
पुणे : राज्यात गोवंशासह म्हशींमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी (Sugarcane Crushing Season) वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण बंधनकारक (Bull Vaccination Mandatory) केले जाणार आहे. त्यासाठी बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी (Sugar Commissioner) दिले आहेत.
“राज्यात सव्वा कोटी पशुधन असले, तरी या लम्पी स्कीनची लागण झालेले पशूधन एक टक्कादेखील नाही. हा रोग वाढण्याची शक्यता कमी असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून आम्हाला सांगितले जात आहे. मात्र, खबरदारीचे सर्व उपाय आम्ही लागू करणार आहोत. कोणत्याही साखर कारखान्याने गाळप हंगामात लसीकरण न केलेल्या जनावरांचा वापर ऊस तोड व वाहतुकीसाठी करू नये, असा आमचा प्रयत्न असेल. साखर कारखानेदेखील लसीकरण न केलेले बाहेरगावचे बैल आपआपल्या कारखाना क्षेत्रात येऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत,” अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
राज्यात हार्वेस्टरने ऊस तोडणी वाढली आहे. तसेच, वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापरदेखील वाढला आहे. तरीही या कामांसाठी बैलगाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसून आल्यामुळे सर्वच साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक व शेती अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
“आपापल्या साखर कारखान्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडीकरीता बैल घेऊन येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या नावांची गावनिहाय यादी अद्ययावत करा. ही यादी तातडीने संबंधित मजूर ज्या जिल्ह्यातून येणार आहेत त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त पाठवा,” अशा सूचना आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.
ऊस वाहतुकीसाठी येणा-या मजुरांच्या सर्व बैलांचे गावातून निघण्यापूर्वीच किंवा निघत असताना ‘लम्पी स्कीन’ रोग प्रतिबंधक लस दिली पाहिजे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाला नियोजन करणे सोयीचे जाण्यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळेच साखर आयुक्तालयाने वेळीच हस्तक्षेप करून साखर कारखान्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रादेशिक साखर सहसंचालकाने स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.