळे

Diseases in Animals : कांद्याच्या विषबाधेमुळे जनावरांच्या शरीरात वायू अधिक प्रमाणात तयार होतो. तयार होणारा वायू आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर न टाकल्यामुळे जनावरांना पोटफुगी होते. चयापचयासंबंधित आजार दिसून येतात. विषबाधा होऊन खाद्य सेवन क्षमता कमी होते. दूध उत्पादनात घट येते.

काही भागामध्ये मोकळी सोडलेली जनावरे कांद्याच्या शेतात चरताना आढळून येतात. ही जनावरे नकळतपणे किंवा नाइलाजास्तव पातींसोबत कांदा देखील खातात. परिणामी, कांद्यातील विषारी घटकांमुळे जनावरांना विषबाधा होते.

विषारी वनस्पतींमध्ये असणारा तीव्र वास आणि बेचवपणा यामुळे जनावरे शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत. परंतु चाऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरे या पिकांकडे आकर्षित होऊन ही वनस्पती नाइलाजास्तव खातात. जनावर जर अधिक काळापासून उपाशी असेल तर अशा स्थितीत त्यांना चरण्यास सोडल्यानंतर ते अधाशीपणाने खातात, या वेळी नकळतपणे विषबाधा होण्याची शक्यता वाढते.

कांद्यामध्ये डायसल्फाइड, एन प्रोपायल डायसल्फेट, आणि एस मिथाईल आणि एस प्रोपि(एन)ल सीस्टीन सल्फोक्साइड, हे घातक घटक असतात. कांद्यापासून होणाऱ्या विषबाधेसाठी मेंढ्या आणि शेळ्यांच्या तुलनेत गाई, म्हशी अधिक संवेदनशील असतात.

अतिरिक्त प्रमाणात कांदा पिकाचे सेवन झाल्यास विषबाधा होऊन खाद्य सेवन क्षमता कमी होणे, दूध कमी होते, गडद रंगाची विष्ठा आणि लघवी अशी लक्षणे दिसून येतात. जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादन कमी होते, पशू उपचाराचा खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन कांद्यापासून होणारी विषबाधा समजून घेणे आवश्यक आहे.

Animal Disease
Animal Care : दुधाळ गाई, म्हशींमधील संसर्गजन्य गर्भपाताचे नियंत्रण

कांद्यामुळे होणारी विषबाधा

गाई, म्हशींनी कांदा खाल्ल्यानंतर पोटातील रुमेनमध्ये सूक्ष्मजंतूंच्या मदतीने एस मिथाइल आणि एस प्रोपि(एन)ल सीस्टीन सल्फोक्साइड, रूपांतर थायो सल्फोनेट आणि पुढे डाय प्रोपायल डायसल्फाइड आणि डायप्रोपीनील डायसल्फाइड स्वरूपात होते. हे घटक रक्तात शोषून घेतल्यामुळे रक्तातील लाल रक्त पेशींना इजा पोहोचते आणि मिथहिमोग्लोबिन तयार होते.

हिमोग्लोबिनची कमतरता झाल्याने टिशू आणि मांसपेशी यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. त्यामुळे रक्तक्षय (अ‍ॅनेमिया) होतो.

हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जनावर श्‍वास घेण्यासाठी संघर्ष करताना दिसून येते. त्यानंतर हिंज बॉडी निर्मिती होऊन हिमोग्लोबिनचे विघटन होते. मूत्राचा रंग भडक लाल होतो.

कांद्याच्या विषबाधेमुळे शरीरात वायू अधिक प्रमाणात तयार होतो. तयार होणारे वायू आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर न टाकल्यामुळे जनावरांना पोटफुगी होते. जनावरांमध्ये चयापचया संबंधित आजार दिसतात.

जनावराच्या मुख्य पोटाचा (रूमेन) सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असतो, तो आजारात ५.५ पेक्षा खाली येतो. त्यामुळे पोटाची हालचाल मंदावते, जनावरांना भूक लागत नाही आणि परिणामी दूध उत्पादन घटते. बदललेल्या आम्लधर्मीय वातावरणात पोटातील जिवाणू आम्ल अधिक प्रमाणात तयार करतात, यामुळे रुमेनमधील संतुलन बिघडते.

विषबाधेबाबत कोणतीही पूर्व माहिती न मिळाल्यास रोगनिदानासाठी बाधा उत्पन्न होते. वेळीच पशुवैद्यकीय उपचार न मिळाल्यास जनावर दगावू शकते.

Animal Disease
Animal Care : प्लास्टिक खाणं जनावरांसाठी ठरेल जीवघेणं

विषबाधेची लक्षणे

जनावरे निस्तेज होतात, श्‍वास घेण्यात अडथळा, अशक्तपणा, भूक न लागणे, धाप लागणे, सुस्ती, दूध उत्पादन कमी होते.

फिकट श्‍लेष्मल त्वचा होते, रवंथ करण्याची क्षमता कमी होते.

गडद काळी विष्ठा, लाल रंगाचे मूत्र होते.

शरीराचे तापमान कमी होते.

विषबाधेचे निदान

जनावराने कांद्याच्या रानात चरण्याची माहिती मिळाल्यास उपचारासाठी मदत होते.

दुधाला कांद्याचा वास येणे, रवंथ करताना कांद्याचा वास येणे.

पोटफुगी, हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते.

उपचार

जनावराने काय खाल्ले त्याची माहिती देऊन त्याची तपासणी पशुवैद्यकाद्वारे करून घ्यावी.

जनावरास श्‍वसनाचा त्रास होत असेल तर त्याला हवेशीर जागेत ठेवावे.

पशुवैद्यकाद्वारे जनावरांवर त्वरित उपचार करावेत.

पशुतज्ज्ञांकडून फॉस्फरस, जीवनसत्त्व क आणि बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन स्वरूपात द्यावे.

फॉस्फरसची गरज वाढल्यामुळे चाटण जनावरापुढे ठेवावे.

खाद्यात १०० ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा.

प्रतिबंधक उपचार

कांद्याच्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत. गोठ्यामध्ये नियमित फिरून जनावरांची पाहणी करावी. जनावरांच्या वागणुकीत असामान्य बदल अथवा विषबाधेची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकाद्वारे त्वरित उपचार करावेत.

डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५,

(पशुपोषणशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com