Livestock Market : मुरूडच्या जनावरे बाजाराला ७० वर्षांचा इतिहास

Animal Market Latur : लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील येथील गायी, म्हशींच्या बाजाराला ७० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. पूर्वीच्या तुलनेत विविध कारणांमुळे अलीकडील काळात जनावरांची खरेदी-विक्री कमी झाली आहे.
Livestock Market
Livestock MarketAgrowon
Published on
Updated on

Animal Market Latur : मुरुड (ता. जि. लातूर) येथील जनावरांच्या बाजाराला ७० वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे. हा बाजार म्हणजे गाव व बाजारपेठेचे वैभव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे जनावरांचा बाजार भरतो. पूर्वी तो येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तावरजखेडा (ता. जि. धाराशिव) येथे भरायचा.

गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या नामदेवनाना नाडे, शिवाजीराव नाडे, गुंडीबा कणसे, दगडू हवालदार आदी मंडळींनी हा बाजार तावरजखेड्यातून मुरुड येथे आणला. त्या वेळी वाजतगाजत बाजाराची सुरवात झाली.

नव्याने सुरू झालेल्या या बाजारात जनावरांसाठी कडबा, पाणी, निवाऱ्यासह दूर अंतरावरून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी मुक्कामाची सोय केली. यामुळे मोठ्या संख्येने व्यापारी व शेतकरी बाजाराकडे वळत. तावरजखेड्यात जनावरांचे मोठ्या संख्येने व्यापारी आहेत.जुन्या आठवणी घेऊन आजही ते मुरूडच्या बाजारात येत असतात.

असा भरतो बाजार

पूर्वी रस्त्याने चालवतच जनावरांना घेऊन बाजारात यावे लागत होते. मंगळवारी बाजार भरत असला तरी व्यापारी व शेतकरी रविवारी रात्रीपासूनच यायला सुरवात होत असे. या ठिकाणीच दुसऱ्या दिवशी भाजीपाला बाजार भरायचा. या दोन दिवसांच्या काळात गावात जनावरांचा वावर असायचा.

ग्रामपंचायतीला रात्रीतूनच स्वच्छता करून बुधवारच्या बाजारासाठी मैदान स्वच्छ करून ठेवावे लागत असे. बाजारात गायी, बैल, म्हशी यांच्यासह शेळ्या- मेंढ्यांची संख्या वाढू लागली. दुसरीकडे भाजीपाला बाजारातही विक्रेत्यांची संख्या वाढली. यामुळे ग्रामपंचायतीने बाजाराचे विभाजन केले. त्यानुसार आता सोमवारी जनावरांचा बाजार भरत असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

Livestock Market
Livestock Management : बदलत्या हवामानात जनावरांचे व्यवस्थापन

जनावरांची व्यवस्था

काही वर्षांत दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने बाजारात आता जनावरांची वाहनांद्वारेच वाहतूक होते. अंबाजोगाई, कळंब, बार्शी, लातूर, पाटोदा (लोहारा), साळेगाव येथून व्यापारी जनावरे घेऊन बाजारात येतात. सोमवारी पहाटेपासूनच शंभरहून अधिक वाहने येण्यास सुरुवात होते.

गाव व परिसरातही व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. ते चालवतच जनावरे बाजारात आणून बांधतात. गावातील व्यापारीही जनावरे खरेदी करून त्याच दिवशी विक्री करण्याचा प्रयत्न करतात. बाजारात दोन भाग आहेत. एका भागात म्हशी व हलगटांचा बाजार तर दुसऱ्या भागात बैल, गावरान व संकरित गायी विक्रीसाठी ठेवण्यात येतात.

जनावरे बांधण्यासाठी दावणीची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या नावाने दावणी ओळखल्या जातात. ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या दावणीवरच व्यापारी आपली जनावरे विक्रीसाठी बांधतात. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या जनावरांसाठी स्वतंत्र दावणी आहेत. सकाळी साडेसात वाजता सुरू होणारा बाजार दुपारी साडेतीनपर्यंत चालतो.

