
डॉ. प्रेरणा घोरपडे, डॉ. प्राची मुंज
Animal Care : थंडी आणि ढगाळ वातावरणात जनावरांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हिवाळी हंगामात तापमानात घट होत असल्याने जनावरांना थंडीपासून संरक्षण द्यावे. पोषक आहार, गरम पाण्याची सोय करावी. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी, ओलसरपणा टाळावा. योग्य व्यवस्थापन केल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
गेल्या काही दिवसांत थंडी तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. या बदलत्या हवामानाचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. पोषण व्यवस्थापन आणि योग्य आरोग्य सेवेद्वारे जनावरांचे योग्य व्यवस्थापन करता येते. गोठ्याच्या खिडक्यांना पडदे लावावेत.
यामुळे थंड वारे जनावरांना लागणार नाही. यासाठी बांबू, कोरडे गवत, भात पेंढा, गोण्या इत्यादींपासून पडदे तयार करता येतात. जनावरांचा गोठा जास्त काळ ओलसर आणि थंड राहू देऊ नये. यामुळे जनावरांना विशेषतः करडांना न्यूमोनिया, ताप, कोक्सिडिओसिस, अतिसार यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन
तापमानात घट झाल्यामुळे जनावरांच्या पोषक तत्त्वांच्या गरजा वाढतात. जनावरांचे दुग्ध उत्पादन आणि शरीराची उष्णता राखून ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात ओला आणि सुका चारा देणे गरजेचे आहे.
मका, गहू, किंवा सहज उपलब्ध होणारे संपूर्ण धान्य यासारखे अतिरिक्त प्रमाणात धान्य जनावरांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाऊ शकते. याबरोबरीने मोहरीची पेंडीचा वापर केला पाहिजे. बियाण्याच्या पेंडीमधून जनावरांच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करता येतात. वासरांना अधिक दूध पाजावे. जनावरांना दिवसातून दोन ते तीन वेळेस खाद्य द्यावे. प्रत्येक खाद्याचे प्रमाण तेवढेच ठेवावे.
हायपोथर्मिया म्हणजेच शरीराचे तापमान कमी होणे. हा नवजात वासरांसाठी एक मोठा धोका आहे. शरीराचे तापमान वाढविण्यासाठी गोठ्यामधील व्यवस्थापन,आहार आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण हे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.
कडाक्याच्या हिवाळ्यात जनावरांना गोठ्यात ठेवावे, परंतु गोठ्यातील हवा खेळती राहावी या काळजी घ्यावी. जनावरांच्या गोठ्यामधून हवा बाहेर जाण्यासाठी व्यवस्था करावी. जनावरांच्या गोठ्याच्या सभोवती पडदे वापरावेत. ताडपत्री, बांबू, कोरडे गवत, भात पेंढा, ताग पिशव्यांपासून पडदे तयार केले जाऊ शकतात.
तापमानातील कोणत्याही चढउतारामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून दिवसभर स्थिर तापमान राखण्याचा प्रयत्न करावा. दिवसा जनावरांना गोठ्याच्या बाहेर बांधावे. सूर्यास्ताच्या आधी त्यांना गोठ्यात घेऊन जाणे गरजेचे आहे, कारण सूर्यास्ताच्या वेळी तापमानात अचानक घट होते.
पिण्याच्या पाण्याचे तापमान तपासावे. जर पाणी खूप थंड असेल तर तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि ते उबदार करण्यासाठी त्यात थोडे गरम पाणी मिसळावे. खूप थंड किंवा खूप गरम पाणी आतड्यासाठी हानिकारक असते. शरीरातून होणारे उष्णतेचे नुकसान टाळण्यासाठी जनावरांच्या अंगावर पोते टाकावे.
जनावरांच्या गोठ्याचा पृष्ठभाग काँक्रीटचा असेल, तर त्यावर गवताचे आच्छादन करावे. यामुळे जनावरांच्या अंगात उष्णता राखून ठेवता येईल.
गोठ्यातून मलमूत्रांच्या चांगल्या निचरा होण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करावी. ओल्या फरशीमुळे अतिसार, ताप, न्यूमोनिया, कोक्सिडिओसिस, हायपोथर्मिया आजार होऊ शकतात. ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
गोठ्यामधील जनावरांची गर्दी टाळावी. कारण यामुळे गोठ्यात अमोनिया जमा होतो, ज्यामुळे श्वसन समस्यांची विशेषतः न्यूमोनियाची तीव्रता वाढू शकते. यासाठी दिवसातून दोनदा गोठा स्वच्छ करावा. यामुळे शेडमध्ये वायुवीजनही वाढेल.
