कोल्हापूर : लाखो रुपयांच्या गाई डोळ्यादेखत प्राण (Cow Death Due To Lumpy Skin) सोडत आहेत. लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावाने (Lumpy Skin Disease Outbreak) रुबाबदार गाईंच्या वास्तव्याने वैभव दाखवणारे गोठे मरणकळा अनुभवत असल्याचे विदारक चित्र आहे. बहुतांशी गाईंच्या गोठ्यांमध्ये लम्पी स्कीनने (Lumpy Skin) थैमान मांडले आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनाने ज्या गोठा मालकांनी मरतूक टाळली ते गोठा व्यावसायिक या आजारापुढे हतबल झाले आहेत. कागदी घोडे नाचवणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला (Department Of Animal Husbandry) मात्र याचा गंध ही नसल्याचे वेदनादायी चित्र सर्वत्र दिसते.
काही ठिकाणी वारंवार दूरध्वनी करून सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी गोठ्यात येत नसल्याचे संतापजनक वास्तव आहे. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक गोठ्यातील दुधाचे प्रमाण लक्षणीय घटले. पशुपालकांना रोजचा हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. जिवापाड जपलेल्या जनावरांचा मृत्यू आता सहन होण्याच्या पलीकडे गेला आहे.
चार गाभण गाईंचा डोळ्यासमोर मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता.शिरोळ) येथील अण्णासाहेब मोटके- पाटलांचा सुमारे ३०० गायींचा राज्यातील अग्रगण्य गोठा आहे. दिमाखदार जनावरे आणि दररोज सुमारे दोन ते अडीच हजार लिटर दुधाचे संकलन. यामुळे गोठ्यात लगबग दिवसभर असते. पंधरवड्यापूर्वी लम्पी स्कीनने गोठ्यात शिरकाव केला आणि गाईंचे स्वास्थ्यच बिघडले. तापामुळे जनावरे पटापट आजारी पडू लागली. पंधरा दिवसात तब्बल ४० गाईंना लम्पी स्कीनने गाठले. उपचार सुरू असतानाच १० ते १३ सप्टेंबर या चार दिवसांत नामवंत जातीच्या सलग चार गाभण गाईंचा मृत्यू डोळ्यासमोर झाला.
सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान तर झालेच परंतु जिवापाड जपलेल्या गाईंचा मृत्यू प्रचंड वेदनादायी ठरला. या धक्क्यातून गेल्या २३ वर्षांपासून आदर्श गोठा व्यवसाय करणारे अण्णासाहेब सावरले नाहीत. गोठा सुरू झाल्यापासून एवढी हानी कधीच झाली नाही, आता मात्र आम्ही हतबल झाल्याचे ते सांगतात.
पंधरा दिवसापासून चाळीस जनावरे लम्पी स्कीनच्या तडाख्यात सापडून ही याचा साधा मागमूस पशुसंवर्धन विभागाला नसावा, हे विशेष. हे अधिकारी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात फारसा प्रादुर्भाव नाही, अशीच माहिती देत आहेत. ‘‘ज्यावेळी लसी हव्या होत्या त्यावेळी मिळाल्या नाहीत, आता येऊन काय उपयोग,’’ असा सवाल अण्णासाहेब यांचा मुलगा आकाश मोटके पाटील यांनी केला. या जनावरांना ‘क्वारंटाईन’ केले असले तरी-अन्य जनावरांचा धोका टळलेला नाही.
इतर वेळी समाधानाने रवंथ करणारी जनावरे डोळ्यांत आस आणून वाचवण्याची याचना करत असल्याचा प्रत्यय प्रादुर्भावग्रस्त गाईंकडे पाहिल्यावर येतो. अंगभर उठलेल्या फोडी आणि तोंडातून गळणारे रक्त अक्षरशः अंगावर शहारे आणते. लम्पी स्कीनच्या तडाख्याने दररोज ३०० लिटर दुधाचे संकलन घटले आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल दोन लाख रुपयांची औषधे जनावरांना दिली आहेत. गेल्या चार दिवसांत नव्या जनावरांना प्रादुर्भाव झाला नसला तरी धाकधूक मात्र कायम आहे.
जांभळी शेजारचे टाकवडे हे गाव. टाकवडे व शिरढोण या गावाला गेल्या नऊ महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारीच नाही. यामुळे या गावातील पशुपालकांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. खासगी डॉक्टर हेच या गावातील प्रमुख वैद्यकीय उपचाराचे स्रोत. या गावांमधील प्रामुख्याने मळा भागातील गाईंना लम्पी स्कीनचा जोरदार प्रादुर्भाव होत आहे. या गावात पशू वैद्यकीय अधिकारीच नसल्याने वेळेत किती लसीकरण आणि उपचार झाले असतील या बाबतची चर्चाच व्यर्थ ठरेल. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागे लागून त्यांच्याकडून उपचार करून घेण्यात सातगोंडा बाबू कोरे हे पशुपालक अखेर यशस्वी ठरले. त्यांची गाय उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. पण गेले पंधरा दिवस अन्न गोड लागत नसल्याची प्रतिक्रिया कोरे यांनी दिली.
ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात
दुग्ध व्यवसायाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी आपला चरितार्थ चालवला आहे. मात्र लाखो रुपयांची जनावरे लम्पी स्कीनच्या तडाख्यात सापडल्याने सामान्य दूध उत्पादक हादरून गेला आहे. आजार आटोक्यात येत नसल्याने दुधाच्या उत्पादनात घट होत आहे. जनावरांचा मृत्यू झाला नाही, तरी आजाराचा प्रादुर्भाव होताच दुधाच्या उत्पादनात मोठी घट होते. विशेष करून प्रत्येक पशुपालकांच्या गाईंमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचा फटका दूध उत्पादनाला बसणार आहे. यामुळे
नजीकच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र ठप्प होण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.