विक्रीचे स्वरूप

शेती व्यवसायात आजच्या घडीला यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच अलीकडील काळात शेतीचा खर्च वाढल्याने जनावरे सांभाळणे देखील मुश्कील झाले आहे. अर्थात, तरीही जनावरे खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो. काही शेतकरी हौस म्हणून बैलजोडी पाळतात. काहीजण कुटुंबाच्या गरजेपुरत्या दूध- दुभत्यासाठी गावरान व संकरित गायीचे संगोपन करतात. जनावराच्या बाजारात त्यांच्या खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होतात.

दुधाचे दर कमी झाल्याचा परिणामही बाजारातील व्यवहारावर झाला आहे. दुभती जनावरे विक्रीस येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. पहिल्या म्हैस किंवा गायीचे दूध कमी झाले की दुसरी खरेदी करण्यासाठी येणारे शेतकरी बोटावर मोजण्याइतपत आहेत.

जनावरांची संख्या कमी होत आहे तशी बाजाराबाहेरच जनावरांची खरेदी विक्री वाढल्याचे व्यापारी सांगतात. बहुतांश जनावरांचे व्यवहार उधारीवर होतात. ते पूर्ण झाल्यावरच खरेदी- विक्रीच्या नोंदीचे दाखले तयार केले जातात. बँकेकडून कर्ज किंवा सरकारी अनुदानासाठीही संकरित गायी व म्हशींच्या खरेदीनंतर दाखल्याची मागणी होते.

व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या गायी किंवा म्हशीचे पैसे शेतकरी किंवा अन्य व्यापारी महिना ते दीड महिन्याच्या सवडीने देतात. त्यामुळे बाजारात उधारीचे व्यवहार गृहित धरून दिवसाला पाच ते सहा लाखांची उलाढाल होत असल्याचे मुरूड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आकाश कणसे यांनी सांगितले. दिवसभरात सुमारे ३० ते ३५ जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होताना दिसतात.

Livestock Market
Livestock Management : जनावरांमध्ये आढळणाऱ्या अनिष्ट सवयींवर उपाय

व्यापाराला जोडून दुग्ध व्यवसाय

स्थानिक व्यापाऱ्यांच्या घरी जनावरांच्या दावणी आहेत. बाजारात विक्री न झाल्यास ते घरच्या दावणीला जनावर बांधून पुढील आठवड्यातील बाजारात विक्रीसाठी आणतात. मात्र गेल्या काही वर्षांत खरेदी विक्रीत झालेली घट पाहून व्यापाऱ्यांनी या व्यवसायाला जोडून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे.

त्यामुळे दूध विक्रीतील उत्पन्नाचा त्यांना आधार मिळतो अशी माहिती व्यापारी युनूस सय्यद यांनी दिली. बाजारात वय व दुधावरून म्हैस व गाईंची किंमत ठरते. बाजारातील चढ-उतारावरून म्हशीला तीस हजार ते लाखांच्या पुढे दर मिळतो. यात दररोज पाच लिटर दूध देणाऱ्या म्हशीला ६० हजार तर दहा लिटर दूध देणाऱ्या म्हशीला ९० ते एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बैलजोडीचे आकर्षण कायम

बैलांचे दात, हातपाय, शिंगे आदी बाबींवरही दर ठरवला जातो. कमी दाताचा बैल म्हणजे कमी वयाचा समजला जातो. गावरान, खिल्लार, देवणी बैलजोड्या बाजारात विक्रीसाठी येतात. त्यांचे आकर्षण आजच्या काळातही कायम आहे. बैलांच्या विक्रीसाठी व्यापारी त्यांना रंगवतात. काही व्यापारी जनावरांची स्वच्छताही करतात.

साधारण गुढी पाडव्यानंतरच बाजारात बैलांच्या खरेदी विक्रीला सुरुवात होते. पोळा सणापर्यंत ती सुरू असते. बाजारात पुरेशा सुविधांची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात चिखलाचा मोठा सामना करावा लागतो. पाण्याची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति घागर दराने ते विकत घ्यावे लागते. याशिवाय दहा रुपये दराने उसाच्या वाढ्याची तर ४० रुपये दराने मका कडब्याची पेंढी मिळते.

आकाश कणसे ९८९०८४७१२४ (माजी उपसरपंच)

युनूस सय्यद ९८९०८६७६८७ (व्यापारी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com