हिवाळ्यात जनावरांना कापडाने स्वच्छ करावे, पाण्याचा वापर टाळावा. जनावरांना स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरण्याची गरज भासल्यास, ते दुपारच्या वेळी वापरावे. उष्णतेचे नुकसान टाळण्यासाठी जनावरांना ताबडतोब कापडाने स्वच्छ करावे.
वराहांचे व्यवस्थापन
वराहांसाठीची शेड प्रशस्त असावी. हवा खेळती असावी. वराह एकमेकांच्या जवळ राहत असतील, तर शेडमधील तापमान खूपच कमी झाले आहे असे समजावे. शेडमध्ये तापमान वाढीसाठी शेकोटी किंवा दिवे लावावेत.
कमी तापमानाच्या दीर्घ कालावधीत हायपोथर्मिया होतो. यामुळे शरीर निळे होतात, शरीराचे तापमान कमी होते, शरीराचे केस उभे राहतात आणि शरीरामध्ये कडकपणा दिसून येतो.
थंडीच्या काळात वराहांना कोमट गरम पाणी द्यावे. तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मका ग्लूटेन इत्यादी तंतुमय खाद्य द्यावे, ज्यामुळे शरीरामध्ये उष्णता जास्त काळ टिकून राहते. शेडमध्ये स्वच्छता ठेवावी.
मेंढ्या, शेळ्यांचे व्यवस्थापन
प्रत्येक शेळी, मेंढीसाठी पुरेशी जागा असावी. फरशीवर गवत, भुसा, पेंढा पसरावा. निसरड्या फरशीमुळे शेळ्या घसरण्याचा संभव असतो. त्यामुळे लांब हाडे मोडतात.
तीव्र हवामानात शेळ्या, मेंढ्या उबदारपणासाठी एकत्र जमतात, परंतु यामुळे दुखापत आणि श्वसनाचे आजार होण्याची शक्यता वाढते. यावर लक्ष ठेवावे. सुरक्षितपणे एकत्र राहण्यासाठी पुरेसा निवारा देणे गरजेचे आहे.
काळात कोमट पाणी पाजावे, कारण थंड पाण्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. खाद्यामध्ये मका वापरावा यामुळे खाद्यपदार्थातील ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. सामान्यतः इच्छित वजन वाढण्यासाठी शेळ्या, मेंढ्यांना २००-२५० ग्रॅम धान्य द्यावे. पुरेसे गवत आहारात द्यावे.
मेंढ्यांना शरीराचे तापमान राखण्यासाठी हिवाळ्यात अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात चांगल्या दर्जाच्या गवताचा वापर करावा. शेळ्या, मेंढ्यांना त्यांचे शरीर उबदार ठेवण्यासाठी किमान ४ तास सूर्यप्रकाशात ठेवावे. हिवाळ्यात लोकर कापू नये.
हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्यांचा वजन वाढण्याचा कल असतो, त्यामुळे त्यांना पुरेसा चारा द्यावा.
चिखल किंवा ओल्या परिस्थितीत राहणाऱ्या पायांना जखमा होण्याची शक्यता असते. पाय कुजणे आणि चामखीळ आजार होऊ शकतो. पाय बुडविण्यासाठी झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट वापरावे.
हिवाळ्यात पायांची खाज किंवा पाय कुजणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी गोठा कोरडा ठेवणे आणि खुरांची नियमित साळणी करणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
हिवाळ्याच्या उवांचे प्रमाण वाढते. जास्त प्रादुर्भावामुळे रक्तक्षय, खराब त्वचा आणि त्वचेची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्याने उपाय करावेत.
शेळ्या, मेंढ्या हिवाळ्यात रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत वितात. नवजात करडे आणि कोकरांसाठी कोरड्या आणि उबदार जागी मऊ अंथरूण तयार ठेवावे. जेणेकरून जन्मानंतर लगेचच त्यांची काळजी घेता येते. नवजात करडांना जन्मानंतर लवकर कोरडे करणे आवश्यक आहे, कारण हायपोथर्मिया म्हणजेच शरीराचे तापमान लवकर कमी होऊ शकते. कोरडी आणि उबदार जागा पुरवल्याने कोकरू आणि नवजात करडांना न्यूमोनियापासून रोखता येऊ शकते.
- डॉ. प्राची मुंज, ८८५७८२०८७० (पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.